माझे कुलदैवत महालसा. तिथे जाताना नेहमी मंगेशी वरून जाणे होत असते. परंतु महालसेला जाताना किंवा येताना मंगेशीला काही जाणं होत नाही. तिथे येणाऱ्या चित्रविचित्र पोषाखातल्या देशी पर्यटकांच्या लोंढ्यामुळे असेल कदाचित पण मंगेशीला जाणे अगदीच क्वचित होत असे. मंगेशी दर्शनाची खूपच ओढ लागली तर मग या बाकीच्या गोष्टींकडे काणाडोळा करून आम्ही मंगेशाचे दर्शन घेण्यास जात असू.
मंगेशी नवरात्रोत्सवाबद्दल, जत्रोत्सवाबद्दल खूप ऐकले होते पण जाणे होत नव्हते. तो योग ह्या वर्षी आला. गेल्या वर्षभरात पूर्वीच्या तुलनेत मंगेशी दर्शनही थोडे अधिक वेळा झाले. नवरात्रीत एके रात्री मंगेशी मखराचा अभूतपूर्व आनंद घेतला. जत्रोत्सवाला जाण्याचा योग अगदी शेवटच्या क्षणी आला. मंगेशीच्या जत्रेला एक दिवस तरी जावेच असे मला खूप वाटू लागले. मधल्या दिवशी जाणे शक्य नव्हते, राहता राहिला शनिवार! तो होता जत्रेचा शेवटचा दिवस. शनिवारी मध्यरात्री, रविवारी पहाटे म्हटलं तर अधिक योग्य होईल खरंतर… ज्या दिवशी मंगेशाचा थोरला रथ असतो, त्या दिवशी जाण्याचे निश्चित झाले. पहिला प्रश्न होता भल्या पहाटे चारला जाणे जमेल का? मनाने तर काही केल्या जायचंच असा निर्णय केलेला. आम्ही मंगेशीचे महाजन नसल्याने तिथला कार्यक्रम काय कसा असतो याची अजिबात कल्पना नव्हती. शेवटी, महाजन असलेल्या एका मित्रास मिस्टरांनी फोन केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शनिवारी आठपर्यंत पोचावे, दर्शन वगैरे घेऊन तिथेच महाप्रसाद घ्यावा, जत्रा पाहावी. अगदीच वाटलं थोडं पडावं तर आपली खोली आहे तिथे येऊन थोडा वेळ विश्रांती घ्यावी. असा सल्ला मिळाल्याने आम्ही आठ पर्यंत मंगेशीला पोचलो.
बाहेरच्या पार्किंगसाठी असणाऱ्या ग्राउंडवरच्या गाड्या पाहिल्यावरच आम्हाला जत्रेच्या गर्दीची कल्पना आली होती. गाडी पार्क करून आम्ही चालत मंदिराकडे निघालो. पूर्ण रस्त्यावर आणि मंदिराच्या परिसरात खाण्याचे स्टॉल्स, विविध वस्तूंची, खेळण्याची, चणे, खाजे इत्यादींची दुकाने थाटलेली होती. तिथे वस्तू खरेदी करण्यासाठी आणि जिव्हापुर्ती करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मंगेशी मंदिर आणि परिसरातल्या इमारती विद्युत रोषणाईने चमकत होत्या. हे विलोभनीय दृश्य पाहत आम्ही मंदिरात जाणाऱ्या रांगेमध्ये उभे राहिलो. रांगेतून सरकत सरकत गाभाऱ्यापाशी आलो तर तिथे भक्तांची हीss गर्दी. कसेबसे पाय उंचावून दर्शन घेतले. थोडेसे टेकलो आणि महाप्रसाद घेण्यासाठी मांगिरीश मठाच्या दिशेने निघालो. गर्दी हळूहळू वाढू लागली होती. मठातील भगवती हॉल मध्ये जेवण होते. तिथेही भली मोठी रांग लागली होती. .
भात, आमटी, साखरभात, मुगागाठी, खतखते, खीर, सुकी मिक्स भाजी, लोणचे, सोलकढी ह्या साऱ्या पक्वांनांनी ताट भरून गेले. वाढणारे शांत प्रसन्न चेहऱ्याने जेवण वाढत होते. जेवणाची चव चाखली मात्र, व्वा!! एरव्ही एकदाच वाढून घेऊन तृप्त होणारी मी आज दुसरा राउंड मारण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. दुसऱ्या खेपेसही हवे ते, हवे तितके वाढले जात होते. तृप्त मनाने आणि भरलेल्या पोटाने आम्ही पुन्हा देवळाकडे परतलो. तोपर्यंत दर्शनाची रांग मंदिराच्या बाहेरील रस्त्यावरील पायऱ्यांच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोचली होती. त्यातून वाट काढत आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारात पोचलो. आजूबाजूची दुकाने न्याहाळता न्याहाळता काही ओळखीची मित्र मंडळी भेटली आणि गप्पांचा फड जमला. बघता बघता अकरा वाजत आले. मला निवांत मंदिरात जाऊन बसायचे होते. देवळातली गर्दी वाढतच होती, तिथे बसायलाही जागा नव्हती. आम्हाला आपल्या खोलीत विश्रांती घेण्यासाठी ज्यांनी सांगितले होते ते कमिटीमेंबर असल्याने इतके व्यस्त होते की त्यांची भेट होत नव्हती. अकरा सव्वा अकरा नंतर मी मंदिरात जाऊन एका खिडकीत स्थिरावले. बारा नंतर थोडी थोडी गर्दी कमी होऊ लागल्यानंतर मी मंगेशासमोर पुढच्या चौकात आसनस्थ झाले. अहाहा! काय वर्णावे संपूर्ण सुवर्णमयी मंगेशाचे ते तेज! त्या मूर्तीच्या डोळ्यातून येणारी दिव्य आभा स्वतःच्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत मी साडेबारा पाऊण पर्यंत मंगेशमय झाले होते.
त्याचवेळी तिथे भेटलेल्या आत्ये दिराने; बाहेर मित्रमंडळी आणि जत्रेतील दुकाने यात रमलेल्या माझ्या पतीला आणि मुलाला आपल्या रूमवर येण्याची प्रेमळ ऑर्डर दिली. आणि आम्ही दीड वाजता मांगिरीश मठातील त्यांच्या रूमवर पोचलो. साडेतीन पर्यंत दोन तास झोप काढली व पटापट तयार होऊन चार पर्यंत पुन्हा देवळामध्ये पोचलो. वाजंत्री वाजत होती. रथावर नारळ वाढवण्यासाठी लोकांची रांग लांब होत चाललेली. रथातील सर्व सज्जा झाली आणि कवळे मठाधीश स्वामींचे वाजत गाजत रथापर्यंत आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीतील विधी संपवून ते पुन्हा आपल्या पूर्वस्थानी गेले. त्याबरोबर भराभर नारळ वाढवणाऱ्या भक्त मंडळींची रांग पुढे सरकू लागली. हे सर्व होईपर्यंत पाच साडेपाच झाले आणि रथ ओढण्याच्या मूळ कार्यक्रमाला सुरुवात झाली. दोऱ्या भराभर बाहेर काढल्या गेल्या. रथ ओढण्यास इच्छुक लोकांनी दोऱ्यांचा कब्जा घेतला. रथाच्या गतीचा, तो जिथे वळवणे आवश्यक होते तिथे वळवण्याचा ताबा एक्स्पर्ट लोकांच्या हातात होता. रथ बघता बघता हलला आणि हर हर महादेवच्या गजरात वेगाने मंदिराच्या डाव्या बाजूच्या दारापाशी थांबला. तिथे पुन्हा नारळ वाढवले गेले. नंतर याच क्रमाने मंदिराच्या मागच्या बाजूला, उजव्या बाजूला काही वेळ नारळ वाढवण्यासाठी थांबत रथ पुन्हा आपल्या पूर्व जागी पोचला. हे सारे होई पर्यंत दिवस उजाडलेला होता. त्यानंतर मंगेशाला पालखीतून मंदिरात नेण्यात आले. आरतीसाठी आतील चौक लोकांनी आधीच भरलेला होता. बाहेरच्या पायऱ्यापर्यंत भक्तगणांची गर्दी होती. आरतीसाठी मंदिरात पोचणे अशक्य होते. उजवीडावीकडच्या दारांसमोरचा पॅसेज, बाहेरील आवार सगळे भक्तांनी भरलेले होते. मला डावीकडच्या दाराकडे थोडीशी जागा मिळाली आणि मंदिरात प्रवेश करता आला. उंबऱ्याच्या अगदी जवळ कसे बसे उभे राहण्यास जागा मिळाली. आरती झाली. त्यानंतर प्रसाद घेऊन आम्ही बऱ्यापैकी रात्र जागवलेली असतानाही अजिबात न थकता सुंदर अनुभवाचे गाठोडे घेऊन शांत मनाने घराकडे परतलो.