कुठेही प्रवासाला गेलं की पहिला प्रश्न येतो तो राहण्याचा. एक स्वच्छ सर्व सोयींनी युक्त जागा आपल्याला विश्रांतीसाठी हवी असते. त्याप्रमाणे आपण हॉटेल शोधतो. आणि ह्या बेसिक गरजा पाहून एकाची निवड करतो. आमची वेंगुर्ला सफर अचानक ठरलेली. हॉटेल, होम स्टे वगैरेचा ऑनलाईन शोध न घेता आम्ही डायरेक्ट गेलो होतो. आम्ही पोचलो ती वेळही दुपारची होती. त्यामुळे आम्हाला हॉटेल शोधायला थोडे कठीण गेले. पण होते ते चांगल्यासाठीच. कारण बऱ्याच प्रयत्नानंतर एका खाण्याचा गाडा चालवणाऱ्या बाईंच्या कडून मांडवी नेचर होम स्टे ची माहिती मिळाली आणि आम्ही तिथे गेलो.
मांडवी नेचर होम स्टे
हा होम स्टे अतिशय शांत सुंदर परिसरात आहे. बंदर रोडवरून स्काय ब्रिज कडे जाताना सुरुवातीलाच डावीकडे एक वळण आहे. तिथेच थोडे पुढे गेले की मांडवी नेचर होम स्टे आहे. खोल्या तीनच आहेत पण अतिशय नेटक्या सुंदर आहेत.खोल्यांच्या छपरावर माडांच्या झावळ्यांचा वापर केलेला असल्याने परिसराला छान गावरान टच आलेला आहे. खोल्यांच्या बाहेरील अंगणात खुर्च्या टाकलेल्या असतात. छान फुलझाडे भाज्या लावलेल्या या अंगणात खुर्च्यांवर निवांत बसून शांत परिसराचा अनुभव घेता येतो. होम स्टे च्या मागूनच खाडी वाहते. अनेक पक्षांचा कलरव संध्याकाळच्या वेळी सुरु असतो त्यामुळे प्रसन्न वाटते. दोन वेळ अत्यंत अप्रतिम मालवणी घरगुती जेवण आणि नाश्ता येथे मिळतो. ह्या होम स्टे च्या ओनर सौ. हुले आणि मि. हुले अत्यंत बोलके मनमिळावू; घरी आलेल्या पाहुण्या सारखा त्यांनी आमचा पाहुणचार केला. सौ. हुलेंनी तर घावन, शिरवाळे (शिरवाळ्यो) आदि पदार्थ करतानाच्या काही टिप्सही मला सांगितल्या.
खरं तर आम्ही तिथे उशिरा पोचलो होतो. त्यामुळे रात्रीचे जेवण चुकले. सकाळचा नाश्ता करून आम्हाला पुढे लगेच मालवणला निघायचे असल्याने दुपारच्या जेवणाचा आस्वादही घेता आला नाही. परंतु नाश्त्याला घावन, बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याच्या चटणीचा बोटे चाटायला लावणारा अप्रतिम स्वाद घेतल्यानंतर आम्ही इथे पुन्हा यायचे ते जेवणावर ताव मारायला असे पक्के केले.
कांदळवन जल सफारी
मांडवी नेचर होम स्टे मध्ये सकाळी कांदळवन जल सफारी घडवून आणली जाते. कांदळवन वेंगुर्ला बंदराजवळील मांडवी खाडीत आहे. सागराजवळ वाढणाऱ्या अनेक वनस्पतींच्या समूहाला कांदळवन म्हणतात. समुद्री अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी कांदळवन अतिशय उपयुक्त असते. हे कांदळवन सुनामीचा, वादळाचा तडाखा अतिशय सक्षमपणे सहन करत आपला बचाव करते. त्यामुळे कांदळवनाचे संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे. ही सारी माहिती आम्हाला मिळाली ती आम्हाला कांदळवनाची जल सफारी करून आणणाऱ्या महिलांच्या समूहाकडून. अनेक महिलांनी एकत्र येऊन मॅन्ग्रूव्ह संवर्धनाचा घेतलेला हा ध्यास अत्यंत कौतुकास्पद आहे. जलसफारी करून आणण्यासाठी नाव चालवण्यापासून ते खारफुटीच्या (mangroves) आणि पक्षांच्या विविध प्रकारांची सखोल माहिती देण्याचे काम हे सर्व महिलाच करतात. महिलांनी एकत्र येऊन सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे हाती घेतलेले हे काम अतिशय कौतुकास्पद आणि प्रेरणादायक आहे.
हॉटेल की होम स्टे?
वेंगुर्ला हे हल्ली अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण बनलेले आहे. त्यामुळे इथे हॉटेल्स आणि होम स्टे अनेक झालेली आहेत. आम्हाला थोडासा उशीर झाल्याने आणि कुठेही हॉटेल न मिळण्याने होम स्टे मध्ये राहण्याचा पहिला वहिला अनुभव आम्ही घेतला. होम स्टे मध्ये जो आपलेपणा, घरगुती पणा मिळतो तो हॉटेल्स मध्ये मिळत नाही. दोन्ही वेळ मिळणारे घरगुती जेवण आणि नाश्ता आपल्याला आपल्याच कुणा नातेवाईकांच्या घरी राहायला आल्याचा फील देतो. शिवाय रेट ही परवडण्यासारखे असतात. त्यामुळे वेंगुर्ल्यात होम स्टे ची संख्या बरीच वाढलेली आहे. वेंगुर्ल्यातील इतर होम स्टे अजून अनुभवायची आहेत. त्यामुळे इथून पुढे वेंगुर्ल्याला जेव्हा जाऊ तेव्हा हॉटेल की होम स्टे असा प्रश्न मनाला पडलाच तर मी होम स्टेलाच माझे झुकते माप असेल. आणि त्यातही माझा पहिले प्राधान्य सदैव मांडवी नेचर होम स्टे लाच असणार हे निश्चित!.