देवकी आणि बाल कृष्णाचे एकमेव मंदिर

गोव्यातील माशेल गाव म्हटलं की मला सगळ्यात प्रथम आठवते ते देवकीकृष्ण मंदिर. जन्मदात्री माता देवकीच्या मांडीवर बाळ श्रीकृष्ण, असे हे देवकी आणि कृष्णाचे भारतातील एकमेव मंदिर. देवकीकृष्ण मंदिराचे स्थापत्य गोव्यातील इतर मंदिरांसारखेच आहे. देवालय आणि देवालयाचा परिसर अत्यंत प्रेक्षणीय आहे. गोव्यातील प्रत्येक मंदिराचे स्वरूप बहुदा ठरलेले असले तरी प्रत्येक मंदिराचे स्वतःचे असे वेगळे सौंदर्य आहे. एकाची दुसऱ्याशी तुलना करणे किंवा एकाला दुसऱ्यापेक्षा दुय्यम ठरवणे केवळ अशक्य.

मंदिराचे स्वरूप

बाहेरील सभामंडप, आतील गर्भगृहासमोरील चौक आणि ह्या दोन्हीच्या मधील नगारखाना असे देवकीकृष्ण मंदिराचे सर्वसामान्य स्वरूप आहे. दोन्ही बाजूनी मोकळा सभामंडप खांबांवर उभा आहे. सभामंडपाच्या वरील कोनाकृती छताला बाहेरून लाल कौले आहेत, परंतु आतल्या बाजूने लाकडी पट्ट्याने सजवलेले हे छत आकर्षक दिसते.

देवकीकृष्ण मंदिराचा दर्शनी भाग

देवळाच्या चौकाचा छताचा आतील भागही सुंदर लाकडी कोरीवकामाने सजलेला आहे. छतावरच्या फुलांच्या कलाकृती, चौकाच्या दोन्ही बाजूच्या छताला लाकडानेच उतरत्या कमानीप्रमाणे दिलेला आकार. चौकात प्रवेश करताच उजव्या बाजूला असलेला वरच्या सज्जात जाण्यासाठीचा जिना हे सर्वच मंदिराच्या सौंदर्यात भर घालते. चौकात असलेले खांबही खूप रुंद आणि गोलाकार असल्याने लक्ष वेधून घेतात. गर्भगृहाच्या चौकटीवर चांदीच्या पत्र्यावर नक्षीदार कलाकुसर केलेली आहे. तर गर्भगृहाच्या एकदम बाहेरील भिंतीच्या कमानीवरील चांदीच्या पत्र्यावर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच कमानीच्या वरच्या भिंतीवर लाकडामध्ये कोरलेल्या देवकी कृष्णाची सुंदर मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बरोबर समोर, चौकामध्ये प्रवेश करताच असलेल्या पहिल्या दोन खांबावरच्या लाकडी भिंतीवर; कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाला शरण आलेल्या अर्जुनाचे अत्यंत सुंदर कोरीव चित्र आहे.

श्रीकृष्णार्जुनाचे कोरीव चित्र

एकूणच संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर अत्यंत विलोभनीय आहे.

वात्सल्यमूर्ती देवकी

आणि सगळ्यात विलोभनीय आहे ती माता देवकीची मूर्ती. मूर्ती ही मूळची गुजराथी पद्धतीची कृष्ण पाषाणी आहे. ही मूर्ती जवळ जवळ ४०० वर्षाहून अधिक जुनी आहे. मूर्ती बाहेरून सोन्याच्या पत्र्यात कोरलेली आहे. मांडीवर बाळकृष्ण असलेल्या देवकीच्या सुंदर मूर्तीच्या चेहऱ्यावरील वात्सल्यपूर्ण हास्य पाहत राहावे असे आहे.

देवकीकृष्ण

आपल्याला माहित आहे की कृष्णाला लहानाचे मोठे यशोदा मातेने केले. मग देवकी आणि तान्हा श्रीकृष्ण बरोबर कसे असा प्रश्न आपल्याला पडतो. तर त्यामागे एक कथा सांगितली जाते.

कंसाच्या कैदेतून सुटल्यानंतर जेव्हा देवकी प्रथम कृष्णासमोर आली तेव्हा केवळ बाल रुपी कृष्णाला पाहिलेली देवकी आश्चर्याने श्रीकृष्णाकडे पाहत राहिली. संभ्रमात पडली. त्यावेळी श्रीकृष्ण तिच्यासमोर बाल रूपात प्रकट झाला.  वात्सल्याने भारीत झालेल्या देवकीने त्याला उचलून मांडीवर घेतले.

देवळाच्या परिसरात मूळ मंदिराच्या दोन्ही बाजूनी श्री लक्ष्मी रवळनाथ, श्री दाडसाखळ, अत्री गोत्रीयांचा श्री राम पुरुष म्हाळे पुरुष, श्री भूमिका देवी, पंचिष्ट देवता अशा विविध देवतांची मंदिरे आहेत.

परिसरातील मंदिर
देवकीकृष्ण परिसरातील मंदिर
मंदिराचा इतिहास

देवकी कृष्ण देवस्थान हे मूळचे तिसवाडी तालुक्यातील चोडण ह्या गावचे. पोतृगीजांच्या कारकिर्दीत ते प्रथम डिचोली तालुक्यातील मये येथे हलवण्यात आले. परंतु डिचोलीही पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यावर ते माशेल येथे स्थलांतरित करण्यात आले. माशेल मधील ह्या मंदिराची स्थापना १८४२ मध्ये झाली.  मूर्ती मात्र त्यापूर्वीच स्थलांतरित केली गेली होती. मंदिर उभारण्यात येई पर्यंत ती स्थानिक ब्राह्मणांच्या घरामध्ये स्थापित केली होती असे मानले जाते.

मंदिरातील उत्सव

माशेल मंदिरामध्ये वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात. नेहमीचे आणि प्रासंगिक असे अनेक प्रकारचे उत्सव देवकी कृष्ण मंदिरात होतात. त्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी, चिखलकाला, गोवर्धन प्रतिपदा, बली प्रतिपदा, लक्ष्मी पूजन, रथसप्तमी तसेच मार्गशीर्ष महिन्यातील दशमी व एकादशीचा जत्रेचा उत्सव अत्यंत प्रेक्षणीय असतो. ह्या जत्रोत्सवाचा मुख्य दिवस मार्गशीर्ष शु. त्रयोदशीला असतो. यातील चिखलकाला हा संपूर्ण गोव्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये साधारण आषाढ महिन्यामध्ये हा कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरा केला जातो. ह्या मैदानामध्ये केलेल्या चिखलात पुरुष आणि लहान मुले लोळण घेतात. हा खेळ पाहण्यासाठी गोव्यातून असंख्य भाविक गर्दी करतात.

मंदिरातील जन्माष्टमी सोहळा 

देवकी कृष्ण मंदिरातील जन्माष्टमीचा उत्सवसुद्धा अद्वितीय असतो. साधारण रात्री आठ वाजता हा उत्सव सुरु होतो. मंदिरात सुरु असलेल्या कीर्तनामध्ये जसा कृष्ण जन्माचा प्रसंग येतो, त्याचवेळी कृष्ण जन्म रंगवण्यात येतो. एका पुरुषाला सोवळे नेसवून आणि डोक्यावरून उपरणे ओढून देवकी बनवले जाते. तिच्या समोर अंतरपाट धरून, मंदिरातील पुरोहित मंगल स्तोत्रे म्हणतात आणि श्रीकृष्णाचा जन्म होतो. अंतरपाट हटवला जातो. मांडीवर बाळ कृष्णाला घेऊन बसलेल्या ह्या देवकीचे आणि बाळकृष्णाचे मंदिरात उपस्थित सर्व भक्त जवळ जाऊन दर्शन घेतात. त्यानंतर बाळकृष्णाला पाळण्यात घातले जाते. दोन भटजी ‘कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या’ च्या थाटात बाळकृष्णाला पाळण्याच्या वरून व खालून एकमेकांकडे देतात आणि मग बाळकृष्णाला पाळण्यात घालून, पाळणा जोजवला जातो. हा प्रसंग पाहताना प्रत्यक्ष कृष्ण जन्माची अनुभूती येते. त्यानंतर मंदिरातील प्रत्येक भक्ताकडे जाऊन त्याच्या डोक्याला ह्या बाळकृष्णाचा पदस्पर्श करविला जातो. एकुणातच अविस्मरणीय असा हा कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा असतो.

बाळकृष्ण, देवकी कृष्ण

मंदिराच्या समोरील मैदानाच्या पलीकडे, मंदिराचे सभागृह, भक्तांना राहण्यासाठी खोल्या आणि कँटीन आहे. देवकीकृष्णाच्या भेटीला आलेल्या भक्तांसाठी ह्या कँटीन मध्ये दुपारच्या आरतीनंतर सात्विक रुचकर महाप्रसाद असतो.

असे हे माता देवकीसोबत बाळकृष्णाचे एकमेव मंदिर एकदा तरी भेट द्यावे असेच आहे.

कॅटेगरी Goan Temples