हुमण म्हणजे fish curry हा गोवन जेवणाचा अविभाज्य भाग! त्यात जर हुमण बांगड्याचे असेल तर काय विचारता!! माशाच्या जेवणात बांगडा आणि बांगड्याच्या करीवर प्रेम असलेले लोक अधिक!
गोव्यामध्ये हुमण (fish curry) करायची पद्धत मासा कुठला आहे त्याच्यावर ठरते. पारंपरिक पद्धतीने केलेले माशाचे हुमण हे कांद्याचे आणि बिन कांद्याचे असे दोन प्रकारे केले जाते. बिन कांद्याच्या करीमध्ये त्रिफळे नावाचा मसाला आवश्यक असतो. त्रिफळे घालून केलेल्या बिन कांद्याच्या हुमणामध्ये बांगडा, तारली इ. मासे येतात. अत्यंत थोडे साहित्य वापरून सोप्या पद्धतीने केलेले हे माशाचे हुमण अत्यंत चविष्ट लागते.
आपल्या आगळ्या वेगळ्या चवीने अनेकांना प्रिय असलेल्या बांगड्याची आमटी अर्थात हुमण (mackerel fish curry) कशी करायची ते आता आपण पाहू.
साहित्य:
बांगडे – दोन ते तीन मध्यम आकाराचे
सुकी मिरची – ७/८ (मिरचीच्या तिखट चवीनुसार कमी जास्त)
धणे – एक मोठा चमचा
मिरी – ८ते १०
चिंच – छोट्या लिंबाएवढी
त्रिफळे: ८ते १०
आले: एक इंच
ओल्या नारळाचा चव: एक वाटी
हळद: एक लहान चमचा
गावठी खोबरेल: एक छोटा चमचा
मीठ: चवीनुसार
कोथिंबीर: ऐच्छिक (optional)
कृती:
मासे खवले काढून स्वच्छ धुवून घ्यावेत, एका माशाचे तीन तुकडे करावेत आणि ते पुन्हा आतून बाहेरून स्वच्छ धुवावेत. माशांच्या तुकडयांना अर्धा चमचा हळद आणि मीठ लावून ठेवावे.
मध्यम आकाराच्या नारळाच्या एका वाटीचे खोबरे किसून घ्यावे. धणे, मिरी, मिरच्या, अर्धा चमचा हळद, आल्याचा तुकडा, चिंच आणि किसलेले खोबरे असे सारे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. हे सगळे वाटप एका भांड्यामध्ये ओतून घ्यावे. आवश्यक तितके पाणी घालून मंद आंचेवर शिजवण्यास ठेवावे. त्यामध्ये त्रिफळे ठेचून टाकावीत. थोडी उकळी आली की त्यात कापलेले बांगड्याचे तुकडे टाकावेत. तीन चार मिनिटे शिजू द्यावे. मासे शिजत आले की मीठ घालावे आणि चमचाभर खोबरेल सोडावे. गॅस बंद करून थोडा वेळ झाकून ठेवावे. हवी असल्यास वरून कोथिंबीर पेरावी.