तेरेखोल फोर्ट हे नाव मी ऐकलं होतं, तिथे पोहोचण्याची वेळ मात्र यायची होती. ह्यावर्षीच्या डिसेंबर मध्ये ती वेळ आली.

तेरेखोल किल्ल्याचा इतिहास

तेरेखोल गावातील तेरेखोल नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा किल्ला सावंतवाडीचा राजा खेम सावंत भोसले यांनी १७ व्या शतकात बांधला. पुढे पोर्तुगीजांनी हा किल्ला एका युद्धामध्ये सावंतवाडीच्या राजाकडून जिंकला. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला भारत सरकारच्या अखत्यारीखाली आला.

फोर्ट तेरेखोल हेरिटेज

आता हा  किल्ला ‘फोर्ट तेरेखोल हेरिटेज’ ह्या हॉटेलमध्ये परावर्तित झाला आहे. ह्या हॉटेलशिवाय तिथे एक चॅपेल आणि बॅरॅक आहे. चर्चच्या बाजूला काही पायऱ्या चढून गेल्यास तटबंदीचा एक भाग आहे.

स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित स्मारक 

मुख्य प्रवेशद्वारापाशी असलेले बंदुकीचे स्मारक शेषनाथ वाडेकर, हिरवे गुरुजी आणि आल्फ्रेड अल्फान्सो ह्या स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित केलेले आहे. 

नेटका स्वच्छ परिसर

किल्ल्याचा एवढा भाग पाहण्यासाठी प्रवेश मोफत आहे परंतु तिथल्या तेरेखोल हॉटेल मध्ये वास्तव्य केल्यास पर्यटकांना इतरही परिसर पाहता येतो असे आम्हास सांगण्यात आले.  हॉटेल तेरेखोल हेरिटेज मध्ये राहिल्यास  ऐतिहासिक टच असलेला आधुनिक लक्झरियस पाहुणचार घेता येतो. आमच्याकडे तितका वेळ नसल्याने आम्ही बाकीचा परिसर काही पाहू शकलो नाही. परंतु जितका परिसर पाहिला तो अत्यंत नेटका व स्वच्छ असल्याने तेरेखोल किल्ला भेटीचा आनंद नक्कीच मिळाला.

पणजी तेरेखोल अंतर

तेरेखोल फोर्ट हा पणजी पासून साधारण चाळीस किलोमीटरवर आहे.  तेरेखोल फोर्टला जाण्यासाठी पेडणे येथील केरीहून फेरीबोट सेवा आहे. किल्ल्याच्या दर्शनाबरोबरच फेरीबोटीतून समुद्र सफर करण्याचा आनंद ही यामुळे घेता येतो. समुद्र पाहून वेडे होणाऱ्यांसाठी ही एक छोटीशी पर्वणीच असेल.

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेला हा किल्ला एकदा जरूर पहा.

fort-terkhol-heritage
तेरेखोल-फोर्ट-स्मारक
तेरेखोल फोर्ट
तेरेखोल फोर्ट
कॅटेगरी Goa