लहानापासून थोरांचे आवडते दैवत म्हणजे गणपती! गोव्यामध्ये गणपतीची अनेक देवळे असतील, पण त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे ते खांडोळा येथील महागणपती मंदिर. फोंडा तालुक्यातील माशेलहून सावईवेरेला जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला मंदिराकडे जाणारी काहीशी उतरती वाट आहे. ह्या उतारावरून खाली येताच झाडांच्या सावलीत विसावलेले प्रांगण मनाला आधीच प्रसन्न करून जाते.

सभामंडप

प्रांगणातून देवळाचे मुख्य फाटक ओलांडून मंदिराच्या आवारात प्रवेश करताच, समोर मंदिराचा भला थोरला सभामंडप दिसतो. ज्याच्या उजव्या बाजूला रंगमंच आणि डाव्याबाजूला थोडी ऐसपैस जागा आहे.  सभामंडपातील रंगमंचाच्या दोन्ही बाजूला कालभैरव आणि निरंकाल यांची दोन देवळे आहेत. ह्या मंदिरापाठची कथाही मोठी रोचक आहे. रंगमंचाच्या वर महाभारत सांगणारे व्यास आणि ते लिहिणाऱ्या गणपतीचे सुरेख तैलचित्र आहे. तर रंगमंचाच्या विरुद्ध भिंतीवर अर्जुनाला गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे चित्र आहे.

श्रीकृष्ण अर्जुन तैलचित्र
गणेश वेदव्यास तैलचित्र

सर्वसामान्यपणे इतर देवळात आयताकृती उभा सभामंडप त्याच्या पुढे नगारखाना आणि मग चौक अशी रचना असते. पण इथला सभामंडप आडवा आहे आणि सरळ पलीकडे मुख्य मंदिर नसून सभामंडपाच्या डाव्या बाजूला शेवटच्या कोपऱ्यात आपल्याला मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात.

टुमदार मंदिर आणि चतुर्भुज मूर्ती

टुमदार असे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळसही घुमटाऐवजी, पिरॅमिडच्या आकाराच्या सुंदर कौलारू छतावर आहे. बाकी मंदिराचे स्वरूप इतर गोवन मंदिरासारखेच आहे.

मंदिराच्या पायऱ्या चढून वर जाताच नगारखाना आणि मग चौक. सामान्यतः गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला दिसणारे जय-विजय, आपल्याला इथे मंदिराकडे जाणाऱ्या शेवटच्या पायऱ्या चढून वर जाताच असलेल्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर पाहायला मिळतात. चौकातील आठ खांबांवर अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहातील मुख्य मूर्ती चतुर्भुज बैठी आणि काळ्या पाषाणाची आहे. जी पाहत राहावी अशी सुंदर आहे. गर्भगृहाच्या मुख्य द्वाराच्या वरती गणेश, ऋद्धी-सिद्धी, सरस्वती आणि कार्तिकेय यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. ह्या द्वाराबाहेर वरच्या बाजूला आपल्याला कृत्रिम फळांची माटोळी दिसते. गोव्यामध्ये माटोळी हा गणेश चतुर्थीतील अविभाज्य घटक आहे .

महागणपती
लक्ष्मी नारायण, रवळनाथ आणि शांतादुर्गा

प्रदक्षिणेच्या वाटेवर डाव्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे. तिथून प्रवेश करताच; महालक्ष्मी, रवळनाथ आणि सूर्यनारायण लक्ष्मीनारायण यांची छोटी मंदिरे आहेत. ज्यांना कपाट असे म्हटले जाते. ह्या दोन्ही मंदिरांच्या मध्ये एक छोटी विहीर आहे ज्यातील जलाने गणपतीला अभिषेक केला जातो. पुढे शांतादुर्गेचे मंदिर आहे. कलशावर चांदीचा सुदंर मुखवटा अशा स्वरूपात आपल्याला इथे शांतादुर्गेचे दर्शन होते.

लक्ष्मी नारायण, रवळनाथ जिथे आहेत त्याच्या बरोबर समोर असणाऱ्या हॉल मध्ये; इच्छुक भक्त पुरोहितांकडून गणेशाची पूजा अनुष्ठाने करून घेतात. विशेषतः अशी अनुष्ठाने विनायकी आणि संकष्टी चतुर्थीला केली जातात.

मंदिर प्राकार

मंदिर प्राकारातच सभामंडपाच्या पलीकडे पुरोहितांची घरे आहेत. मंदिराचे मुख्य फाटक ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला एक पार आहे, ज्यावर एक छोटीशी घुमटी आहे. त्यानंतर काही सुंदर झाडे आणि शेवटच्या बाजूला एक पिंपळाचा पार आहे. शिवाय याच बाजूला दोन तीन महाजनांच्या कुलपुरुषांची छोटी देवळे आहेत.

मंदिराच्या बाहेरून प्रदक्षिणामार्गावरून प्रदक्षिणा घालताना बाजूच्या हिरव्यागार झाडांनी नटलेल्या निसर्गाचे दर्शन होते. मंदिराच्या मागच्या बाजूस म्हणजे आतील विहिरीच्या बरोबर मागे क्षेत्रपाल राखणदार आहे. पुजाऱ्यांच्या घरांच्या बाजूला मंदिर प्रकारातून बाहेर जाण्याचे दुसरे छोटे फाटक आहे व इथे मंदिराची तळी आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी महागणपती
शांतादुर्गा, खांडोळा
मंदिराचा इतिहास

ह्या महागणपतीचे मुख्य स्थान हे तिसवाडी तालुक्यातील दिवाडी बेटावर होते. जे पुराण काळात एक तीर्थक्षेत्र समजले जाई. स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये ह्या बेटाचा दीपवती असा उल्लेख केलेला आहे. पोर्तुगीजांनी आदिलशहाच्या ताब्यातील तिसवाडी, बार्देश आणि सालसेत ही ठिकाणी जिंकून घेतली. त्यावेळी ह्या गणपतीचे स्थलांतर खांडेपार येथे करण्यात आले. परंतु काही भक्तांचा याला विरोध असल्याने मूर्ती डिचोली तालुक्यातील नार्वे येथील हिंदळे ह्या गावात हलवण्यात आली.

पुढे पोर्तुगीजांनी डिचोली तालुका जिंकल्यानंतर पुन्हा मूर्तीचे स्थलांतर खांडोळा येथे करण्यात आले. गणेशाची अतिशय पुरातन मूर्ती पुन्हा पुन्हा स्थलांतरित करावी लागल्याने काही प्रमाणात भग्न झाली. त्यामुळे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे शके १८९० च्या माघ शुक्ल त्रयोदशीला नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रथेनुसार नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताच जुन्या मूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते. परंतु काही विचित्र घटना घडल्याने त्या मूर्तीचे जलामध्ये विसर्जन करता आले नाही, तेव्हा श्री गणेशाचा कौल घेण्यात आला त्यावेळी ही मूर्ती नव्या मूर्तीच्या उजव्या हाताला थोड्या उंचावर ठेवण्यात यावी असा कौल मिळाला. त्याप्रमाणे ही मूळ मूर्ती आजही आपल्याला मंदिरात पाहायला मिळते.

दिवाडी येथील भग्न झालेले मूळ मंदिर हे तांबडी सुर्ल येथील महादेवाच्या मंदिराप्रमाणे दगडाचे होते असे काही इतिहासकारांचे मत आहे.

निरंकाळ आणि कालभैरव मंदिराची कथा

बाहेर असलेल्या छोट्या काळभैरव मंदिराच्या मागेही एक कथा सांगितली जाते. ही मूर्ती मूळचे दिवाडीचे असलेले इतिहासकार श्री परेरा ह्यांनी मंदिराला दिलेली आहे. त्यांच्या मूळच्या वडिलोपार्जित घरामध्ये हा पाषाणाचा अवशेष त्यांना सापडला. काय आहे ते न कळल्यामुळे त्याचा भात मोजण्यासाठी वजन म्हणून वापर करण्यात यावा असे ठरले गेले. पण तो पाषाण मूळ वजनापेक्षा किंचित अधिक वजन करू लागला. त्यामुळे त्या पाषाणाचा एक कोपरा काढून टाकण्यात आला. तरीही तो अधिकच वजन दाखवत असे. पुन्हा एकदा त्या पाषाणाचा आणखी काही भाग काढून टाकण्यात आला; परंतु तरीही पुन्हा तेच घडले.

हा प्रकार पाहून आश्चर्याने थक्क झालेल्या ह्या कुटुंबाने तो पाषाण व आणखीन एक कोरीव अवशेष खांडोळ्याच्या गणपतीच्या मंदिराला देण्याचे ठरवले. तिथे जेव्हा कौल घेण्यात आला तेव्हा तो अवशेष बाहेर कालभैरव म्हणून स्थापित करण्यात यावा असा कौल मिळाला. कालभैरव आणि निरंकाळ अशी दोन्ही मंदिरे आपल्याला बाहेर सभागृहाच्या शेजारी पाहायला मिळतात.

पणजी खांडोळा अंतर

खांडोळा येथील महागणपतीचे हे सुंदर मंदिर पणजी पासून साधारण २० कि.मी. अंतरावर आहे.  माशेल येथील देवकीकृष्ण आणि सावईवेरे येथील अनंत देवस्थान ही प्रसिद्ध मंदिरेही इथून अवघ्या काही अंतरावर आहेत, त्यामुळे महागणपती देवस्थानाला भेट देताना ह्या दोन्ही मंदिरांना भेट देणेही सहज शक्य होते.  

कॅटेगरी Goan Temples