रविवारी ३१ तारखेला पर्वरी शिगमोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. पर्वरीमधील शिगमोत्सवाचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षीपासून पर्वरीमध्ये शिगमोत्सव, कार्निवल, नरकासुर वध स्पर्धा इ. सुरु झालेले आहे. आता पर्वरीकरांना हे सारे उत्सव पाहण्यासाठी पणजीला जावे लागत नाही. पर्वरीकरांचा ह्या साऱ्या उत्सवांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. हा शिगमोत्सव पाहण्यासाठी लोटलेली प्रचंड गर्दी लोकांच्या उदंड प्रतिसादाचे प्रतीक आहे.
मिरवणुकीची सुरुवात अर्थातच पर्वरी शिगमोत्सव समितीच्या सादरीकरणाने झाली. ह्या ग्रुपचे विशेष आकर्षण होते ढोल वाजवणारे पर्वरीचे उत्साही आमदार, गोव्याचे पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे. त्यानंतरची सर्व मंडळे मात्र राज्यस्तरीय स्पर्धेचे स्पर्धक होते. साधारणपणे रोमटा मेळ, अधून मधून लोक नृत्यांचे प्रदर्शन करणारी पथके आणि शेवटी चित्ररथ असा ह्या मिरवणुकीचा ठरलेला क्रम असतो. परंतु लोकसभा निवडणुक तोंडावर आलेली असल्याने आचार संहिता लागू झालेली आहे. त्यामुळे रात्री दहा नंतर लाऊड स्पिकर्सच्या आवाजावर बंदी आहे. हे सारे विचारात घेऊन पर्वरी शिगमोत्सव समितीने ह्या मिरवणुकीचे नियोजन अतिशय समाधानकारक केले. नेहमीप्रमाणे चित्ररथांना शेवटपर्यंत न थांबवता मिरवणुकीच्या मध्ये पाठवण्यात आल्याने साउंड इफेक्टससह लोकांना त्याचा आनंद घेता आला. आता फक्त ही मिरवणूक नियोजित वेळेत होणे गरजेचे आहे. ही मिरवणूक सुरु होण्यासाठी जवळ जवळ सहा वाजले. परंतु दोन मंडळांच्या मध्ये फार अंतर न ठेवता मिरवणूक अखंड सुरु राहिल्याने प्रेक्षकही अविरत मिरवणुकीचा आनंद घेऊ शकले.
ह्यावर्षी स्पर्धेत जवळजवळ सोळा रोमटामेळ होते. रोमटामेळमध्ये दोन व्यक्ती हातामध्ये तोरण घेऊन सगळ्यात पुढे असतात, ज्यावर मंडळाचे नाव असते. त्यांच्या पाठोपाठ येतो मेळ. हातामध्ये ध्वज पताका नाचवत, पारंपरिक गाणी गात, मधून मधून ‘ओस्सय ओस्सय’ असा गजर करत येणारा शिस्तबद्ध समूह म्हणजे मेळ. सुंदर वेशभूषा आणि ढोल ताशांच्या तालावरचा त्यांचा ठराविक पदन्यास पाहण्यासारखा असतो. ह्या मेळाच्या मधोमध एक व्यक्तीच्या हातात पताका ऐवजी मारुती असतो. शिवाय काही लोकांच्या हातात इलामत, अबदागीर, छत्र इ. असते. मध्ये देवाची पालखी असते. ह्या दोन्ही समूहांच्या मध्ये ढोल, ताशे आणि कासाळे वाजवणारा समूह असतो. ज्याला रोमट म्हटले जाते. ह्या समूहाच्या सादरीकरणावर, त्यांच्या उर्जेवर पथकाचे यश अवलंबून असते.
कालच्या मिरवणुकीमध्ये शांतादुर्गा कला मंच फोंडा, नवदुर्गा कला सांस्कृतिक मंडळ, मडकई, टीट्टो स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब पैंगीण, बार्देश शिगमोत्सव समिती, त्याशिवाय खांडेपार, डोंगरी, म्हापसा, केपे इथून आलेली रोमटामेळ आणि लोकनृत्याची अनेक पथके ह्या मिरवणुकीचे आकर्षण होती.
ही सगळी पथके आपल्या कामगिरीमध्ये वैविध्य दाखवत स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मी साडे दहा नंतरच्या पथकांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी थांबू शकले नाही. परंतु त्यापूर्वीच्या पथकांमध्ये मला खांडेपारच्या पथकाची कामगिरी विशेष आवडली. ह्यांच्या पथकाची सुरुवातच नवख्या पद्धतीने म्हणजे आगीचे खेळ करत झाली. त्यासाठी रस्त्यावरील लाईट काही क्षणासाठी बंद करण्यात आले. आगीचे पलिते नाचवणे तोंडातून आगीचा लोळ सोडणे ह्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ह्या संपूर्ण पथकाची ऊर्जा कमालीची होती. कासाळे वाजवणाऱ्या, ध्वज पताका नाचवणाऱ्या समूहांनी केलेले वैविध्यपूर्ण सादरीकरण; ढोल ताशे वाजवणाऱ्यांची जबरदस्त ऊर्जा; महालसेची मूर्ती पाठीशी असलेल्या व्यक्तीचा विशेष परफॉर्मन्स; असे सारेच अभूतपूर्व होते. सादरीकरण किंचित लांबले तरी प्रेक्षकांतून ह्या पथकास भरभरून प्रतिसाद मिळाला. यांनी गायलेली लोकगीतेही वेगळी होती. साधारणपणे मेळांमधून ओस्सय आणि शबय शबय च्या गजराबरोबर; वा वा किती आनंद झाला, अंजनीच्या सुता, तुझ्या घरात नाही पाणी घागर फुटली रे गोपाळा, इ पदे म्हटली जातात. खांडेपार पथकाची सर्व गीते मात्र महालासादेवीची होती. शेवटचे गीत मंगेशाचे होते. ही सर्वच गीते अतिशय श्रवणीय होती.
अशा विविध मेळानी आपापल्या कौशल्याची आणि ऊर्जेची कमाल दाखवली होती. हा रोमटामेळ पाहताना, ‘घुमचे कटर घुम’ चा नाद आणि पथकातल्या स्पर्धकांची ऊर्जा आपल्या शरीरात भिनली नाही तर नवल.
ह्या वर्षी लोकनृत्यांमध्ये, फुगडी, धनगर नृत्य, मोरूला, वीरभद्र आणि घोडेमोडणी इतकेच प्रकार पाहायला मिळाले. धनगर नृत्याच्या पथकामध्ये सुरुवातीला धोतर नेसलेला, खांद्यावर घोंगडं आणि पायात कडे अशा वेशातला धनगरांचा समूह असतो. ह्या धनगर नृत्याला साथ करणारे विशिष्ट ठेक्यातील ढोल वादनही अतिशय ऊर्जादायी असते. त्यानंतर लाल काठाचा पांढरा झगा अशा पारंपरिक वेषात ‘ओस्सय ओस्सय’ म्हणत केलेले धनगरी पारंपरिक नृत्य पाहायला सुद्धा खूप मजा येते. धनगरांची देवता घेऊन एक व्यक्ती पुढे जात असते. तर एका अशाच पथकामध्ये पुढे मशाल घेऊन नाचणाऱ्या माणसाची ऊर्जा अतिशय कमालीची होती. मध्ये मध्ये ‘हुर्रर्ररा’ असे ओरडत जाणाऱ्या ह्या माणसाच्या अंगात जणू काही कोणीतरी भिनलं होतं.
पैंगीणच्या पथकाने सादर केलेले घोडेमोडणी नृत्य ही अप्रतिम होते. घोड्यावर बसल्याप्रमाणे दिसणारी त्यांची वेशभूषा, हातात तलवारी घेऊन केलेले घोडेमोडणी नृत्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले. नृत्यासोबत केलेला हर हर महादेवचा गजर ऐकून स्फुरण चढत होते. सगळ्यात पुढे हातात तुतारी घेऊन नाचणाऱ्याची ऊर्जाही विशेष होती. शंख, तुतारी ह्या वाद्यांचा वापरही अनेक पथकांनी केलेला होता.
वीरभद्राच्या पथकामध्ये मधोमध वीरभद्र असतो. जोशपूर्ण असे वीरभद्राचे नृत्य पाहण्यासारखे असते. बरोबर इतरांचे पारंपरिक नृत्य आणि वाद्यवृंद असतो. फुगडी म्हणजे महिलांची पारंपरिक गाणी गात घुमटाच्या तालात केलेले लोकनृत्य. मोरूला हा शेतकऱ्यांचा नाच ज्याच्यामध्ये धोतर, बनियन गळ्यात फुलांची माळा आणि डोक्याला मोरपीस अशा वेषामध्ये केलेले लोकनृत्य. ह्या साऱ्या नृत्यांचे सादरीकरण ही छान झाले.
मिरवणुकीमध्ये असलेले पौराणिक चित्ररथ हे बालवयातील प्रेक्षकांचे विशेष आकर्षण असते. पर्वरीच्या मिरवणुकीमध्ये राम आणि रावण युद्ध हाच विषय अधिकाधिक पाहायला मिळाला. त्याचबरोबर दक्षप्रजापती आणि शंकर, कार्तिकेय तारकासुर युद्ध, गणपती रावण प्रसंग, रामाचा सागरावरील सेतू बंधनाचा प्रसंग, समुद्र मंथन इ. अनेक विषयांवर चित्ररथ पाहायला मिळाले.
मिरवणुकीच्या सुरुवातीला आणि अधून मधून वैयक्तिक फॅन्सी ड्रेस स्पर्धेतले; मारुती, शंकर, शिवाजी महाराज आणि अशा विविध वेशातील बाल स्पर्धक सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते, मोठ्या माणसामध्ये दहा तोंडाचा रावण, हिरण्यकश्यपूचा वध करणारा नरसिंह आणि भल्या मोठ्या हनुमानाला प्रेक्षकांनी छान प्रतिसाद दिला. ह्या सगळ्या मिरवणुकीत पथकाबरोबर किंवा वैयक्तिकरित्या; पाडेली (माडावरून नारळ काढणारी व्यक्ती), साडी नेसून असलेला बाप्या, कुडमुड्या ज्योतिषी अशी सोंगे घेतलेल्या व्यक्ती प्रेक्षकांची छान करमणूक करतात. पण ह्यावेळी त्यांची संख्या खूपच कमी वाटली.
एकुणातच पर्वरी शिगमोत्सव थोडा उशिरा सुरु झाला तरीही यशस्वी पणे संपन्न झाला. पुढे कित्येक दिवस हा सोहोळा आणि यातल्या ऊर्जापूर्ण पथकातून मिळालेली ऊर्जा माझी छान सोबत करणार आहेत हे निश्चित.