पर्तगाळी मठ आणि श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे अनावरण

पर्तगाळी मठ हे नाव गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या २८ तारखेला श्रीरामाच्या ७७ फुटी कास्याच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झाले आणि पर्तगाळी मठाचे नाव देशभरात पोहोचले.

अनेक जणांनी ह्या मठाचे नाव श्रीरामाच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर पहिल्यांदाच ऐकले असेल परंतु ह्या मठाला साडे पाचशे वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि ह्याचेच औचित्य साधून पर्तगाळी मठाचा देव श्री रामदेव अर्थात श्रीरामाच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

Shriram Statue Partagali
साडे पाचशे कोटी रामनाम जप अभियान

तत्पूर्वी साडे पाचशे कोटी राम नाम जप अभियान हा अध्यात्मिक उपक्रम गेल्या साधारण दीड वर्षाच्या काळात पूर्ण करण्यात आला. ज्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी, मठाच्या असंख्य अनुयायांनी ह्या उपक्रमामध्ये भाग घेतला. श्रीरामाची विविध नावे दिलेल्या ह्या रामनाम जप मंडळांची नोंद श्रीरामाच्या ७७ फुटी पुतळ्याच्या आधारस्तंभावर केलेली आहे.

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ : एक परिचय

ह्या भव्य पुतळ्यामुळे देशभरात नाव झालेल्या, ‘श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ’ जो सामान्यपणे पर्तगाळी मठ किंवा जीवोत्तम मठ म्हणूनही ओळखला जातो त्याबद्दल जाणून घेऊया.

गोव्यातील काणकोण येथे कुशावती नदीच्या काठावर वसलेल्या शांत अशा छोट्या पर्तगाळी गावामध्ये ह्या मठाचे मुख्यालय आहे. हा मठ द्वैत परंपरेतील गौड सारस्वतांचा पहिला मठ मानला जातो. ही परंपरा १३ व्या शतकामध्ये जगद्गुरू मध्वाचार्य यांनी सुरु केली. 

Kushavati river, Partagali
द्वैत परंपरा आणि गौड सारस्वत समाजातील परिवर्तन

द्वैत वेदांताचा प्रसार करण्यासाठी श्री मध्वाचार्यांनी उडुपी येथे अष्टमठ (आठ मठ) स्थापन केले.

गोव्यातील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या इतिहासात श्री मध्वाचार्यांच्या आगमनाने आणि त्यांच्या द्वैत तत्त्वज्ञानाने एक मोठाच बदल घडवला. याच काळात या समाजाचे दोन गट पडले.

भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहासावर आपली विलक्षण छाप सोडणाऱ्या श्री मध्वाचार्यांच्या द्वैत तत्त्वज्ञानाने गौड सारस्वतांच्या मनावर खोल ठसा उमटवला. या सारस्वतांपैकी अनेकांनी वैष्णव मार्ग स्वीकारला, ज्यांनी या मार्गाचा स्वीकार केला नाही तो उर्वरित समाज स्मार्त म्हणून ओळखला जाऊ लागला.

पश्चिम किनाऱ्यावरील वैष्णवांचे गुरुपीठ

आपल्या द्वैत वेदान्ताच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी श्री मध्वाचार्यांनी उडुपी येथे जी अष्टमठांची स्थापना केली; त्यातील पळीमारू मठाचा पश्चिम किनाऱ्यावरील वैष्णव गौड सारस्वतांनी आपले अध्यात्मिक गुरुपीठ म्हणून स्वीकार केला.

ह्या मठाचे दहावे आचार्य श्री रामचंद्र तीर्थ हिमालयात यात्रेला गेले असता त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. आपल्या निधनानंतर मठातील गुरुपरंपरेत खंड पडू नये म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांपैकी एका तरुण सारस्वत बटुला दीक्षा देऊन त्याला “श्री नारायण तीर्थ” हे नाव दिले.

काशीतील घटना आणि गौड सारस्वतांसाठी मठाची संकल्पना

दीक्षेनंतर श्री नारायण तीर्थ स्वामी उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी गेले. ते काशीला पोहोचले असता एक दुर्दैवी घटना घडली. राजाच्या सैनिकांनी  श्री नारायण तीर्थानी चोरी केल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप केला. परंतु ते निरपराधी असल्याचे सिद्ध झाल्याने राजाने स्वामींच्या चरणी लोटांगण घालून क्षमा मागितली.

त्यावेळी स्वामींनी राजास विनंती केली की गंगेच्या काठावर एक मठ बांधवा, म्हणजे काशीला येणाऱ्या गौड सारस्वतांना उपासनेसाठी जागा मिळेल. सैनिकांच्या चुकीवर जास्त नाराज न होता अत्यंत सौम्य शिक्षा मिळाल्याने आनंदित झालेल्या राजाने ही विनंती तात्काळ मान्य केली.

भटकळ येथे मठाची स्थापना

श्री नारायण तीर्थ स्वामी उडुपीला परतले तेव्हा श्री रामचंद्र तीर्थ स्वामींची प्रकृती चांगली सुधारली होती. मात्र द्रविड अनुयायांना सारस्वत स्वामीने मठाचा कार्यभार स्वीकारावा हे मान्य नव्हते. ही परिस्थिती पाहून गुरुस्वामींनी श्री नारायण तीर्थांना आपल्या गौड सारस्वत समाजासाठी स्वतंत्र मठ स्थापन करण्याची विनंती केली.

त्यानुसार श्री नारायण तीर्थ स्वामींनी भटकळ येथे एका मठाची स्थापना केली आणि अशा रीतीने गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाची परंपरा सुरू झाली.

गोकर्ण येथे मठाची उभारणी

तिसरे आचार्य श्री जीवोत्तम तीर्थ स्वामींनी गोकर्ण येथे एक मठ उभारला, त्यानंतर हा मठ श्री गोकर्ण जीवोत्तम मठ म्हणून ओळखला जाऊ लागला.

स्वामी एकदा उत्तरेला यात्रेला गेलेले असता नदीच्या प्रवाहात मिळालेल्या विठ्ठलाच्या तीन मूर्तींपैकी एक, भू-विजय विठ्ठलाची मूर्ती गोकर्ण मठात प्रस्थापित करण्यात आली. दुसरी मूर्ती — श्री दिग्विजय विठ्ठल, बसरूर येथील उपमठात स्थापित केली आणि तिसरी मूर्ती — श्री वीर विठ्ठल ही स्वामींनी आपल्या व्यक्तिगत उपासनेसाठी ठेवली. आजतागायत श्री वीर विठ्ठलाची ही व्यक्तिगत पूजा परंपरेने सुरू आहे.

गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ
पर्तगाळी मठ मुख्य गुरुपीठ म्हणून उदयास

पुढे पाचवे आचार्य श्री अनुजीवोत्तम तीर्थ स्वामींनी गोव्यातील डिचोली येथे मठ स्थापन केला. त्यानंतर आलेले सहावे आचार्य श्री रामचंद्र तीर्थ स्वामींनी पर्तगाळी येथे मठ उभा केला आणि पुढे हा मठ मुख्य गुरुपीठ म्हणून विकसित झाला.

पोर्तुगीज काळातील धैर्य आणि समाजासाठी आधारस्तंभ

काळ पुढे सरकत गेला तशी स्वामीजींनी दाखवलेली प्रज्ञा, अध्यात्मिक सामर्थ्य आणि दूरदृष्टीमुळे मठ अधिकाधिक भक्कम होत गेला आणि देशभर त्याची केंद्रे स्थापन झाली. गोव्यातील पोर्तुगीज आक्रमणाच्या कठीण काळातही मठाच्या स्वामींनी दाखवलेल्या धैर्यामुळे समाजाला त्या संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळाली. गौड सारस्वत समाजासाठी हा मठ म्हणजे आशेचा एक दीपस्तंभ ठरला.

Vidyadhiraj Tirth Swami, Partagali
विद्याधिराज तीर्थ स्वामी आणि मठाचा विस्तार

इ. स. १९७३ मध्ये विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामींनी सारस्वत समाजाच्या ह्या सर्वोच्च अध्यात्मिक पीठाची सूत्रे स्वीकारली. विद्याधिराज तीर्थ स्वामींच्या काळात अनेक मठांचे जीर्णोद्धार करण्यात आले. वाराणसी, बसरूर, गोकर्ण, पर्तगाळी, अंकोला, मंगळूर, गंगोळी असे अनेक ठिकाणचे मठ दुरुस्त करण्यात आले. यल्लापूर, हुबळी, बद्रिकाश्रम, बेळगाव, दांडेली, मडगाव, पर्वरी, भद्रावती, नाशिक, वास्को आणि इतर काही ठिकाणी नवीन मठ उभारण्यात आले.

परमपूज्य स्वामींनी आपल्या वैयक्तिक गरजा आणि आरोग्य यांची पर्वा न करता दिवसरात्र मठाच्या आणि समाजाच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.

योग्य शिष्याचा शोध आणि विद्याधीश तीर्थ स्वामी

मठाच्या परंपरा पुढे चालवण्यासाठी, एक योग्य शिष्य म्हणून बटू शोधावा असे स्वामीजींच्या मनात आले; जो पुढे २४वे मठाधीशपद भूषवेल. त्यासाठी स्वामीजींनी शोध सुरु केला. इ.स. २०१४ च्या सुमारास त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. 

बेळगावमध्ये २०१२ साली झालेल्या चातुर्मासादरम्यान स्वामींचे लक्ष उदय भट नावाच्या एका बटुकडे गेले. त्याचा स्वभाव, वर्तन आणि धार्मिक मनोवृत्ती यामुळे स्वामीजी प्रभावित झाले. चातुर्मास संपेपर्यंत स्वामींनी आपली पसंती व्यक्त केली नाही. कारण त्यांना बटूच्या अध्यात्मिक ओढीबद्दल आणि वर्तनाबद्दल अजून जाणून घ्यायचे होते. कोणतीही गोष्ट पडताळून पाहण्याची स्वामींची विशिष्ट पद्धत होती. त्याप्रमाणे त्यांनी बटूची संपूर्ण वर्तणूक पडताळून पाहिल्यानंतर श्री रामदेव वीर विठ्ठलाच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण करावे असा आदेश बटू उदय भट यास दिला. त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या उदय भट शर्मा यांनी स्वामीजींचा आदेश मोठ्या आनंदाने स्वीकारला व श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात श्री रामदेव, वीर विठ्ठल आणि स्वामीजींच्या चरणी स्वतःला अर्पण केले. अशा प्रकारे मठाची परंपरा पुढे चालवण्यासाठी योग्य शिष्य नेमण्याची स्वामीजींची इच्छा पूर्ण झाली.

Swami Vidyadhiraj and Swami Vidyadheesh
संस्कार, शिक्षण आणि सेवाभावातून घडलेला शिष्य

उदय भट हे बेळगाव येथील शाखा मठाचे पुजारी वेदमूर्ती लक्ष्मीनारायण भट आणि सौ पद्मावती भट यांचे द्वितीय पुत्र होत. आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेळगावमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेळगाव मधील मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अत्यंत अभ्यासू व तेजस्वी असे उदय भट; शाळा, महाविद्यालय, घर किंवा मठ कोठेही असो, दिलेले काम मनोभावे व एकाग्रतेने करत.

मातृभाषा कोकणी असलेल्या उदय यांचे कोंकणी भाषेबरोबरच मराठी, कन्नड, संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व आहे. विद्याधिराज स्वामींकडून शिष्यत्वाचा स्वीकार करण्याचा आदेश आल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी अभ्यास सोडला व ते स्वामीजींच्या चरणी शिष्य म्हणून उपस्थित झाले.

Swami Vidyadheesh, Partagali Math
दीक्षा, शिक्षण आणि मठाधीशपद

विद्याधिराज स्वामींनी  त्यांना श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर हे संन्यासनाम दिले. दीक्षा मिळाल्यापासून त्यांनी गुरु-मठातील सर्व नियम, आचारसंहिता व सेवेची शिस्त निष्ठेने पाळली. त्यांनी श्री रामदेव, वीरविठ्ठल आणि गुरुस्वामींच्या चरणी स्वतःला पूर्णतः अर्पण केले आणि मठातील सर्व पूजाविधी, सेवा आणि परंपरा आनंदाने व भक्तीभावाने निभावल्या.

संस्कृत भाषेचा सखोल अभ्यास, वेद, मंत्र, ज्योतिष, काव्य आणि इतर विषयांचे शिक्षण—ह्या सर्वांचा, गुरुस्वामींच्या देखरेखीखाली शिक्षकाकडून त्यांनी मन लावून अभ्यास केला.

१९ जुलै २०२१ रोजी २३ वे स्वामी विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या महानिर्वाणानंतर; ३० जुलै २०२१ रोजी (आषाढ कृष्ण सप्तमी) गुरुपीठारोहण समारंभात श्री विद्याधीश तीर्थ स्वामींना मठपरंपरेचे २४ वे मठाधीश म्हणून दीक्षित करण्यात आले.

Shriram statue Partagali
५५० वर्षांचा गौरवशाली टप्पा: पर्तगाळी मठाचा ऐतिहासिक उत्सव

२८ नोव्हेंबर २०२५ ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेल्या श्रीरामाच्या भव्य मूर्तीची उभारणी करण्याची कल्पना व मूर्तीची निवड स्वामीजींचीच होती. तसेच साडे पाचशे वर्षे पूर्ण झाल्याने करण्यात आलेला साडे पाचशे कोटी रामनाम जप यज्ञ व इतर कार्यक्रम  हे सर्व विद्याधीशतीर्थ स्वामींच्या मार्गदर्शनाखाली सफलतेने पूर्ण झाले.

अशाप्रकारे साडे पाचशे वर्षांपूर्वी म्हणते इ.स. १४७५ मध्ये स्थापना झालेला हा पर्तगाळी मठ, श्रीरामाच्या भव्य मूर्तीच्या अनावरणानंतर दक्षिण अयोध्या म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. मठाच्या अनुयायांबरोबरच सर्व श्रीराम भक्तांसाठी; कुशावती नदी काठी वसलेला हा सुंदर मठ , अत्यंत देखणा असा श्रीरामाचा कास्याचा पुतळा, रामायण थीम पार्क आणि संग्रहालय हे सर्व एकदा तरी भेट द्यावे असे पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे.

कॅटेगरी GoaGoan Temples

error: Content is protected !!