गोमंतकीय शाकाहारामध्ये वैविध्य आहे, वैपुल्य आहे. बरेच गोमंतकीय पारंपारिक पदार्थ पिढ्या दर पिढ्या एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे जात आहेत. पुन्हा प्रत्येक पदार्थावर त्या त्या घराचे संस्कार होऊन एकच पदार्थाच्या पाककृतीमध्येही थोडेफार वेगळेपण आढळते. तरीही काही पारंपारिक पदार्थ जुन्या पिढी बरोबर नाहीसे झालेले आहेत. त्यातलाच एक विशेष माहीत नसलेला आणि नाहीसा होण्याच्या मार्गावर असलेला पदार्थ म्हणजे लातड.
काही सुगरणींना हा पदार्थ माहीत असेलही किंवा त्याला एखादे वेगळे नावही असू शकते. तरीही हा पदार्थ फारसा प्रसिद्ध नाही हे निश्चित.
लातड हा भिजवलेल्या उकड्या तांदळाच्या रवाळ पिठापासून बनवललेला गोड पदार्थ आहे. मोजके साहित्य आणि सोपी पाककृती, तरीही पौष्टिक असलेला हा पदार्थ कसा करायचा ते आता पाहू.
लातड बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
उकडीचा तांदूळ: एक वाटी
खवलेला नारळ: अर्धी वाटी
बारीक केलेला गूळ: अर्धी वाटी ( तुमच्या आवडीनुसार आणि तुम्ही कोणता गुळ वापरता त्याप्रमाणे कमी जास्त )
वेलची पूड: १/४ चमचा
मीठ: १/४ चमचा
लातड बनवण्याची कृती:
१. उकडीचा तांदूळ स्वच्छ धुवून ८-१० तास भिजत ठेवावा.
२. भिजवलेला तांदूळ खवलेल्या नारळाबरोबर आधी कोरडाच मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा.
३. थोडे थोडे पाणी घालून त्याचे रवाळ पीठ करून घ्यावे.
४. इडलीसाठी जितके पातळ असते तितकेच पीठ पातळ करावे.
५. ह्या पिठामध्ये वेलची पूड आणि मीठ घालून हलवून एकत्र करावे.
६. लातडला तुम्हाला जो आकार द्यायचा असेल त्या आकाराच्या भांड्याला तूप लावून त्यामध्ये तयार पीठ ओतावे..
७. कुकर मध्ये अथवा इडली पात्रामध्ये हे भांडे ठेऊन २५ ते ३० मिनिटे वाफवून घ्यावे. सुरुवातीला चांगली वाफ येई पर्यंत मोठ्या आचेवर ठेवावे. एकदा वाफ येऊ लागली की आच मध्यम करावी.
८. कुकरमध्ये वाफवत असल्यास कुकरची शिट्टी काढून ठेवावी.
९. २०-२५ मिनीटांनी पिठामध्ये सुरी घालून पाहावे. सुरीला पीठ चिकटले नाही तर लातड तयार झाले असे समजावे.
१०. सुरीला पीठ चिकटलेले दिसले तर आणखीन पाच मिनिटे वाफवून घ्यावे.
११. त्यानंतर भांडे कुकरमधून काढून संपूर्ण थंड होऊ द्यावे.
१२. थंड झाले की सुरीने हलकेच सर्व कडा मोकळ्या कराव्या आणि एका प्लेट मध्ये हे तयार झालेले लातड काढावे.
१३. हे संपूर्ण लातड तव्यावर साजूक तुपात भाजून घ्यावे व त्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे काप करावे. किंवा आधी काप करून मग ते काप तुपावर भाजून घ्यावेत.
वाढण्यापूर्वीच्या सूचना
हा पारंपारिक गोड पदार्थ गरमागरम खाल्ला तर अधिक रुचकर लागतो. गरम गरम तव्यावर, साजूक तुपामध्ये खुसखुशीत भाजलेला हा पदार्थ तव्यावरून जेव्हा थेट ताटात येतो तेव्हा तो खाण्याची मजा काही औरच असते. सकाळच्या न्याहारीला, मुलांना मधले खाणे म्हणून किंवा सणासुदीला पटकन बनवता येईल असा वेगळा पारंपरिक गोड पदार्थ करायचा असल्यास हा एक उत्तम पर्याय आहे.
हा अस्सल गोमंतकीय पदार्थ का करून पाहावा?
लातड हा फक्त एक पदार्थ नाही, तर तो गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा लुप्त होत चाललेला एक भाग आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये, सोप्या पद्धतीने तयार होणारा आणि पौष्टिकतेने भरलेला हा पदार्थ आजच्या काळाची गरज आहे—विशेषतः पारंपारिक भारतीय पदार्थ, गुळापासून बनवलेले गोड पदार्थ आणि ग्लुटेन-फ्री न्याहारीच्या पर्यायांमध्ये ह्या पदार्थाचा पुन्हा समावेश होणे आवश्यक आहे.
लातडसारखे पदार्थ पुन्हा आपल्या स्वयंपाकघरात आणणे म्हणजे आपल्या खाद्यपरंपरेचे जतन करण्याबरोबरच घरगुती आणि पारंपरिक पद्धतीच्या स्वयंपाकाचा आनंदही अनुभवणे आले.
जर तुम्हाला दुर्मिळ गोमंतकीय पाककृती किंवा पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आवडत असतील, तर लातड नक्की करून पाहिला पाहिजे.