आपण कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की सर्वात आधी डोक्यात येणारा प्रश्न म्हणजे—राहायचं कुठे? एक स्वच्छ, सर्व सोयींनी युक्त आणि किफायतशीर जागा आपल्याला विश्रांतीसाठी हवी असते. मग ते हॉटेल असो, बीच रिसॉर्ट असो किंवा एखादं शांत होमस्टे. ह्या बेसिक गरजा पाहून आपण एकाची निवड करतो.
आमच्या अलीकडच्या वेंगुर्ला प्रवासात आम्हालाही हाच अनुभव आला, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने.
हा प्रवास पूर्णपणे अचानक ठरला होता. कुठलीही आधीची बुकिंग नाही, “वेंगुर्ल्यातील सर्वोत्तम होमस्टे” असा काही शोध नाही, किंवा “बीचजवळील स्वस्त हॉटेल्स” याची यादी नाही. आम्ही फक्त निघालो.
जेव्हा आम्ही वेंगुर्ल्यात पोहोचलो, तेव्हा दुपार उलटून गेली होती आणि अचानक राहण्याची सोय शोधणं थोडं कठीण झालं.
मांडवी नेचर होमस्टे – वेंगुर्ल्यातील एका सुंदर होमस्टेचा शोध
आम्ही जवळपासच्या हॉटेल्समध्ये चौकशी करत होतो, पण बहुतेक ठिकाणी जागा उपलब्ध नव्हती. अशातच एका खाद्यपदार्थाचा गाडा चालवणाऱ्या बाईंनी आम्हाला मांडवी नेचर होमस्टे बद्दल सांगितलं.
दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला—आणि तो आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वात योग्य निर्णय ठरला.
बंदर रोडवरून वेंगुर्ला स्काय ब्रिज कडे जाताना सुरुवातीलाच डावीकडे एक वळण आहे तिथून थोडे पुढे गेले की हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण दिसतं.
निसर्गाच्या सान्निध्यातील सुंदर आणि शांत होमस्टे अनुभव
मांडवी नेचर होमस्टे पाहताच एक वेगळीच शांतता जाणवते. हे ठिकाण नेहमीच्या हॉटेलसारखं नाही, तर अगदी घरगुती आणि आपुलकीचं वाटतं.
इथे फक्त काहीच खोल्या आहेत, पण त्या अतिशय स्वच्छ, नेटक्या आणि सुंदर आहेत. नारळाच्या झावळ्यांनी बनवलेली छप्परं या ठिकाणाला खास कोकणी ग्रामीण स्पर्श देतात.
बाहेर छोटंसं अंगण, त्यात फुलझाडं आणि घरगुती भाजीपाला—बसून निवांत वेळ घालवण्यासाठी अगदी योग्य. होमस्टेच्या मागे शांतपणे वाहणारा खाडीचा प्रवाह आणि संध्याकाळी ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरण आणखी सुंदर बनवतो.
अस्सल मालवणी जेवणाचा अप्रतिम अनुभव
प्रवासात चांगलं जेवण मिळणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते, आणि इथे ते अगदी मनापासून दिलं जातं. दोन वेळ अप्रतिम असे शाकाहारी किंवा मांसाहारी मालवणी जेवण आणि सकाळचा चहा नास्ता.
मांडवी नेचरस्टे चे मालक श्री. व सौ. हुले यांनी आमचं स्वागत अगदी आपल्याच माणसांसारखं केलं. दोघेही बोलके आणि मनमिळावू; घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना दाखवतात तशी त्यांची आपुलकी आणि आदरातिथ्य मनाला भिडणारं होतं.
आम्ही उशिरा पोहोचलो असल्यामुळे रात्रीचं जेवण चुकलं, पण दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता मात्र अविस्मरणीय होता—मऊ घावन, बटाट्याची भाजी आणि ओल्या खोबऱ्याची चटपटीत चटणी.
मिसेस हुले स्वयंपाक करताना, शिरवाळे(शिरवळ्यो), घावन अशा काही पारंपरिक पदार्थांच्या टिप्सही सांगत होत्या. त्यामुळे हा अनुभव आणखी खास झाला.
नाश्त्यानंतर मात्र आम्ही ठरवलं—पुढच्या वेळी इथे खास मालवणी जेवणासाठीच यायचं!
वेंगुर्ल्यातील मँग्रूव्ह वॉटर सफारी – एक वेगळा आणि सुंदर अनुभव
इथला आणखी एक खास अनुभव म्हणजे कांदळवन जल सफारी (मँग्रूव्ह वॉटर सफारी). मांडवी नेचर होम स्टे मध्ये सकाळी कांदळवन जल सफारी घडवून आणली जाते. कांदळवन वेंगुर्ला बंदराजवळील मांडवी खाडीत आहे. सागराजवळ वाढणाऱ्या अनेक वनस्पतींच्या समूहाला कांदळवन (मँग्रूव्ह) म्हणतात.
सकाळी आम्ही वेंगुर्ला बंदर जवळील मांडवी खाडीमध्ये या सफारीसाठी गेलो. शांत पाण्यातून हळूहळू बोट पुढे जात असताना, आजुबजूचे दाट कांदळवन आणि तिथे विहरणारे विविध पक्षी पाहतानाचा आनंद काही विरळाच होता.
मँग्रूव्ह झाडं केवळ सुंदर नसतात, तर समुद्रकिनाऱ्याचं संरक्षण करणं, समुद्री जीवन टिकवणं यासाठीही खूप महत्त्वाची असतात.
समुद्री अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी कांदळवन अतिशय उपयुक्त असते. हे कांदळवन सुनामीचा, वादळाचा तडाखा अतिशय सक्षमपणे सहन करत आपला बचाव करते.
ही सारी माहिती आम्हाला मिळाली ती आम्हाला कांदळवनाची जल सफारी करून आणणाऱ्या महिलांच्या समूहाकडून.
स्थानिक महिलांचा हा गट हे या सफारीचं सर्वात खास वैशिष्ट्य होय. ही संपूर्ण सफारी हा महिला गट चालवतो. बोट चालवणं, माहिती देणं, पक्षी दाखवणं—सगळं त्या आत्मविश्वासाने आणि आवडीने करत होत्या.
अनेक महिलांनी एकत्र येऊन मँग्रूव्ह संवर्धनाचा घेतलेला हा ध्यास अत्यंत कौतुकास्पद आहे. जलसफारी करून आणण्यासाठी; नाव चालवण्यापासून ते खारफुटीच्या (mangroves) आणि पक्षांच्या विविध प्रकारांची सखोल माहिती देण्यापर्यंतचे काम हे सर्व महिलाच करतात. महिलांनी एकत्र येऊन सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे हाती घेतलेले हे काम अतिशय कौतुकास्पद आणि प्रेरणादायक आहे.
निसर्ग संवर्धन आणि महिलांचं सक्षमीकरण याचं हे अतिशय सुंदर उदाहरण इथे पाहायला मिळतं.
होमस्टे की हॉटेल? वेंगुर्ल्यात काय निवडावं?
आजकाल वेंगुर्ला हे पर्यटन स्थळ म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे इथे हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
पण या अनुभवामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली—होमस्टेचा अनुभव काही वेगळाच असतो.
इथे केवळ राहण्याची सोय नसते, तर आपुलकी, घरगुती वातावरण आणि स्थानिक जीवनशैलीचा अनुभव मिळतो.
वेंगुर्ल्यातील सर्वोत्तम किफायतशीर होमस्टे
मांडवी नेचर होमस्टेमधला आमचा मुक्काम जरी छोटा होता, तरी तो खूप खास ठरला.
शांत परिसर, चविष्ट जेवण, आणि मँग्रूव्ह सफारीसारखा वेगळा अनुभव—सगळंच लक्षात राहण्यासारखं होतं.
जर तुम्ही वेंगुर्ल्यात:
- किफायतशीर राहण्याची सोय
- निसर्गाच्या जवळचा अनुभव
- अस्सल मालवणी जेवण
- आणि काहीतरी वेगळं अनुभवायचं ठिकाण
शोधत असाल, तर मांडवी नेचर होमस्टे नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे.
आम्हाला हे ठिकाण योगायोगाने सापडलं, पण आता आम्ही पुन्हा तिथे जाणार आहोत—यावेळी पूर्ण अनुभव घेण्यासाठी.