काही पदार्थांची काही सणांबरोबर परंपरेने जोडी जमत आलेली आहे. प्रांतानुसार हे पदार्थ आणि सण यांच्या जोड्या वेगवेगळ्या असतात. कारण प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे खास पदार्थ असतात. गोव्याचेही स्वतःचे काही खास पारंपरिक पदार्थ आहेत. त्यातल्या काही पदार्थांच्या विशिष्ट सणाशी जोड्या जमलेल्या आहेत. जसे; नागपंचमी आणि पातोळ्या, चवथ अर्थात गणेशचतुर्थी आणि नेवऱ्या (करंज्या), दिवाळी आणि पोहे.
नागपंचमी जवळ येताच बाजारात हळदीची पाने दिसू लागतात. . महिलाही एकमेकींना “पंचमीक पातोळ्यो करतले मगो?’ असे प्रश्न विचारू लागतात .
तर आपणही आज ह्या पातोळ्या कशा करायच्या त्याची कृती पाहूया.
पातोळ्याच्या कृतीमधला पहिला आणि अविभाज्य घटक आहे, हळदीची पाने. हे समीकरण इतकं घट्ट आहे की बरेच जण हळदीच्या पानांना पातोळ्यांची पानेच म्हणतात.
तर आधी पातोळ्यासाठी लागणारे साहित्य पाहू.
साहित्य :
- ७-८ हळदीची पाने
- १ मोठी वाटी तांदळाचे पीठ
- १ वाटी खवलेला ओला नारळ
- पाऊण वाटी गूळ
- १चमचा पांढरे तीळ
- ३-४ वेलच्यांची पावडर
- चिमूटभर मीठ
- १ चमचा तूप
कृती :
१. प्रथम हळदीची पाने स्वच्छ धुवून घ्यावी. पाने मोठी असतील तर त्यांचे कापून दोन किंवा तीन भाग करावेत.
२. तांदळाच्या पीठीमध्ये पाणी व थोडेसे मीठ घालून त्याचे जाडसर बॅटर तयार करावे.
३. एका जाड बुडाच्या पातेल्यात चमचाभर तूप घालावे. त्यामध्ये पांढरे तीळ. ओले खोबरे, गूळ घालून चांगले परतून घ्यावे. सारण तयार होत आले की त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद करावा.
४. हळदीचे एक पान घ्यावे. त्यावर तांदळाच्या पिठाचे बॅटर पसरून घ्यावे आणि त्यावर नारळाचे तयार सारण पसरावे. त्यानंतर हळदीचे पान उभे किंवा आडवे दुमडून घ्यावे. अशाप्रकारे सर्व पानांमध्ये तांदळाचे पीठ आणि खोबऱ्याचे सारण भरून घ्यावे.
५. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यावे. त्यावर एक चाळण ठेवून त्यात सर्व तयार पातोळ्या ठेवाव्यात. चाळणीवर झाकण ठेवावे. आणि ह्या पातोळ्या मध्यम आंचेवर साधारण पंधरा मिनिटे उकडून घ्याव्यात.
६. थंड झाल्यानंतर पानासकट अथवा पाने काढून सर्व्ह कराव्यात.
हळदीच्या पानाच्या सुवासाने सुखावणाऱ्या ह्या पातोळ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही खाऊ शकता. पोट भरेल पण मन भरणार नाही. अशा रुच्चीक लागतात पातोळ्या!