ब्रह्मा विष्णू महेश हिंदू धर्मियांचे तीन मुख्य देव! परंतु या त्रिदेवांमधील सृष्टिकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मदेवाची मंदिरे संपूर्ण भारतात अगदी हाताच्या बोटावर मोजावी इतकीच आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिर राजस्थानातील अजमेरजवळ पुष्कर येथे आहे. प्राचीन असे आणखीन एक दुर्मिळ ब्रह्मदेव मंदिर; गोव्यातील वनराईने वेढलेल्या, डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या करमळी ह्या गावात आहे. ब्रह्मदेवाच्या येथील मंदिरामुळे करमळी गाव ब्रह्मकरमळी म्हणून ओळखले जाते. अत्यंत शांत आणि निसर्गरम्य असे हे गाव उत्तर गोव्याच्या सत्तरी तालुक्यामध्ये आहे.

चार मुखांचा सृष्टिकर्ता देव- ब्रह्मदेव
ब्रह्मदेव हा चार मुखे असलेला देव. ब्रह्मकरमळी येथील चतुर्मुखी ब्रह्मदेवाची बेसाल्ट दगडामध्ये कोरलेली प्राचीन मूर्ती ही कदंबकालीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बाजूच्या आणि मागील मुखाचे दर्शन व्हावे म्हणून मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागच्या आणि दोन्ही बाजूंच्या भिंतीना खिडकी सदृश्य झरोका ठेवलेला आहे. ब्रह्मदेवाची दाढी असलेली मधली मुख्य मुद्रा धीरगंभीर आहे.
चतुर्भुज असलेल्या ह्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या समोरच्या उजव्या हातात जपमाळ आहे आणि आशीर्वाद देणाऱ्या वरद मुद्रेमध्ये तो हात आपल्याला दिसतो. पाठीमागच्या उजव्या हातात यज्ञामध्ये समिधा टाकण्यासाठी वापरली जाणारी पळी अर्थात स्रुक आहे. समोरच्या डाव्या हातात साजूक तुपाचं भांडं (आज्यस्थळी)आहे व पाठीमागच्या डाव्या हातात वेद आहेत.
ब्रह्मदेवाच्या दोन्ही बाजूंना त्यांच्या पत्नी सावित्री आणि सरस्वती यांच्या मूर्ती उभ्या आहेत. मूर्तीच्या सभोवती असणाऱ्या नाजूक शिल्पकारीने सजलेल्या प्रभावळीमध्ये देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात.


इतिहास व मूळ
करमळीतील ब्रह्मदेवाच्या मूर्तीचा कालखंड साधारण ११ व्या -१२ व्या शतकातील कदंब काळातील असावा असे मानले जाते. हे ब्रह्मा मंदिर मूलतः पणजी जवळील करमळी (करंबोळी) येथे स्थित होते. परंतु १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी हे मंदिर उध्वस्त केले तेव्हा मूळ मूर्तीला सध्याच्या ठिकाणी म्हणजे सत्तरी तालुक्यातील वाळपई पासून सहा कि. मी.अंतरावरील नगरगावात हलवून तिची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. मूळ स्थानाची आठवण आणि ब्रह्माचे ठिकाण म्हणून ह्या नव्या परिसरास ब्रह्मकरमळी म्हणून संबोधले जाऊ लागले.

मंदिराचा निसर्गरम्य परिसर
मंदिराचा परिसर अतिशय नयनमनोहर निसर्गाने नटलेला आहे. रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या शांत अशा टेकडी सदृश्य उंच जागेवर मंदिर उभे आहे. भोवतीने असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या संरक्षक भिंतीमुळे आणि रस्त्यावरून दिसणाऱ्या शिखर कलशामुळं ते सहज लक्षात येते. हे मंदिर लहान असले तरी ऐतिहासिक दृष्ट्या व धार्मिक दृष्टया अत्यंत महत्वाचे आहे.
बाहेरून अतिशय सुंदर दिसणाऱ्या आणि आकर्षक प्रवेशद्वार असणाऱ्या मंदिराच्या पायऱ्या चढून जेव्हा आम्ही मंदिरात प्रवेश केला तेव्हा मन थोडेसे निराश झाले. मुद्दाम मंदिर पाहण्यासाठी लांबून आल्यानंतर समोर दिसणारा साधारण असा सभामंडप आणि बंद असलेले गर्भगृह पाहून आलेली निराशा जाळीदार दरवाजामागील ब्रह्मदेवाची सुंदर मूर्ती आणि मंदिराच्या सभोवतालच्या परिसराच्या दर्शनाने पार नाहीशी झाली.
मंदिराच्या मागे असलेली सुंदर हिरवळ आणि त्यामध्ये उभा असलेला असलेला आराध्य वृक्ष लक्षवेधी आहे. ह्या वृक्षाच्या पारावर एक छोटी घुमटी आहे. मंदिराच्या उत्तर बाजूला असणारे दोन लहान परंतु सुबक तलाव आणि दुसऱ्या बाजूचे रमणीय डोंगर हे दृश्य पहात राहण्यासारखे आहे. मनमोहक निसर्ग, फारशी गर्दी नसल्याने शांत असलेला भक्तिपूर्ण परिसर एक अध्यात्मिक समाधान देऊन जातो.
स्वच्छता, शांतता आणि साधेपणा हे या जागेचे वैशिष्ट्य आहे.


उत्सव आणि धार्मिक विधी
ह्या मंदिरातील मुख्य उत्सव अर्थात जत्रा ही मार्गशीर्ष वद्य तृतीयेला म्हणजेच दत्तजयंती नंतर तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. हा उत्सव तीन दिवस चालतो. त्याशिवाय वर्षभरात काही विशेष पूजाविधीही पार पाडले जातात.
म्हादई अभयारण्याच्या सान्निध्याचा अनुभव
ब्रह्मकरमळीकडे जाणारा रास्ता हा म्हादई अभयारण्याच्या सीमेजवळून जातो. त्यामुळे करमळीच्या ब्रह्मा मंदिराची यात्रा केवळ धार्मिक न राहता रस्त्याच्या दुतर्फा दिसणाऱ्या गर्द वनराईमुळे निसर्गसंपन्न आनंदी प्रवास होतो.
रस्त्यावरून जाताना दिसणाऱ्या घनदाट झाडांच्या रांगा, पक्ष्यांचा किलबिलाट, अनोख्या वनस्पती आणि थोडा जंगलाचा वास – हे सगळं वातावरण मन उत्साही आणि आनंदी करतं. पावसाळ्यात हे सौंदर्य पाहणं आणखीनच बहारदार असतं. परंतु सुरक्षिततेचा विचार लक्षात घेऊन प्रवास शक्यतो भरपूर पाऊस असताना व रात्रीच्या वेळी करू नये.

ब्रह्मकरमळीला जाण्याचे मार्ग
करमळीच्या ब्रह्मदेव मंदिराला भेट देण्यासाठी स्वतःची कार, दुचाकी अथवा टॅक्सी हे सर्वात सोयीचे पर्याय आहेत. साखळीमार्गे वाडाची वाळी–करमळी असा रस्ता आंशिक घाट आणि अरुंद वळणाचा आहे, परंतु चांगल्या स्थितीत आहे.
पणजीहून करमळीला जायचे असेल तर हे अंतर साधारण ३८ कि. मी. इतके आहे व पोहोचण्यासाठी अंदाजे सव्वातास लागतो.
मडगाव करमळी अंतर ५८ कि. मी. व पोचण्याचा अवधी साधारण पावणे दोन तास इतका आहे.
वास्को ते करमळी अंतर ६३ कि. मी. आहे. वास्कोहून ब्रह्मकरमळीला पोचण्यास दोन तासांचा अवधी लागतो.

श्रद्धा व निसर्गाचं संमेलन
