घोटा म्हणजे गावठी आंबा. जो साले काढून चोखून खाल्ला जातो. आंबट गोड चवीच्या ह्या आंब्याचा गोव्यामध्ये बनविला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे घोटाचे सासव. कोंकणी भाषेत सांसवा म्हणजे मोहरी (mustard seeds). हिंग मोहरीची फोडणी देऊन केलेल्या ह्या पदार्थामध्ये, खोबऱ्याच्या वाटपामध्येही मोहरीचे दाणे घातले जातात. अशाप्रकारे मोहरीची किंचित कडू, आंब्याची आंबट गोड आणि वाटपात घालण्यात येणाऱ्या मिरचीची तिखट चव. असे चौरस चवीचे पक्वान्न म्हणजे घोटाचे सासव.
घोटाचे सासव करण्यास लागणारे साहित्य आणि कृती
साहित्य:
- घोटा (गावठी आंबे): ७-८
- गूळ: २ मोठे चमचे (आंब्याच्या गोडव्यानुसार कमी जास्त)
- सुक्या मिरच्या: ७-८
- हळद पूड: १/४ चमचा
- किसलेला नारळ: १ मोठी वाटी
- मोहरी: १ लहान चमचा
- धणे: १ लहान चमचा
- मिरीचे दाणे: ८-१०
- चिंच: छोट्या लिंबाएवढी (आंबा आंबटगोड असल्यास चिंच घालण्याची आवश्यकता नाही.)
- मीठ: चवीप्रमाणे
फोडणीसाठी साहित्य:
- गावठी खोबरेल (अथवा उपलब्ध असलेले कुठलेही तेल): एक मोठा चमचा
- मोहरी: १ लहान चमचा
- हिंग: चिमूटभर
- कडीपत्ता: ७-८ पाने (ऐच्छिक)
कृती:
- घोटा स्वच्छ धुवून त्यांची साले काढून टाकायची.
- मोहरीचे दाणे मंद आंचेवर साधारण भाजून घ्यावे.
- एका मिक्सरच्या भांड्यात किसलेले खोबरे, सुक्या मिरच्या, चिंच, भाजलेले मोहरीचे दाणे, धणे, मिरी, हळद हे सारे आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
- हे वाटण एका भांड्यामध्ये ओतावे. त्यामध्ये आवश्यक तितके पाणी घालावे, गूळ घालून मंद आंचेवर शिजवावयास ठेवावे.
- साधारण उकळी आली की त्यामध्ये सोललेल्या आंब्यांचा थोडा रस पिळून ते आंबे त्यात सोडावे.
- चार पाच मिनिटे शिजू द्यावे. तोपर्यंत फोडणी करून घ्यावी.
- फोडणीच्या वाटीत तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी घालावी.
- मोहरी तडतडली की त्यामध्ये कडीपत्त्याची पाने, व हिंग घालून गॅस बंद करावा.
- शिजत आलेल्या सासवामध्ये मीठ घालावे आणि फोडणी घालून गॅस बंद करावा.
आंबट, गोड, तिखट चवीचे हे घोटाचे सासव चपातीसोबत अप्रतिम लागते.