बीचेसपलीकडचा खरा गोवा

गोवा म्हणजे केवळ बीचेस, जलसफरी आणि फक्त मज्जा असे समजणाऱ्याना मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते की खऱ्याखुऱ्या गोव्याच्या पर्यटनाचा आनंद देणारं गोवा खूप वेगळं आणि मोहवून टाकणारं आहे. मला स्वतःला एक गोवेकर म्हणून गोव्यातील समुद्र किनाऱ्यांपेक्षा गोव्यातील निसर्ग सुंदर गावे खूप आवडतात. चांदोर हे असेच एक गाव आहे, ज्याची विशेष ओळख आहे ती इथली इंडो-पोर्तुगीज घरे आणि मुख्यत्वे ब्रॅगांझा हाऊस!

चांदोर – गोव्याची पहिली राजधानी

चांदोर, एक अत्यंत वेगळे आणि ऐतिहासिक महत्व असलेले गाव आहे .

चांदोरचे मूळ नाव आहे चंद्रपूर. गोव्याची ही प्रथम राजधानी. अगदी भोज राजवटीपासून पुढे कदंब राजवटीचीही ही राजधानी होती. एकेकाळच्या वैभवशाली राजधानीची ओळख म्हणून आता मात्र प्राचीन किल्ल्याचे अवशेष आणि एक नंदी इतकंच पाहायला मिळते.

ब्रॅगांझा परेरा हाऊस
वारसास्थळांनी नटलेले चांदोर गाव

अजूनही गोव्याची प्रथम राजधानी म्हणून ओळख असलेले हे गाव सध्या लोकांना आकर्षित करते ते येथील कित्येक वर्षांपासूनच्या वडिलोपार्जित घरांसाठी (heritage homes).  विशेष शैलीची गोवन घरे गोव्यातील काही भागात अजूनही दिमाखाने उभी आहेत. आपल्या भव्य अशा इंडो-पोर्तुगीज शैलीच्या देखण्या घरांसाठी चांदोर गाव प्रसिद्ध आहे. वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेसाठीच ओळखल्या जाणाऱ्या ह्या गावातील दोन अत्यंत विशेष उल्लेखनीय वास्तू आहेत, १७व्या शतकातील ब्रॅगांझा हाऊस आणि पोर्तुगीजपूर्व काळातील सारा फर्नांडिस वाडा

ब्रॅगांझा हाऊस – १७व्या शतकातील भव्य वाडा

एकापेक्षा एक पाहत राहावी अशी घरे असणाऱ्या ह्या चांदोर गावाला भेट देण्याचा योग नुकताच आला. ब्रॅगांझा हाऊस, जे मिनेझिस ब्रॅगांझा परेरा हाऊस म्हणूनही ओळखले जाते  ते पहाण्यासाठी म्हणूनच आम्ही तिथे गेलो होतो.

प्रचंड लांबीचे ब्रॅगांझा हाऊस हे चांदोऱच्या गावचौकाच्या संपूर्ण एका बाजूला पसरलेले असून रस्त्यावरूनच आपले लक्ष वेधून घेते.  हे दोन्ही भाग ब्रॅगांझाच्या वारसदारापैकी दोन वेगवेगळ्या कुटुंबांच्या मालकीचे आहेत.

Steps towards Braganza House
Crystal chandeliers,Braganza House

घरासमोर असलेल्या दोन्ही बाजूच्या, सुंदर झाडांनी सजलेल्या बागा, तेथील सुंदर दगडी बाक असे सारे पाहत आम्ही घरामध्ये प्रवेश केला. घराच्या पायऱ्या चढत असतानाच ह्या घराचं वय जाणवत होतं. अलिबाबाच्या गुहेच्या पायऱ्याच जणू आम्ही चढत आहोत असा काहीसा गमतीशीर विचार त्यावेळी माझ्या मनात आला. आतलं वैभव पाहिल्यानंतर माझ्या मनात आलेला हा विचार किती सार्थ होता असे मला वाटले.

ब्रॅगांझा हाऊस हे मूलतः फ्रान्सिस्को झेवियर यांच्या मालकीचे होते. त्यांना मुलगा नसल्याने पुढे त्यांच्या तीन मुलींपैकी दोन मुलींमध्ये हे घर पूर्व आणि पश्चिम असे दोन भागात विभागले गेले. हे दोन्ही भाग आता त्याच मुलींच्या कुटुंबांच्या मालकीचे आहे. पोर्तुगीज शैलीच्या ह्या अशा प्रकारातील हे गोव्यातील सर्वात मोठे घर मानले जाते.

Bedroom Braganza House
Living Room Braganza House
पश्चिम भाग – मिनेझिस-ब्रॅगांझा कुटुंबाचा वारसा

पश्चिम भाग मिनेझिस–ब्रॅगांझा कुटुंबाच्या वारसांच्या मालकीचा आहे. अतिशय उत्तमरित्या जतन केलेल्या ह्या भागामध्ये आपल्याला आकर्षित करतात ती जुन्या काळातील फर्निचर आणि अनेक दुर्मिळ वस्तू. अतिशय नेटक्या संग्रहालयाप्रमाणे जतन केलेल्या ह्या घरामध्ये बेल्जियन काचेचे देखणे झुंबर, इटालियन संगमरवरी फरशी आणि मकावहून आणलेल्या चिनी पोर्सिलीनच्या सुरया, हाताने पेंट केलेल्या जपानी सुरया, पोर्तुगाल, चीन व युरोपमधून आणलेल्या मौल्यवान प्राचीन वस्तू पाहायला मिळतात. 

संपूर्ण घरामधील भिंतींवरच्या अनेक चित्रातून आपल्याला मिनेझिस ब्रॅगांझांच्या पूर्वजांची ओळख होते. ज्यामध्ये जोव्हिएर मिनेझिस, स्वातंत्र्य सैनिक लुईस मिनेझिस इ.अनेकांची चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. जोव्हिएर मिनेझिस यांच्या चित्राच्या फ्रेम मध्ये हिंदू देवदेवतांची चित्रे कोरलेली आहेत. ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरीत होण्यापूर्वी हिंदू असल्याने त्यांच्या फ्रेममध्ये देवतांच्या मुर्त्या असल्याचे आम्हाला सांगितले गेले.

घराच्या एका भागात गोवा मुक्ती चळवळीत मोलाची भूमिका बजावलेले अग्रणी व्यक्तिमत्व, नामवंत पत्रकार लुईस मिनेझिस ब्रॅगांझा यांची व इतर मिळून एकूण ५००० पुस्तकांचे विस्तीर्ण ग्रंथालय आहे. चार विविध भाषांमधील ही पुस्तके लेदर बाइंड करून जतन करून ठेवलेली आहेत. इथले मूळ इंग्लिश व्हिक्टोरियन टाईल्सचे फ्लोअरिंग कुठल्याही हवामानात आणि दिवसाच्या कुठल्याही वेळी थंड राहते.

Furniture Braganza house

याशिवाय आपल्याला एक भव्य लांब लचक डाईनिंग रूम पाहायला मिळते. जवळ जवळ ६० माणसे एका वेळी बसू शकतील इतकी टेबले रूमच्या मध्ये मांडलेली आपल्याला दिसतात. डाईनिंग टेबलांची लांब ओळ पाहायला सुंदर दिसते. 

इथल्या एका बेडरूम मध्ये ह्या घराइतकेच जुने, सामान्य उंचीपेक्षा अधिक उंच आणि भव्य दोन पलंग आहेत. संपूर्ण घरामध्ये उत्तम प्रकाश जिथे पडतो अशा ठिकाणी लिहिण्याची टेबले मांडलेली आहेत. अनेक कप्पे आणि चोरकप्पा असणारे एक टेबल आम्ही अचंबित होऊन पाहत होतो.

दोन लोकांनी बसायच्या एका सोफाचे डिझाईन, दोघे बसल्यानंतर, समोरासमोर एकमेकांकडे पाहात बोलता येईल अशा पद्धतीचे आहे.. आराम खुर्च्यांच्या प्रकारात मोडणाऱ्या खुर्च्या, सूर्यास्ताच्या वेळी येणाऱ्या प्रकाशातून आतली जमीन रंगीबेरंगी करणाऱ्या खिडक्यांच्या अद्भुत काचा, सोन्याचे पातळ पत्रे बसवलेल्या फ्रेमचे मोठे आरसे, ह्याशिवाय बऱ्याच मौल्यवान आणि कुतूहल चाळवणाऱ्या वस्तू इथे पाहायला मिळतात.

Dining Hall Braganza House
पूर्व भाग – परेरा-ब्रॅगांझा कुटुंबाचे निवासस्थान

घराच्या पूर्व भागात परेरा–ब्रॅगांझा कुटुंब राहते. या भागातही जगभरातून गोळा केलेल्या अनेक दशकांपूर्वीच्या मौल्यवान प्राचीन वस्तूंचा संग्रह भरपूर प्रमाणात आहे. बेल्जियन आरसे, सुबक नक्षीचे रोझवूड फर्निचर घराच्या ऐश्वर्यात भर घालते.

सर्व फर्निचर इटालियन रचनेनुसार तयार केलेलेआहे, मात्र त्यासाठी वापरलेले लाकूड गोव्याचे (रोझवूड) आहे आणि कारागीरही गोव्यातीलच होते. काही खुर्च्या तब्बल ४५० वर्षे जुन्या असूनही आजही वापरण्यायोग्य होत्या. 

इटालियन फरशी असलेला प्रशस्त बॉलरूम हे येथील एक महत्त्वाचे आकर्षण आहे, आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे घरातील छोटी कौटुंबिक चैपल—ज्यामध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अवशेष तसेच वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत.

ब्रॅगांझा हाऊस: पर्यटकांसाठी खुले असलेले अद्भूत वारसास्थळ

वाड्याचे हे दोन्ही भाग पर्यटकांना पाहण्यासाठी खुले आहेत. भेटीसाठी दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही वेळ निश्चित केलेली आहे. परंतु दोन्ही भागातील कुटुंबाच्या सोयीनुसार अथवा व्यस्ततेनुसार वेळेमध्ये बदल होण्याची शक्यता असते. ह्या दोन्ही कुटुंबातील एखादा सदस्य किंवा प्रतिनिधी आपापल्या भागातील संपूर्ण घर फिरवून दाखवून आणतो. संपूर्ण घराची, तिथल्या वस्तूंची माहिती देतो.

ब्रॅगांझा हाऊस: प्रवेश शुल्क 

ह्या दोन्ही घराच्या प्रवेशासाठी मिळून प्रतिव्यक्ती ५०० रुपये देणगी स्वरूपात घेतले जातात. अर्थात एक भागातील घरासाठी २५० रुपये प्रवेश फी देणगी स्वरूपात स्वीकारली जाते. ह्या संपूर्ण ब्रॅगांझा हाऊसला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान मिळत नसल्याने प्रवेशासाठी घेतली जाणारी रक्कम वाड्याच्या देखभालीसाठी वापरली जाते.

ब्रागांझा हाऊस: स्थान
  • गाव: चांदोर
  • प्रदेश: दक्षिण गोवा, भारत
  • महत्वाची खूण : गावाच्या चौकात, चर्चजवळ ठळकपणे उभे आहे.
  • सहज पोहोचता येण्याजोगे: मडगावहून (सुमारे १५ किमी अंतर) सहज पोहोचता येते 
ब्रागांझा हाऊस – कसे पोहोचाल?

पणजी पासून चांदोर सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे. कार किंवा टॅक्सीने इथे पोचायला साधारण एक तास लागतो. पणजीहून जाताना राष्ट्रीय महामार्ग ६६ घ्या व मडगावहून घोगळ मार्गे  चांदोरकडे वळा.

मेनेझेस ब्रागांझा हाऊस पासून मडगाव रेल्वे स्टेशन सुमारे १० कि.मी., वास्को ३६ ते ३७ कि. मी.सावर्डे स्टेशन सगळ्यात जवळ ७ कि. मी. अंतरावरआहे. 

जर तुम्ही विमानाने जात असाल तर दाभोळी विमानतळ जवळ म्हणजे साधारण ३५ कि. मी. अंतरावर आहे. 

कॅटेगरी Goa

error: Content is protected !!