मये तलाव, गोवा – निसर्गप्रेमी आणि जलसफरीच्या चाहत्यांसाठी शांत निवांत ठिकाण

माणसाच्या मनात पाण्याबद्दल एक वेगळीच ओढ असते. काही प्रमाणात भीती वाटत असली तरी त्याचे आकर्षण मात्र कमी होत नाही.  विशेषतः ज्या लोकांच्या जवळपास, नदी नाही, समुद्र नाही किंवा एखादा तलावही नाही अशांना जलाचे साठे पाहायला, नौकाविहार करून ह्या पाण्याचा जवळून अनुभव घ्यायला अतिशय आवडतं. हा असा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक मुद्दाम गोव्याच्या सफरीला येतात.

जर तुम्हालाही पाण्याचे आकर्षण असेल, बोटिंग करण्याची विशेष आवड असेल आणि  काहीवेळ शांततेने पाण्याच्या सानिध्यात घालवायचा असेल तर गोव्यातील मये तलावाला तुमच्या गोवा ट्रॅव्हल प्लॅनमध्ये नक्की स्थान द्या.

Mayem Lake View
मये तलावाची माहिती

मये तलाव, ज्याला मये वॉटरबॉडी असेही म्हटले जाते, उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यामध्ये आहे. हा सुंदर मानवनिर्मित गोड्या पाण्याचा तलाव मये ह्या शांत गावामध्ये आहे. हिरवागार परिसर आणि टेकडयांनी वेढलेला हा तलाव शहराच्या गजबजाटापासून दूर असल्याने निसर्गरम्य अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

स्थानिक तसेच देशी-विदेशी पर्यटकांमध्ये मये तलाव अत्यंत आवडीचे सहलीचे ठिकाण आहे. गजबजलेल्या बीचेसपासून दूर, शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.

बोटिंग आणि निसर्गाचा अनुभव

गोव्यामध्ये विशेषतः बोटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या मये तलावामध्ये पर्यटकांना खालील प्रकारच्या बोटींचा आनंद घेता येतो:

  • पेडल बोट
  • बॅटरीवर चालणाऱ्या बोटी

जलसफरी बरोबरच ज्यांना पक्षी निरीक्षण करायला आवडते व तलावाच्या जवळपास विश्रांती घेणे पसंत असते त्यांच्यासाठीही हे योग्य ठिकाण आहे.

पक्षीनिरीक्षण करण्यासाठी गोव्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी हे एक आहे. त्याचबरोबर कौटुंबिक सहलीसाठी, मित्रपरिवारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठीसुद्धा ह्या तलावाचा परिसर अनेकांचा आवडता आहे.

बोटिंग करताना किंवा तलावाच्या काठावरून फेरफटका मारताना झाडांच्या फांद्यावर विसावलेले किंवा पाण्यावरून अलगद झेपावणारे पक्षी इथे सहज लक्ष वेधून घेतात. निसर्गप्रेमींसाठी हे एक खास आकर्षण आहे. 

Bird in Mayem Lake
विविध उपक्रम आणि आकर्षणे

मये तलाव केवळ बोटिंगपुरता मर्यादित नाही, तर येथे सर्व वयोगटांसाठी विविध आकर्षणे आहेत.

बोटिंग हे इथले मुख्य आकर्षण असले तरी इथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे.

२०२५ च्या उत्तरार्धापासून इथे बंजी जम्पिंगही सुरु केलेले आहे. साहसी खेळांची आवड असलेल्यांसाठी हे नक्कीच एक खास आकर्षण आहे.

मासेमारीची आवड असलेले इथे मासेमारीही करू शकतात.

मिरर मेझ किंवा आरशाचा भूलभुलैया हे तलावाच्या आवारात असलेले आणखीन एक आकर्षण आहे.

या अशा विविध उपक्रमांमुळे मये तलाव; कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीचा आनंद लुटू इच्छिणाऱ्यांसाठी आणि साहसी पर्यटन करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

स्थान आणि कसे पोहोचाल

मये तलाव हा पणजीपासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर आहे. म्हापसा आणि थिवी मार्गे येथे सहज पोहोचता येते.

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे थिवीम रेल्वे स्थानक, जे सुमारे ९ कि.मी. अंतरावर आहे.

भेट देण्याचा उत्तम काळ

मये तलाव वर्षभर आकर्षक दिसतो. तरी पर्यटन हंगामात म्हणजे गोवा पर्यटनासाठी उत्तम असलेला ऑक्टोबर ते मार्च महिन्याचा काळ इथे भेटीला येण्याचा अनुकूल काळ मानला जातो.

तथापि, पावसाळ्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) इथे भेट देण्याचा आनंद काही और असतो. संपूर्ण परिसर हिरवागार होतो. गोव्याचे मूळचे निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलते. त्यामुळे पावसाळी पर्यटन (मॉनसून ट्रॅव्हल इन गोवा) आवडणाऱ्यांसाठीही हे ठिकाण उत्तम आहे.

Bird in mayem lake
जेवण आणि निवास व्यवस्था

तलाव परिसरात रेस्टॉरंट्स उपलब्ध असल्याने पर्यटकांच्या जेवणाची सोय सहज होते. तसेच इथे गिटीडीसीचे  हॉटेल मये लेक व्ह्यू असल्याने पर्यटकांना तलावाच्या आवारात राहून पर्यटनाचा आनंद घेता येतो.

मये लेक जवळील इतर पर्यटन स्थळे

सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे – महादेवाचे ऐतिहासिक महत्व असलेले मंदिर

लईराई मंदिर, शिरगाव – अग्निदिव्यासाठी प्रसिद्ध मंदिर

हरवळे – रुद्रेश्वर मंदिर, हरवळे धबधबा आणि पांडव केव्हज् साठी प्रसिद्ध   

मये तलावाला का भेट द्यावी?

उत्तर गोव्यामधील निसर्गाच्या सान्निध्यातील शांत असे चाकोरीबाहेरील (ऑफबीट प्लेस) पर्यटन स्थळ जिथे कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायला मिळेल. मित्रांसोबत बोटिंग, साहसी खेळ यांचा अनुभव घेता येईल, मित्रपरिवारासोबत सहल, पक्षीनिरीक्षण; यासाठी निसर्गरम्य पिकनिक स्पॉट हवा असेल तर मये तलावाला पर्याय नाही.

सर्वसाधारणपणे गोव्याचे पर्यटन ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे अशा बीचेस, कॅसिनोज, क्लब्ज व्यतिरिक्त वेगळ्या पर्यटनासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी मये तलाव एक उत्तम स्थान आहे.

कॅटेगरी Goa

error: Content is protected !!