गोव्याचा आणखीन एक पारंपरिक पदार्थ, खतखते! जे गोव्याबरोबरच; महाराष्ट्र, कर्नाटकातील सारस्वत कुटुंबात गणेश चतुर्थीला आवर्जून केले जाते. गणपतीचा तो आवडता पदार्थ आहे अशीही एक धारणा आहे. श्रावण महिन्यात मिळणाऱ्या, तसेच काही बारमाही मिळणाऱ्या विविध भाज्या घालून केलेली ही भाजी म्हणजे अवीट गोडीचा खास पदार्थ आहे. ह्यात घातलेल्या प्रत्येक भाजीची चव आणि वास ह्या भाजीला एक विशिष्ट चव प्राप्त करून देतेच पण त्रिफळ नावाचं गोवा आणि कोकण प्रांतात मिळणारं एक छोटंसं फळ जे मसाला म्हणून वापरलं जातं, त्याची चव आणि वास हे खतखत्याच्या अवीट गोडीचा राजा म्हणायला हरकत नाही. त्यामुळे खतखत्यामध्ये त्रिफळ हे असलंच पाहिजे. 
 
खतखत्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या-
  • मुळा
  • भोपळा
  • सुरण
  • वांगं
  • बटाटा
  • कच्चं केळं
  • नीरफणस
  • मक्याचं कणीस
  • मोठी काकडी
  • मुडली (अरवी)
  • शेवग्याची शेंग
  • भेंडी (गोव्यामध्ये श्रावणात मिळणारी शेवग्याच्या शेंगेएवढी मोठी भेंडी)
  • कोंब (Bamboo shoots) 

ह्या मुख्य भाज्यांशिवाय , गाजर, दोडकं, पडवळ, तेंडली, गड्डा, दुधी भोपळा; ह्या सर्व किंवा यातील मिळतील तितक्या भाज्या, हवे असल्यास भुईमुगाच्या शेंगाचे दाणे किंवा मटार..

खतखते किती लोकांसाठी बनवणार त्या प्रमाणात आणि आपल्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या घ्याव्यात.

कृती –

1. फोडणी: हिंग, मोहरी आणि ठेचलेली त्रिफळे घालून फोडणी करावी, त्यात ओल्या मिरच्या, आल्याचे बारीक तुकडे किंवा ते जर आवडत नसेल तर किसून आलं टाकावं.

2. भाज्या शिजवणे:  त्यानंतर शिजायला जास्त वेळ लागणाऱ्या भाज्या आधी थोड्या शिजवून घ्याव्या मग पटकन शिजणाऱ्या भाज्या त्यात टाकाव्या. तुरीची साधारण एक वाटी डाळ, तसेच मुडली, कोंब, कणीस कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
3. सर्व भाज्यांचे एकत्रीकरण : भाज्या साधारण शिजत आल्या की  त्यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली डाळ आणि भाज्या घालाव्यात. त्याचबरोबर एक वाटी वाटलेलं ओलं खोबरं, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून एकजीव होईपर्यंत शिजवावे. चविष्ट खतखते तयार. 
खतखते, पारंपरिक गोवन पदार्थ

गोव्यामध्ये बनवण्यात येणाऱ्या खतखत्याच्या पारंपारिक कृतीत तुरीची डाळ वापरत नाहीत. त्याऐवजी उकडलेले वाटाणे (green peas) घालतात. ओल्या मिरचीऐवजी लाल सुकी मिरची घातली जाते आणि खोबऱ्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. खोबरं वाटताना त्यामध्ये लाल मिरची, चिंच, हळद, मिरी आणि धणे घालून वाटण वाटले जाते. बाकी कृती सेम..हे ही अर्थात तितकंच रुचकर लागते, हे सांगायलाच नको. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सारे कुटुंबीय, मित्र मंडळी आपले वेगवेगळे स्वभाव, मतभिन्नता सगळं विसरून एकत्र येतात आणि घराघरात एक आनंदी खेळकर वातावरण निर्माण होतं. जणू नात्याचं खतखतंच…! सगळ्यांनी नेहमीच गुण्यागोविंदाने एकत्र नांदलं तर आयुष्याची चवही छान रुचकर होईल अशीच शिकवण देतं जणू हे चविष्ट खतखते!
 
कॅटेगरी Goan Food