तसं पाहायला गेलं तर गोवेकरांचा मुख्य आहार मासे. परंतु गोवेकर शाकाहारी पदार्थही आवडीने खातो. पारंपरिक असोत वा मोसमी गोवन शाकाहारी पदार्थांची लिस्टही मोठी आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा येताच गोवेकरांना पावसाळी भाज्यांची ओढ लागते. ह्यातली प्रत्येक भाजी कमीत कमी एकदा तरी खाल्लीच पाहिजे असे त्यांचे म्हणणे असते. परंतु खाण्याच्या सवयी बदललेली नवी पिढी मात्र ह्या पारंपरिक मोसमी भाज्यांपासून काहीशी दूर गेलेली आहे. ह्या सर्व पावसाळी भाज्या स्वतःच्या विशिष्ट चवीबरोबरच औषधी गुणधर्मांनी युक्तही आहेत. त्यामुळे घरातील जुन्या जाणत्या महिला ह्या भाज्या खाण्यासाठी आग्रही असतात.

तेरे, तायखिळा (टाकळा), मस्काची भाजी (शेवग्याच्या पानांची भाजी), आकूर, अळू, लुतीची भाजी, फागला, कुडुकीची भाजी, किल्ल (bamboo shoots), तवशे, पिपरी आणि नैसर्गिकरित्या उगवणारी अळंबी; जी केवळ पावसाळ्यात मिळते. अशा अनेक तऱ्हेच्या भाज्यांची रेलचेल पावसाळ्यामध्ये होत असते  .

पावसाळ्यात नदी काठी आकूर ह्या भाजीचे कोंब उगवतात. तांबूस हिरव्या रंगाची ही भाजी कोवळ्या अंकुर स्वरूपातच बाजारात येते. चणा डाळ, हिरवे वाटाणे, मसूर अशा वेगवेगळ्या कडधान्यांबरोबर आकूरची अत्यंत चविष्ट अशी पातळ भाजी केली जाते.  

तायखिळा

प्रत्येक पावसाळी भाजीला स्वतःची वेगळी चव आहे. काहीशी मेथीप्रमाणे दिसणारी आणि रस्त्यावर जिकडे तिकडे उगवणारी तायखिळ्याची भाजी किंचित तुरट असते. त्याच प्रमाणे मस्काची म्हणजे शेवग्याच्या झाडाच्या कोवळ्या पानांची भाजीही किंचित तुरट पण अतिशय रुचकर लागते. गोव्यामध्ये ह्या भाज्या फणसाच्या आठळ्या घालून केल्या जातात. ह्या सर्व भाज्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त असल्याने त्या एकदा तरी खाव्या असा सल्ला घरची बुजुर्ग मंडळी देत असतात. शेवग्याची पाने तर पोटाच्या विकारासाठी उत्तम असल्याने पावसाळ्यात ती भाजी जितक्या वेळा खाता येईल तितकी खावी असे त्यांचे म्हणणे असते.  

पावसाळा येताच विपुल प्रमाणात उगवणारे अळूही सर्वांच्या आवडीचे. अळूच्या वड्या तर लहान थोर सगळ्यांच्या आवडत्या. पण पारंपरिक पद्धतीने फणसाच्या आठळ्या घालून केलेली अळूची पातळ भाजी सुद्धा आवडीने खाल्ली जाते. तेरे ही सुद्धा अळूच्या प्रकारातील भाजी. ह्या दोन्ही भाज्या खाजऱ्या असल्यामुळे ह्यामध्ये आमसुले तसेच पावसाळ्यातच मिळायला सुरु झालेले आंबट अंबाडे घातले जातात.

फागला ही छोट्या कारल्या सारखी दिसणारी काटेरी फळभाजी. ह्या फागलांचे तव्यावर केलेले रवा फ्राय हे मोठ्यांबरोबरच बच्चेमंडळींना देखील आवडते. आणखीन एक सर्वांचा अतिशय आवडीचा प्रकार म्हणजे किल्ल किंवा कोंब किंवा बांबू शूट्स. विशिष्ट वास आणि चव असलेल्या किल्लाचे दबदबीत करतात. परंतु ह्या किल्लाचे जे लोणचे बनवले जाते त्याच्या चवीचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील.

पिपरी
तवशे

तवशे आणि पिपरी हे काकडीचे प्रकारही ह्याच मोसमात मिळतात. तवश्याची रवा आणि गूळ घालून केलेल्या  तवसोळीला पारंपरिक केक म्हणायला हरकत नाही. पिपरी म्हणजे पोपटी रंगाची छोटी काकडी जिचा कुठलाही पदार्थ न बनवता तशीच खाणं अधिकाधिक लोक पसंत करतात.

नैसर्गिक स्वरूपात उगवणारी अळंबी मात्र लहानथोर सगळ्यांची आवडती. शाकाहारी असूनही मांसाहाराच्या चवीला मागे टाकणाऱ्या ह्या अळंबीची शाकुती, तसेच रवा फ्राय खाण्यासाठी सर्वजण आतुरलेले असतात.

गोव्यामध्ये पावसाळी मोसमात मिळणाऱ्या ह्या अशा विविध भाज्या. त्यांची चव प्रत्येक पावसाळ्यात कमीत कमी एकदा तरी प्रत्येकांनी चाखावीच! 

कॅटेगरी Goa