गोव्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते गणेश चतुर्थी पर्यंत मोठ्या आकाराची काकडी मिळते, तिला तवशे असे म्हणतात. पिवळसर हिरव्या रंगाची आणि फिक्या हिरव्या रंगाची असे तवशाचे दोन प्रकार असतात. ह्या काकडीपासून बनवलेला गोड पदार्थ म्हणजे तवसोळी.
बेळगाव भागात अशा तवशाचा मिरची आणि तांदळाचे पीठ घालून थालीपीठाप्रमाणे पदार्थ केला जातो. त्याला तवसोळी म्हणतात. परंतु गोव्यात; गव्हाच्या किंवा तांदळाच्या रव्यामध्ये, किसलेले तवशे, गूळ इ. घालून उकडून केलेल्या गोड पदार्थाला तवसोळी म्हणतात.
गोड पदार्थ आवडणाऱ्यांना आणि पारंपरिक पदार्थ आवडीने खाणाऱ्यांना ही तवसोळी विशेष आवडते. तवशाच्या सुमधुर सुवासात मिसळलेला गुळाचा सुगंध, घरामध्ये तवसोळी बनली आहे याची बातमी घरातच नाही तर शेजारी पाजारी सुद्धा पसरवतो. अशी ही सुमधुर चवीची तवसोळी कशी बनवायची ते पाहू.
साहित्य:
* २ वाट्या तवशाचा किस
* १ वाटी गव्हाचा मोठा रवा
* १ वाटी गव्हाचा बारीक रवा
* एक मोठा चमचा साजूक तूप
* दीड वाटी बारीक केलेला गूळ
* अर्धा लहान चमचा वेलची पूड
* ७-८ काजूचे बारीक तुकडे
* १ चमचाभर नारळाची कातली (बारीक काप)
* पाव चमचा मीठ
कृती:
* बारीक आणि मोठा रवा तुपामध्ये भाजून घ्यावा.
* तवशाची साले तासून, दोन वाट्या होतील इतके तवशे किसून घ्यावे.
* ह्या किसामध्ये तूपात भाजून घेतलेला गव्हाचा एक वाटी बारीक रवा आणि एक वाटी मोठा रवा मिसळावा.
(गव्हाच्या रव्याऐवजी तांदळाचा रवा वापरला तरी चालतो)
* ह्या मिश्रणात किसलेला गूळ घालावा.
* काजूचे तुकडे, खोबऱ्याची कातली आणि वेलची पूड घालावी.
* मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
* आता कुकरच्या एका डब्याला आतून तूप लावावे व त्यामध्ये हे मिश्रण ओतावे.
* कुकरची शिटी काढून दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण वाफवून घ्यावे.
* थंड झाल्यानंतर तवसोळीच्या कडा सुरीने मोकळ्या करून घ्याव्यात. आणि एका प्लेट मध्ये डब्बा उपडी करून तवसोळी अलगद काढून घ्यावी.
* तवसोळीचे हवे तसे काप करून गरमगरम सर्व्ह करावे.