दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. लहान थोर सर्वांचा आवडता. मात्र सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येक राज्याची वेगळी. कुटुंबाबरोबर आनंद साजरा करणे ही ह्या सणाची मध्यवर्ती कल्पना. हा आनंद मग दिवे लावून, रंगीत रांगोळ्यांनी घर,अंगण सजवून आणि मिठाई वाटून साजरा केला जातो.
गुरु द्वादशी पासून सुरु होणारी दिवाळी यमद्वितीया म्हणजे भाऊबीजेदिवशी संपते. या दोन दिवसांच्या मध्ये धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बली प्रतिपदा अर्थात पाडवा असे आणखी चार महत्वाचे दिवस येतात. गुजराथ मध्ये धनत्रयोदशी उत्साहाने साजरी करतात तर महाराष्ट्रात पाडवा अधिक महत्वाचा. गोव्यात मात्र नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन हे दोन दिवस महत्वाचे. पाडवा, धनत्रयोदशी ह्या दिवसांना इथे विशेष महत्व नाही.
नरकचतुर्दशीच्या दिवशी लहान थोर सर्व जण; सकाळी स्नान करून, ओवाळणी वगैरे झाली की सुंदर कपडे आणि दागिने घालून मंदिरामध्ये देव दर्शनाला जातात. एकमेकांच्या घरी मोठ्यांच्या पाया पडायला, एकमेकांना शुभेच्छा द्यायला जातात. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार विविध तऱ्हेचे पोहे आणि काही विशिष्ट पदार्थ देऊन केला जातो.
महाराष्ट्रात जसे दिवाळी सण म्हटलं की फराळ ठरलेला असतो. तसे गोव्यामध्ये दिवाळी म्हटलं की घरोघरी विविध तऱ्हेचे पोहे करतात. दिवाळीचं आमंत्रणही इथे लोक एकमेकांना आमच्याकडे पोहे खायला या हं…असेच देतात, इतके पोहे महत्वाचे. पोह्याचे हे विविध पदार्थ हातसडीच्या लाल गावठी पोह्यांपासून बनवलेलेअसतात. पोह्यांच्या ह्या विविध पदार्थांमध्ये, दुधातले पोहे, नारळाच्या दुधातले म्हणजे रोसातले पोहे, बटाटे पोहे, दह्यातले पोहे असे विविध प्रकार असतात. त्याचबरोबर काही उसळी सुद्धा बनवल्या जातात. त्यामध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ किंवा पांढऱ्या वाटण्याची उसळ असते. आंबाडा ह्या आंबट चवीच्या,कोकण किनारपट्टीवर मिळणाऱ्या फळापासून, आंबाड्याची करम हा विशिष्ट पदार्थही विशेषतः सारस्वत कुटुंबांमध्ये खास दिवाळीला बनविला जातो.
गोव्यातील दिवाळीचे आणखीन एक एकमेवाद्वितीय असे वैशिष्ट्य म्हणजे नरकासुर वध. नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी सर्व गोव्यामध्ये मोठमोठे नरकासूर उभे केले जातात. हे नरकासुर बनवण्यासाठी कित्येक दिवस आधी तरुण मुले एकत्र येतात. पूर्वी लाकडाचा सांगाडा करून हा नरकासूर बनवला जात असे. आता हा सांगाडा लोखंडी सळ्यांचा बनवलेला असतो. लाकडी फळ्यांचा वापर करून नरकासुराची छाती, पाय, हात बनवले जातात. त्यामध्ये सुके गवत भरून बाहेरून पेपर चिकटवून एक भला थोरला नरकासुर आकार घेऊ लागतो. नंतर त्याला सुंदर रंगीत कपडे आणि अलंकार घालून सजवले जाते. दिवाळी जवळ येऊन पोचली की बाजार नरकासुराच्या लहान मोठ्या चेहऱ्यांनी भरून जातो. संपूर्ण नरकासुर तयार झाला की शेवटी चेहरा बसवून नरकासुर पूर्णत्वास येतो.
दिवाळीच्या आधी आठवडाभर मुले नरकासुर बनवण्यात रमलेली असतात. संपूर्ण गोवाभर वेगवेगळ्या आकाराचे नरकासुर वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात. कुठे तो श्रीमंत राजासारखा दिमाखात उभा असतो तर कुठे राक्षसी विक्राळ रूपामध्ये दिसतो. हे नरकासुर पाहण्यासाठी लोक रात्री उशिरापर्यंत गर्दी करतात. नरकचतुर्दशीच्या पहाटे ह्या नरकासुराचे दहन केले जाते. नरकासुर वधाच्या स्पर्धाही ह्यादिवशी आयोजल्या जातात. ज्यामध्ये श्रीकृष्ण नरकासुर युद्ध आणि नरकासुराचा वध हा देखावा उभा केला जातो. ह्या स्पर्धा पाहण्यासाठीसुद्धा लोक उत्साहाने गर्दी करतात.
लक्ष्मी पूजनादिवशी संध्याकाळी घरोघरी तसेच सर्व लहानमोठ्या दुकानातून लक्ष्मी पूजन केले जाते. आपल्या घरातले पूजन आटोपून लोक एकमेकांकडे दर्शनासाठी जातात. गप्पांची देवाण घेवाण होते. पोहे खाण्याचा आग्रह होतो. दिवाळीचे हे दोन दिवस असे उत्साहभरल्या आनंदाने निघून जातात. आणि गोव्यातील दिवाळी संपते. दुसऱ्या दिवशी पासून गोवेकर पुन्हा आपल्या रोजच्या दिनचर्येला सुरुवात करतो.
भाऊबीजेचा सण मग भावाबहिणीच्या सवडीप्रमाणे किंवा सगळे जवळपास राहात असतील तर भाऊबीजेच्या दिवशी साजरा केला जातो. आणि मग गोवेकर व्हडल्या दिवाळीची म्हणजे तुळशीच्या लग्नाची वाट पाहू लागतात. तुळशीचे लग्न म्हणजे मोट्ठी दिवाळी संपली की खऱ्या अर्थाने दिवाळी संपते. घरोघरीचे आकाशकंदील आणि लाईट्स उतरले जातात.
अशी ही गोव्यातील दिवाळी, पोह्यांच्या विविध चवीची, नरकासुरवधाच्या जल्लोषाची आणि आनंदाच्या देवाणघेवाणीची!