
स्वतःचे वेगळेपण जपणारे केरी गाव
केरी नावाची गोव्यामध्ये तीन गावे आहेत. एक पेडणे तालुक्यात, एक फोंड्यामध्ये आणि एक बेळगावला जाताना चोर्ला घाट लागण्यापूर्वी येते ते सत्तरी तालुक्यातले केरी. तीनही केरी निसर्गरम्य आणि स्वतःचे वेगळेपण जपणारी. यातील पेडणे तालुक्यातील देव आजोबा असणाऱ्या केरीला भेट देण्याचा योग नुकताच आला.

सागरी किनारा लाभलेले पेडणे तालुक्यातील केरी.
महाराष्ट्र बॉर्डरजवळ असणारे हे गाव, गोव्यातून वेंगुर्ल्याकडे जातांना लागते. केरीला जाताना वाटेत लागणारा निसर्ग, सुंदर गोवन पद्धतीची परंतु आता, कोकण जवळ आलेला आहे ह्याचा आभास होणारी गावे पाहत आम्ही पुढे चाललो तर वाटेत अनेक विदेशी पर्यटक मोटरसायकली वरून आम्हाला क्रॉस होत होते. हे इतके फॉरेनर्स कुठे बरे जात असतील ह्या आमच्या मनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही केरी बीचवर पोचल्यावर सापडले

देव आजोबांचे जागृत देवस्थान केरी गावाचे वैभव
सुंदर सागरी किनाऱ्याबरोबरच, जागृत देव आजोबा देवस्थानामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. देव आजोबावर अनेक लोकांची अनन्य श्रद्धा आहे. आजोबाला हाक घातली की तो पाठराखण करणारच यावर भक्तांचा नितांत विश्वास आहे. साधारण फेब्रुवारी महिन्यात मोठी जत्रा भरणारे हे देवस्थान सागरी किनाऱ्यावरच आहे.


देव आजोबा देवस्थानाच्या वास्तूचे वैशिष्ट्य
चारीही बाजूनी भिंत नसलेले हे उघडे देवस्थान खांबांवर उभे आहे. खांबांवरती वरती छप्पर आणि त्यावर कळसआहे. शिवाय या छप्पराच्या वर छोट्याशा घुमटीसदृश्य रचनेमध्ये असणाऱ्या विविध ऋषीमुनींच्या मुर्त्या ह्या वास्तूच्या सौन्दर्यात भर घालतात. देवळाच्या मधोमध एक खडप आहे तोच देव आजोबा. ह्या मूळ देवाच्या सभोवतालीहीआठ खांब उभे आहेत आणि त्या खांबांवर गणपती, शंकर, विष्णू आदि देवांच्या सुबक मुर्त्या कोरलेल्या आहेत. रचनेचे वेगळेपण असलेले हे मंदिर केरी किनाऱ्याची शोभा वाढवते. देवळाच्या पलीकडे असणारा हिरवागार, वृक्षांनी समृद्ध डोंगर देवळाच्या सौंदर्यात आणखीन भर घालतो.


केरी बंदराचा राखणदार देव आजोबा
देवळाच्या मधोमध असणाऱ्या त्या खडकावर देव आजोबांचे वास्तव्य असते असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे. देव आजोबा म्हणजे राखणदार. देव आजोबा केरी बंदराची राखण करतो, एकदा त्याला हाक मारली की सदैव आपली पाठराखण करतो. अशी देव आजोबाच्या भाविकांची दृढ श्रद्धा आहे. आपण घरातील जाणत्या वृद्ध व्यक्तीला आजोबा म्हणतो. घरातले मोठे आजोबा कसे आपल्याला सांभाळून घेतात, आपल्यावर प्रेम करतात, मोलाचे मार्गदर्शन करतात. तसाच भाव ह्या देवाबद्दल असल्याने त्याला आजोबा म्हणतात असे तिथे असणाऱ्या एका भाविकाने सांगितले.

केरी बीचचे वैशिष्ट्य
बीच ला लागूनच अनेक शॅक्स (shacks) होते. आम्हाला रस्त्यावर जे अनेक विदेशी पर्यटक मोटरसायकलीवरून ये जा करताना दिसत होते ते पर्यटक इथे समुद्रस्नानासाठी आलेले होते. समुद्र स्नान करून हे सारे पर्यटक त्या शॅक्समध्ये आरामात पहुडलेले होते. सारा बीच केवळ विदेशी पर्यटकांनी भरलेला होता. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेही भारतीय पर्यटक नव्हते. देव आजोबाच्या परिसरात हे शॅक्स असल्याने तिथे मद्याची विक्री अजिबात नव्हती. भारतीय पर्यटक तिथे न दिसण्याचे हेच कारण असू शकेल का? असा एक कटू विचार माझ्या मनाला चाटून गेला. बीच अतिशय स्वच्छ होता. ह्याचेही कारण इथे असलेला देशी पर्यटकांचा अभावच असेल का असाही दुर्दैवी विचार माझ्या मनात आला. कारण देशी पर्यटकांनी फुललेल्या बीचेसची दयनीय अवस्थाही मी पाहिलेली आहे. पर्यटकांनी यावर नक्की विचार करावा.

एकदा तरी भेट द्यावीच असे केरी गाव
तर असे हे केरी गाव. गोव्याचा निसर्ग आणि समुद्र किनारा आवडणाऱ्या पर्यटकांनी याला जरूर भेट द्यावी. मात्र मंदिर आणि परिसराचे पावित्र्य, स्वच्छता याला आपल्या वावरण्याने बाधा येणार नाही याची काळजी मात्र जरूर घ्यावी व देव आजोबाचा आशीर्वाद पाठीशी घेऊन जावे.
