शेवग्याच्या भाजीला गोव्याच्या कोकणी भाषेमध्ये मस्काची भाजी म्हणतात. शेवग्याच्या पानांची ही भाजी गोव्यामध्ये पावसाळ्यात भरपूर मिळते. मस्काची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्याने पावसाळ्याच्या मोसमात गोवेकर ही भाजी एकदा तरी जरूर खातो.
बहुगुणी शेवग्याचे औषधी महत्व आता लोकांनाही कळू लागले आहे. विविध व्हिटॅमिन्सनी भरपूर, वजन कमी करण्यासाठी व रक्तातील साखरेचे आणि कोलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी शेवगा अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शेवग्याच्या पानांची ही भाजी नियमितपणे आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये जरूर खावी.
गोव्यामध्ये मस्काची, भिकणा म्हणजे फणसाच्या आठळ्या घालून सुकी भाजी करतात, ती अत्यंत चविष्ट लागते. थोडीशी तुरट असल्यामुळे लहान मुले ही भाजी खाण्यास टाळाटाळ करू शकतात; परंतु थोडे गूळ घालून आणि वरून भरपूर ओले खोबरे पेरून ही भाजी केली तर तिचा तुरटपणा कमी होतो आणि भाजीही रुचकर लागते.

भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य
- मस्काची भाजी: चार लोकांना पुरेल इतकी
- फणसाच्या आठळ्या (भिकणा): १० ते १२
- कांदा: एक मोठा
- तुरीची अथवा मुगाची भिजवलेली डाळ: दोन मोठे चमचे
- ओली मिरची: ५ ते ६
- लसूण: एक गड्डा
- ओले खोबरे: एक वाटी
- हळद: १/४ चमचा
- किसलेला गूळ: एक मोठा चमचा
- मीठ: चवीपुरते
- खोबरेल तेल (शक्यतो कच्च्या घाणीचे): एक मोठा चमचा

कृती
- मस्काची पाने देठापासून वेगळी करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.
- कांदा, मिरची बारीक चिरून घ्यावे.
- लसूणीच्या पाकळ्या ठेचून त्याची साले काढून टाकावी.
- एका पॅनमध्ये तेल गरम करावे व त्यामध्ये लसूण टाकावी.
- लसूण थोडी तांबूस झाली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा.
- कांदाही तांबूस रंगावर परतून घ्यावा,त्यामध्ये हळद टाकून पुन्हा परतावा.
- त्यानंतर त्यामध्ये फणसाच्या आठळ्या, थोडेसे मीठ आणि पाणी घालून आठळ्या थोड्या शिजवून घ्याव्या.
- आठळ्या शिजल्या की त्यामध्ये भिजवलेली डाळ व चिरलेली मस्काची भाजी घालावी.
- भाजी बेताने बुडेल इतके पाणी घालावे व झाकून ठेवून भाजी शिजू द्यावी.
- पाच मिनिटांनी भाजी शिजली का पाहावे. त्यामध्ये गूळ घालावा. भाजी खूप शिजवू नये.
- भाजीमध्ये पाणी राहिले असल्यास पॅनवरील झाकण काढून ते आटू द्यावे.
- संपूर्ण पाणी आटले की त्यामध्ये ओले खोबरे व मीठ घालून सगळे एकत्र करावे आणि गॅस बंद करावा
मस्काची, भिकणा घालून केलेली भाजी, डाळभाताबरोबर तोंडी लावणे म्हणून अथवा चपातीबरोबर खावी.