अनंत देवस्थानाचे दर्शन घेऊन परतत असताना वाटेत बेतकी येथे मंडोदरी देवस्थान असा बोर्ड वाचला. मंडोदरीचे एकमेव देवस्थान असाही तिथे उल्लेख केलेला होता.  मंदोदरीऐवजी मंडोदरी अशी चूक ह्या बोर्डवर कशी काय केली याची चर्चा करत आम्ही डावीकडचे वळण घेत  हे देवस्थान पाहण्यासाठी निघालो. अरुंद असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या नारळी पोफळीच्या बागा पहात आम्ही साधारण २००. मी. अंतरावर असलेल्या देवस्थानापाशी पोचलो.

बऱ्यापैकी जुने दिसणारे हे मंदिर पाहण्यासाठी आम्ही आत प्रवेश केला. मुख्य गेट मधून प्रवेश करताच उजव्या बाजूला लक्ष्मी रवळनाथाचे मंदिर आहे तर डाव्या बाजूला मंडोदरी देवस्थानाचे सभागृह आहे.  मंडोदरीचे मुख्य मंदिर छोटेच परंतु आकर्षक आहे.

मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एका छोटयाशा पॅसेजवजा खोलीनंतर थेट चौक आहे. प्रशस्त आणि रुंद चौकातून गाभाऱ्यातील प्रसन्न मंडोदरी देवीचे दर्शन घेतले. देवीची मूर्ती चतुर्भुज असून कृष्णशिलेची आहे.

अजूनही माझ्या मनात मंदोदरी ऐवजी सर्वत्र मंडोदरी का लिहिले आहे अशी शंका होती. ती मी तेथे उपस्थित देवस्थानाच्या एका व्यक्तीला बोलून दाखवली. तेव्हा ही मंदोदरी म्हणजे रावण पत्नी मंदोदरी नसून ‘मंड’ म्हणजे पाणी आणि ‘उदर’ म्हणजे पोट, म्हणून ‘मंडोदरी’ असे कळले. पाण्यामध्ये जन्मलेली ही जलदेवता, अशी तिच्या भक्तांची श्रद्धा आहे. पुढे ह्या मंदिराची आणि देवीची कथा कळाली ती अशी–

निसर्गाने नटलेल्या ह्या बेतकी गावाला असंख्य झऱ्यांचे वरदान लाभलेले होते. पावसाळ्यामध्ये वाहणाऱ्या ह्या असंख्य झऱ्यांचे सारे पाणी वाहून वाया जाण्याऐवजी त्याची साठवणूक करावी म्हणजे शेती आणि फलोत्पादनासाठी त्याचा उपयोग करता येईल; तसेच गावाला वर्षभर पाणी पुरवठा होईल असा विचार गावकऱ्यांनी केला. त्यासाठी एक मोठ्या तलावासाठी खोदकाम सुरु करण्यात आले. परंतु गावकऱ्यांचा हा प्रयत्न सफल होत नव्हता. त्यामुळे निराश झालेल्या गावकऱ्यांनी देवीचा कौल घेण्याचे ठरवले. तेव्हा काम सफल व्हायचे असल्यास दोन भावंडांचा बळी देण्यात यावा असा कौल मिळाला.

जिथे तलाव खोदण्याचे काम सुरु होते, तिथे जवळच एक विधवा स्त्री आपली मुलगी मंदोदरी आणि मुलगा नारबांदोसह राहत होती. ही दोन भावंडे बळी देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. पण घडले असे की तिथे पाण्यामध्ये असलेले कमळ काढण्यासाठी भाऊ गेला असता तो पाण्यामध्ये खेचला गेला, त्याचा हात पकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारी मंदोदरीही पाण्यामध्ये खेचली गेली व अशाप्रकारे दोन्ही भावंडांचा पाण्याने बळी घेतला. तलावाचे काम पुढे यशस्वी झाले आणि मंडोदरीचे तळे म्हणून प्रसिद्ध असलेला राज्यातील सर्वात मोठा मानव निर्मित तलाव पूर्ण झाला.

परंतु कथेला पुढे वेगळेच वळण मिळाले. आपल्या मुलांचा बळी गेल्याचे पाहताच रागावलेल्या आईने संपूर्ण गावाला; ‘इथून पुढची चोवीस वर्षे गावात भात शेती पिकणार नाही’ असा शाप दिला. आता तिथे पाण्याचा तलाव असूनही काही उपयोग नव्हता. त्यामुळे गावकरी गाव सोडून गेले.

नेमक्या याच काळात वेर्णा येथील फडते गावकर समाज पोर्तुगीजांच्या छळाला त्रासून बेतकी गावात स्थलांतरीत झाला. तिथे येताच त्यांना शापाची सर्व कथा कळली. त्या दुःखी आईकडे जाऊन त्यांनी उःशाप मागायचे ठरवले, परंतु तोपर्यंत ती विधवा दुःखिता गाव सोडून गेली होती. तिचा माग काढत त्यांनी तिच्याकडे उःशाप मागितला. त्यावेळी ‘२४ वर्षे भात पिकणार नाही’ ऐवजी ‘२४ तास भात शिजणार नाही’ असा तिने उःशाप दिला.

मंडोदरी देवी बेतकी

समाधानाने परतलेल्या गावकऱ्यांनी मग तलावाजवळ मंदोदरी आणि नारबांदोच्या स्मरणार्थ मंदिर बांधले. पुढे मंडोदरी देवीचे स्थलांतर सध्या ज्याठिकाणी मंदिर आहे तिथे केले गेले. ‘मंडोदरी’ हीच त्या तलावाची जननी असा येथील ग्रामस्थांचा गाढ विश्वास आहे.

आजही बेतकी गावात वर्षातील एक दिवस अन्न न शिजवता केवळ फराळ केला जातो. हा दिवस मंडोदरीचा कौल घेऊन ठरवण्यात येतो. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मंडोदरी देवस्थानात पालखी मिरवणूक काढून देवीची पूजा केली जाते.

येथील मुख्य जत्रा म्हणजे काला, हा उत्सव मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी होतो.

सांतेरी देवी, बेतकी
ग्रामपुरुष,बेतकी

संपूर्ण बेतकी गाव नारळी पोफळींच्या बागांनी समृद्ध आहे. मंडोदरीच्या मंदिराशेजारी सांतेरी देवीचे मंदिर आहे. अतिशय सुंदर अशा  कोरीव सांतेरी देवीच्या मूर्तीच्या पाठीमागे भले मोठे वारूळ आहे. ह्या मंदिराच्या बाजूला ग्रामपुरुषाचे मंदिर आहे. ग्रामपुरुषाची मूर्तीही सुबक आहे.

अचानक न ठरवता आणि काहीही माहित नसता झालेले हे मंडोदरी देवीचे आणि कुळागरांनी नटलेल्या सुंदर बेतकी गावाचे दर्शन खूप सुखकर होते.

कॅटेगरी Goan Temples