गोव्यामध्ये दिवाळीत पोहे हा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. दिवाळी म्हणजे पोहे आणि पोहे म्हणजे दिवाळी असं इथलं साधं सोपं समीकरण आहे म्हणा ना! दुधातले फोव हा असाच एक पोह्याचा पदार्थ दिवाळीला बनवला जातो. नरकचतुर्दशीला सकाळी जे पोह्याचे विविध पदार्थ बनवले जातात त्यामधला एक म्हणजे हे दूध पोहे!
दिवाळीच्या जवळपास बाजारामध्ये लाल हातसडीचे पोहे मिळायला सुरुवात होते. दिवाळीला बनवले जाणारे पोह्याचे सर्व प्रकार ह्या लाल पोह्यांपासूनच बनवले जातात. दूध पोहे करण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि झटपट होणारी. कशी करायची ते पाहू.

साहित्य
- दूध: १ लि.
- गावठी लाल पोहे: पाव किलो
- साखर: १ वाटी (आवडीनुसार कमी जास्त)
- वेलची पूड: अर्धा लहान चमचा
- सुका मेवा: काजूचे तुकडे, बदामाचे काप, बेदाणे, केशराच्या कांड्या इ.

कृती
- एक लि. दूध प्रथम मंद आंचेवर तापवून घ्यावे.
- पोहे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत.
- एका चाळणीमध्ये हे पोहे ओतून थोडा वेळ तसेच ठेवावेत.
- तापलेले दूध मंद आंचेवर तसेच ठेवून त्यामध्ये साखर घालावी. दूध व्यवस्थित ढवळून घ्यावे,
- साखर विरघळली की त्यामध्ये भिजवलेले पोहे घालून ते दुधाबरोबर शिजू द्यावे.
- पोहे शिजले आणि दूध थोडे आटून त्याला किंचित जाडसरपणा आला की त्यामध्ये वेलची पूड आणि सुका मेवा घालावा.
- आणखी थोडा वेळ शिजवून गॅस बंद करावा.
तर असे हे झटपट बनणारे दूध पोहे तयार. सुंदर गोड चवीच्या ह्या दुधातल्या पोह्यांचा, दिवाळीसाठी बनवलेल्या पोह्यांच्या इतर प्रकाराबरोबर मस्त आस्वाद घ्यावा आणि दिवाळीचा आनंद लुटावा.