तुम्ही नियमित गोव्यामध्ये येता आणि अजूनपर्यंत तुम्ही तांबडी सुर्ल पाहिले नसेल तर तुम्ही अत्यंत दुर्दैवी आहात. मुळातच गोवा म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा खजिना आणि तांबडी सुर्ल म्हणजे ह्या निसर्गाच्या कोंदणात बसवलेला हिराच जणू. पावसाळ्यात ह्या ठिकाणी भेट देऊन डोळे भर हे निसर्ग सौंदर्य पाहावे. किंवा इतर कुठल्याही मोसमात ह्या ठिकाणी भेट द्यावी. अद्भुत निसर्गाच्या जोडीने महादेवाच्या अप्रतिम मंदिराचे आणि आतील प्रसन्न वातावरणात, शिवलिंगाचे मनःपूर्वक दर्शन घ्यावे. खरा निसर्गप्रेमी आणि शिवभक्त इथे आपले हृदय ठेवूनच परत जाईल. पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठी!

तांबडी सुर्ल ह्याठिकाणी, मोले अभयारण्याच्या हिरव्यागार वनराईच्या मधोमध असणारे महादेवाचे मंदिर जिथे उभे आहे त्याला स्थानिक भाषेमध्ये वाझर साकळ्याचो व्हाळ असे म्हणतात. कोकणी भाषेत व्हाळ म्हणजे वाहते पाणी. मंदिराच्या बाजूने वाहणारा झरा, एका बाजूचा डोंगर, त्यावरून धावणारे ढग, आणि सभोवतालची गर्द झाडी पाहून मन मोहरून गेल्याशिवाय राहत नाही.

मंदिराकडे जाणारा मार्गही अभयारण्याचा भाग असल्याने, दुतर्फा झाडीच्या मधून जातो. वाटेत एके ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरीच पामची झाडे पाहायला मिळतात. इथेच एक नदीही वाहते, जिच्यावर असणारा एक जुना, चालून पार करण्यासाठीचा अरुंद पूल आहे. प्रसन्न करणारे असे वातावरण असल्याने तांबडी सुर्लला जाताजाता निसर्ग प्रेमी पर्यटक काही क्षण इथे थांबण्याचा मोह टाळू शकत नाहीत.

कदंबानी बांधलेले तेराव्या शतकातील हे मंदिर गोव्यातील सर्वात पुरातन मंदिरआहे. शिवाला समर्पित ह्या मंदिराचे वेगळेपण म्हणजे गोवा कदंब वास्तुशैली! हीच ह्या मंदिराची विशेष ओळख आहे.

पूर्वाभिमुख असलेलया ह्या छोट्या मंदिराची; स्तंभयुक्त मुखमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी सुंदर रचना केलेली आहे. मुखमंडपामध्ये नंदी आहे, ज्याचे मुख बरेच झिजलेले आहे. ह्या मुख मंडपाच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा तिन्ही प्रवेशद्वाराशी पायऱ्या आहेत. ह्या मंडपाच्या वर राखाडी रंगाचे उतरते छत आहे. मंदिराची रचना क्लोराइड शिष्ट ह्या दगडामध्ये केलेली आहे. ज्याच्यावर नक्षीकाम करणे सोपे असते.

तांबडी सुर्ल शिव मंदिर
तांबडी सुर्ल

मुख मंडपातील चारही स्तंभावर उत्तम नक्षीदार कलाकृती पाहायला मिळते.  कदंब राजांचे प्रतीक, घोड्याला पायदळी तुडवणारा हत्ती पूर्व दिशेच्या एका स्तंभाच्या पायथ्याशी कोरलेला आहे. तर स्तंभाचा वरचा भाग नागबंध प्रकारच्या कलाकृतीने अलंकृत केलेला आहे. मंडपाच्या छतावर उमललेल्या कमळाच्या अष्टकोनी पाकळ्यांच्या आकृत्या आहेत.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर जाळीदार नक्षी आहे जिच्यावर होयसळ शैलीचा प्रभाव दिसून येतो. गर्भ गृहाची बाहेरची भिंत अनलंकृत आहे. त्याशिवाय उत्तर दिशेला गणपती, गजलक्ष्मी आणि सरस्वती आहेत, पश्चिम दिशेला नटराज आणि शिव पार्वती, तर दक्षिण दिशेला भैरव आणि ब्रह्मा यांच्या मुर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या मंदिराच्या स्थापत्यातून आपल्याला उत्तरवर्ती चालुक्य आणि होयसळ वास्तुशैली पाहायला मिळते.

गाभाऱ्यामध्ये समईच्या अंधुक प्रकाशात असलेल्या शिवलिंगाचे आपल्याला दर्शन होते. स्थानिक आख्यायिका अशी सांगितली जाते की एक नागराज ह्या अंधुक प्रकाशात कायम स्वरूपी वास्तव्य करून असतो. महाशिवरात्रीचा उत्सव ह्या मंदिरात मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. आजूबाजूच्या गावातील स्थानिक लोक उत्सवात अत्यंत उत्साहाने भाग घेतात.

तर गोव्यात अनेकदा येऊन अजूनही तुम्ही हे मंदिर पहिले नसेल तर तुमच्या पुढच्या ट्रिप मध्ये तांबडी सुर्लला जरूर भेट द्या. तांबडी सुर्ल येथील हे शिव मंदिर मंदिर धारबांदोडा तालुक्यामध्ये भगवान महावीर अभयारण्यात स्थित आहे. मंदिर सकाळी आठ-साडे आठ पासून संध्याकाळी साडे पाच पर्यंत दर्शनासाठी खुले असते. फोंड्याहून २६-२७ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या मंदिरात जाण्यासाठी साधारण चाळीस मिनिटे लागतात.

कॅटेगरी Goan Temples