आंबट तिखट बिमलाचो रोस म्हणजे बिमल ह्या फळापासून बनवलेली आमटी. खोबऱ्याच्या वाटणातील ही आमटी खास चवीची असते.

बिमल हे एक आंबट फळ आहे जे दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते. बिंबल किंवा बिलिंबी म्हणूनही ओळखले जाणारे हे फळ विशेषतः गोवा, महाराष्ट्र, केरळ आदि राज्यांमध्ये पाहायला मिळते. बिमलाच्या  झाडाला उष्ण, दमट हवामान आणि भरपूर पाणी आवश्यक असल्याने गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ही झाडे भरपूर पाहायला मिळतात. 

गुच्छाने वाढणारे हे फळ आपल्या आंबट चवीमुळे लहान थोर सर्वांचे आवडते आहे. लहान मुले तर झाडावरून तोडून बिमलं खाण्याचा आनंद घेतात. आंबट चवीमुळे बिमले, सुंगट (कोळंबी) व काही माशांच्या आमटीमध्ये, तसेच डाळीच्या आमटीतही वापरली जातात. सुंगट आणि बिमल यांची एकत्र आमटी अतिशय रुचकर लागते. बिमलाचे लोणचेही आपल्या आंबट तिखट चवीने अनेकांना आवडते.

हा आंबट तिखट बिमलाचो रोस कसा करायचा ते आता आपण पाहू. 

Bimbal fruit

साहित्य

  • बिमले: आठ ते दहा
  • ओल्या नारळाचा किस: एक मोठी वाटी
  • सुक्या मिरच्या: ५ ते ६
  • धणे: एक मोठा चमचा
  • मिरी: अर्धा लहान चमचा
  • हळद: अर्धा लहान चमचा
  • गूळ: एक चमचा
  • मीठ: चवीपुरते

फोडणीसाठी साहित्य

  • तेल: एक मोठा चमचा
  • मोहरी: एक चमचा
  • हिंग: दोन चिमटी
  • कडीपत्ता: १०-१२ पाने
Bimalacho Ros

कृती

  1. बिमले आधी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यांची दोन्ही बाजूनी टोके काढून मधून उभी चिरून घ्यावीत.
  1. धणे, मिरी, सुक्या मिरच्या, हळद आणि नारळाचा किस हे सगळे एकत्र छान बारीक वाटून घ्यावे.
  1. एका भांड्यामध्ये हे वाटण ओतून घ्यावे, आवश्यक तितके पाणी घालून मंद आंचेवर शिजवण्यास ठेवावे.
  1. चार पाच मिनिटे वाटण शिजले की त्यामध्ये चिरलेली बिमले टाकून ती शिजू द्यावीत.
  1. बिमले शिजली की त्यामध्ये गूळ आणि मीठ घालावे.
  1. हिंग, मोहरी, कढीपत्ता यांची फोडणी करावी आणि गरमागरम फोडणी तयार रोसामध्ये घालावी.

करायला अत्यंत सोपा परंतु रुचकर असा हा खास गोवन चवीचा आंबट तिखट बिमलाचो रोस, गरमगरम भाताबरोबर सर्व्ह करावा.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!