पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ!
गोवा! गोवा म्हटलं की गोव्याबाहेरील कितीतरी माणसं आनंदानी डुलायला लागतात. कुठे चार दिवस फिरायला जायचं म्हटलं तर पहिलं नाव असतं गोव्याचं! गोव्याच्या अगदी शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच नाही, तर दिल्लीपासून ते खाली दक्षिणेपर्यंत सगळ्यांचं लाडकं पर्यटनस्थळ गोवा! भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकही गोव्याच्या प्रेमात आहेत.
पूर्वी साधारण दिवाळीची सुट्टी, आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत असा वर्षातून दोनदा पर्यटनाचा हंगाम असायचा पण आता पावसाळा असो वा कडकडित उन्हाळा, पर्यटकांचा लोंढा गोव्याकडे लोटलेला असतो. पर्यटन हा गोव्याचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे गोवा सरकारही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या योजना राबवत असते आणि त्याची जोरदार जाहिरातही करत असते. जसे, पावसाळी पर्यटन, ट्रेकिंग, वॉटर राफ्टींग, क्रुज, कसिनो, कार्निव्हल वगैरे…
इनक्रेडिबल गोवा
तर एकेदिवशी कंटाळा आला म्हणून सहज टीव्ही चालू केला, चॅनल सर्फिंग करता करता एकदम नॅशनल जॉग्रॉफी चॅनेलवरती इनक्रेडिबल गोवा हा कार्यक्रम दिसला आणि तिथेच थबकले. सलीम अली पक्षी संग्रहालय, सुंदर निसर्ग, बीचेस, चर्च, गोव्यातला लोकल बाजार आणि इथले कॅसिनो असं सगळं दाखवण्यात आलं, हा सुंदर गोवा टीव्हीवर पाहताना अभिमानाने ऊर भरून येत होतं.
दोन दिवसांनी पुन्हा नॅशनल जॉग्रॉफी पाहताना गोव्याची जाहिरात पाहिली. त्यामध्येही चर्चेस, ठराविक मंदिरे, कॅसिनो, बीचेस आणि क्रूजेस हे एवढंच पाहायला मिळालं.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला पणजी कला अकादमी मध्ये पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात अनेक कसलेल्या सुप्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना बघण्याचा, ऐकण्याचा योग आला, तेंव्हा ह्या अशा अनेक महोत्सवांची आणि गोव्याच्या खऱ्या चेहऱ्याची बऱ्याच पर्यटकांना माहिती नसावी ह्याबद्दल वाईट वाटलं.


कलेचं माहेरघर
गोवा हे कलेचं माहेरघर. इथल्या लोकांचं कलेवर प्रचंड प्रेम. गोव्याने भारताला कलेच्या वेगवेगळ्या प्रांतातून अनेक मोठे कलाकार दिलेत.
इथले बरेच लोक कुठल्या ना कुठल्या कलेत पारंगत आहेत, जे नाहीत ते बऱ्यापैकी जाणकार आहेत आणि हे दोन्ही नसलं; म्हणजे जे कलाकारही नाहीत आणि ज्यांना त्या कलेतलं विशेष काही कळतही नाही ते दर्दी आहेत; त्यामुळे ते कलेवर आणि कलाकारांवर भरभरून प्रेम करतात.
इथे आपली कला सादर केलेल्या राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय कलाकारांनी; गोव्याकडून मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादाचा, गोवेकरांसारखं प्रेम आणखी कुठेच मिळत नसल्याचा आणि इथे परफॉर्म करायला आवडत असल्याचा उल्लेख केला नाही, असं क्वचितच झालं असेल.
हे जरी असं असलं तरी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना माहित असलेला गोवा मात्र खूप वेगळा आहे. त्यांची ह्या कला आणि संस्कृतीप्रेमी गोव्याशी अजिबात ओळख नाही. म्हणूनच गोवा हा पर्यटकांचा वेगळा आहे आणि इथे राहणाऱ्या लोकांचा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही.
गोवा पाहायला येणाऱ्या लोकांना इथे सर्वप्रथम आठवते ते मद्य अर्थात दारू, मग मत्स्याहार, कॅसिनो, बीचेस, जलसफरी आणि शेवटी उरतात चर्चेस व काही दोन-चार देवळे. अर्थात यात सर्वस्वी पर्यटकांचा दोष आहे असं म्हणता येणार नाही ; कारण पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी गोव्याची जी जाहिरात केली जात असे त्यात ह्याच गोष्टी प्रामुख्याने दाखवल्या जात. परंतु आता इंस्टाग्राम, फेसबुक आदी सामाजिक प्रसार माध्यमांमुळे हे चित्र हळूहळू बदलत आहे. तरीही गोव्याबद्दल काहीच माहिती नसलेल्या अधिकाधिक लोकांची गोवा म्हणजे फक्त मौज-मस्ती, चैन, उशृंखलपणा असाच समज आहे.
गोव्याबद्दलच्या काही खुळ्या समजुती
मी अशा काही जुन्या वळणाच्या लोकांना भेटलेय ज्यांनी उगाच गोव्याबद्दल गैरसमज करून घेतलाय.
मध्यंतरी महाराष्ट्रातील एका देवालयात एका धार्मिक वृत्तीच्या पोरसवदा व्यक्तीची ओळख झाली. मी त्याला आमचा गोवा पाहिला की नाही असं विचारलं तर म्हणाला, “छे छे मी नाही कधी गोव्यात येणार. गोवा चांगला नाही असं मला माझ्या आईने सांगितले आहे. तिथल्या मुली चांगल्या नसतात त्या कसलेही कपडे घालतात” हे ऐकून मला हसावं का रडावं तेच कळेना. मी त्यांना म्हटलं, “अहो मी ही गोव्याचीच आहे, तुम्ही जे समजताय तसं काही नाही, एकदा मुद्दाम येऊन पहा.”
तंग आणि शरीर उघडे टाकणारे कपडे घालणाऱ्या मुली आता सर्रास कुठल्याही शहरात पाहायला मिळतात आणि गोव्यात असे चित्रविचित्र कपडे, शॉर्ट्स वगैरे घालणाऱ्या बहुतेक मुली ह्या पर्यटक असतात. मुलीच नाही तर काही मोठ्या वयाच्या आणि आकारमानाच्या कितीतरी स्त्रिया गोव्यात आल्या की एकदम बंधनातून मुक्त झाल्यासारखे कपडे वापरतात. त्यांचे हे अवतार पाहिल्यानंतर त्या पर्यटक आहेत हे कुणाच्याही लक्षात येते.
गोव्याला कुप्रसिद्धी मिळवून देणारी दुसरी गोष्ट म्हणजे, दारू! तिलाही अधिक प्रसिद्धी मिळालेली आहे ती, तिच्या आकर्षणाने नियमित गोव्याला भेट देणाऱ्या तळीरामांमुळेच!
माझी मुंबईत राहणारी एक शाकाहारी मैत्रिण बोलता बोलता एकदा मला म्हणाली की ती शाकाहारी असल्यामुळे गोव्याला येत नाही कारण गोव्यात सगळे मत्स्याहारी… हा म्हणजे अज्ञानाचा कळस झाला!
गोव्याबद्दल लोकांच्या अशा किती गैरसमजुती आहेत कोण जाणे? फक्त शाकाहार घेणारे व अजिबात ड्रिंक्स न घेणारे कितीतरी लोक गोव्यात राहतात. पण इथे जीवाचा गोवा करायला येणाऱ्या लोकांना फक्त ड्रींक्स, मांसाहार, बीचेस, कसिनो इतकंच माहित असतं, या व्यतिरिक्त गोवा जाणून घेण्याची बहुतेकांची इच्छा नसते.
गोव्याचा समाज शांतताप्रिय, कला संस्कृतीचा उपासक, आणि उत्सवप्रिय
खरा गोवेकर नागरिक हा अतिशय शांतताप्रिय, धार्मिकवृत्तीचा आणि कला, नाटक, संगीत, इथली संस्कृती यांच्यावर प्रेम करणारा उत्सवप्रिय माणूस आहे. म्हणून येथे वर्षभर निरनिराळे उत्सव आनंदाने साजरे केले जातात.
इथे येणाऱ्या पर्यटकांना इथल्या कित्येक अप्रतिम देवळांची, प्रसिद्ध जत्रांची आणि फेस्तांची (फिस्ट), तसेच दरवर्षी आयोजित होणाऱ्या भजनी स्पर्धा, नाट्यस्पर्धा, कितीतरी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव, चित्रपट महोत्सव यांची अजिबात माहिती नसते. त्यांना माहित असतात फक्त एक-दोन मंदिरे आणि कार्निव्हल !
कार्निव्हल पर्यटकांना माहित आहे पण तितकाच अविस्मरणीय आणि गोवन संस्कृती आणि परंपरांनी नटलेला शिगमोत्सव बहुतांश पर्यटकांना माहित नाही. इथल्या लोकसंगीताचे, लोकनृत्यांचे अविष्कार आणि विविध पौराणिक चित्ररथ सामील असलेल्या मिरवणुकीचा हा अतिशय विलोभनीय देखावा, खूपच कमी पर्यटकांना माहित असतो.


गणेशचतुर्थी आणि दिवाळी गोवेकरांचे आवडते सण
गणेशचतुर्थी आणि दिवाळी हे गोवेकरांचे विशेष प्रिय सण. त्यातही गणेशोत्सव खास! सगळे गणेशभक्त गोवेकर ह्यावेळी वेळ काढून आपल्या मूळ घरी गणेश चतुर्थीसाठी एकत्र जमतातच!
महाराष्ट्र व इतर ठिकाणी गणपती अकरा दिवस असतो पण गोव्याच्या माशेल, कुंभारजुवे भागात तो खास एकवीस दिवस असतो. माशेल, कुंभारजुवे ही गावे म्हणजे कलेचा वरदहस्त लाभलेली गावे. ह्या गावांच्या मातीतच कला आहे असे म्हणायला हरकत नाही.
तर ह्या इथल्या कलाकारांच्या कल्पकतेतून निर्मिलेले गणपती आणि त्यांचे देखावे पाहण्यासाठी, २१ दिवस फक्त गोवाच नाही तर बांदा, सावंतवाडीपासून लोक ह्या गावातून गर्दी करतात. कोरोना नंतर दुर्दैवाने हा माशेल कुंभारजुवे भागातील सार्वजनिक गणेशोत्सव बंद झालेला आहे. तो लवकरात लवकर पुन्हा सुरु व्हावा ही अनेक गणेश भक्तांची इच्छा लवकर सफल होवो.
गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी
दिवाळीला इथे फराळाऐवजी गावठी पोह्यांचे पारंपारिक पदार्थ करून खाल्ले जातात. मोठमोठ्या आकाशकंदीलांच्या आणि नरकासुरांच्या स्पर्धा हे गोव्यातल्या दिवाळीचे आणखीन एक वैशिष्ट्य. नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री केले जाणारे मोठमोठे नरकासुराचे पुतळे ही सुद्धा गोव्यातल्या दिवाळीची खासियत! नरकचतुर्दशीच्या पहाटे हे पुतळे जाळले जातात, ज्यायोगे प्रतिकात्मकरित्या वाईटावर होणारा चांगल्याचा विजय दर्शविला जातो.
गणेश चतुर्थीच्या राज्यस्तरीय स्पर्धेप्रमाणेच, नरकासुरवधाच्या राज्यस्तरीय स्पर्धाही गोव्यात, विशेषकरून तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.
गोव्याचे ख्रिश्चन बांधवही कला संगीत प्रेमी, उत्सवप्रिय आणि शांतताप्रिय
फक्त हिंदू समाजच नाही तर गोव्याचा ख्रिश्चन समाजही तितकाच कला, संगीतप्रेमी आणि उत्सवप्रिय. कांतार, मान्डो संगीत; तसेच तियात्र हा नाटकाचा प्रकार, गोव्यातील ख्रिश्चन बांधवांचे अतिशय आवडते! त्याचप्रमाणे सांजाव, वेगवेगळे फेस्त, असे कितीतरी छोटे मोठे सण ते वर्षभर साजरे करतात. ख्रिसमसला येशूच्या गोठ्याची स्पर्धा आयोजित केली जाते. चर्चेस आणि ख्रिश्चन बांधवांच्या घरांसमोर येशूच्या गोठ्याचे देखावे उभे केलेले असतात.
फुटबॉल गोवेकरांचा प्रिय खेळ
कलेइतकंच; खेळांवरही, विशेषकरून फुटबॉलवर गोवेकरांचं खास प्रेम! कधी गोव्यात फिरताना, कुठल्याही गावातल्या एखाद्या क्रीडांगणावर पावसाळा असो वा कडकडीत ऊन फुटबॉल किंवा क्रिकेटचे सामने खेळतानाचे तरुण पाहायला मिळतात ते उगाच नाही.. असा एकूणच गोवेकर हा उत्सवप्रिय!
गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांचे वेगवेगळे दृष्टिकोन
परंतु जे पर्यटक गोवा भेटीला येतात, त्यातले काही थोडे पर्यटक इथल्या निसर्गाच्या आणि अथांग समुद्राच्या प्रेमात पडलेले आहेत. देवदर्शनासाठी येणारेही थोडेफार आहेत.. पण जास्तीतजास्त लोक हे फक्त खाओ, पीओ और मजा करो याच पठडीतले असतात, हेच पर्यटक पुन्हा आपल्या गावी गेल्यानंतर गोव्यात आपण जितकं पाहिलं, अनुभवलं तितकंच इतरांना सांगतात त्यामुळे उगाचच गोव्याबाहेरील लोकांची गोव्याबद्दल गैरसमजूत होऊन बसलेली आहे…..
गोवा – प्रतिमा आणि वास्तव यापलीकडे
तेंव्हा मित्रांनो गोवा म्हणजे फक्त मद्यपान, मांसाहार आणि कॅसिनो एवढंच नाही, तर याच्याशिवाय अतिशय नयनमनोहर निसर्गाबरोबरच सांस्कृतिक वारसा आणि कलेचं वरदान गोव्याला लाभलेलं आहे हे ही लक्षात घ्या.