अनेकांचे आवडते पणजी शहर

गोवा आणि गोव्याचे राजधानी असलेलं पणजी शहर अनेक जणांना आवडत असेल. त्याच्या ओढीने देश विदेशातील अनेक नागरिक या पणजी शहराला भेट देत असतील. कुणाला मिरामार बीच आणि दोना पॉल आकर्षित करत असेल, आणखी कुणी कॅसिनो आणि क्रूझ च्या ओढीने इथे परत परत येत असतील. कुणाला मांडवी वेड लावत असेल. दोन्ही बाजूनी भव्य झाडांच्या कमानींच्या सावलीत विसावलेल्या दयानंद बांदोडकर मार्गाच्या एखादा प्रेमात असेल. माझी पाऊलं मात्र पणजीत शिरलं की सगळ्यात आधी कला अकादमीच्या दिशेने चालू लागतात

कला अकादमी नव्हे, हे तर कला मंदिर!

 

ह्या इमारतीचं पहिल्यांदा जेव्हा दर्शन घेतलं तेव्हापासून आजतागायत या वास्तूच्या मी प्रेमात आहे. त्याचं एक कारण म्हणजे स्वतः ही वास्तू आणि तिचा परिसर. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी ज्यांना देव मानते अशा अनेक कलाकारांचं दर्शन ह्या वास्तुमुळे मला झालं. म्हणून ह्या इमारतीला मी कला मंदिर म्हणते.

रसिक कलाकारांचे आवडते स्थान

 

लग्न होऊन गोव्यात आल्यानंतर माझं सुरुवातीचं वास्तव्य पणजी नगरीत, कला अकादमी पासून अवघ्या सात आठशे मीटर अंतरावर होतं. त्यावेळी संध्याकाळच्या फेरफटक्याच्या निमित्ताने पावले आपसूक कला अकादमीकडे वळायची. 

काही कार्यक्रम असो वा नसो कला अकादमी एरव्हीही माणसांनी गजबजलेली असते तेथील कँटीन हे अनेक कलाकारांचं भेटण्याचं, चर्चा करण्याचं आवडतं ठिकाण. तिथे शिकणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, माझ्यासारखे इमारतीच्या प्रेमात असलेले काही रसिकगण असे सारे परिसरात वावरत असतात. मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलांनाही इथे बागडायला आवडतं.

kala academy back view

कला अकादमी बद्दल थोडेसे

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांचे, गोव्यासाठी एक कला संस्था स्थापन करण्याचे स्वप्न होते. गोवा सरकारने १९७० मध्ये कला अकादमी सोसायटीची स्थापना करून ते स्वप्न साकार केले. चार्ल्स कोरिया ह्यांनी डिझाईन केलेली कला अकादमीची इमारत स्वतःच एक कलेचा उत्तम नमुना आहे असे मला वाटते.  कला अकादमीची ही इमारत १९८३ मध्ये पूर्ण झाली.

संगीत, नृत्य, नाटक, कला, लोककला, साहित्य अशा कलेच्या सर्व प्रकारांचे सादरीकरण करण्यासाठी जिथे कलाकार एकत्र येतात त्या कला अकादमीची इमारत पणजीच्या अतिशय सुंदर अशा कांपाल परिसरामध्ये मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे.

दिनानाथ मंगेशकर हॉल

दिनानाथ मंगेशकर हॉल हा कलाअकादमीचे हृदय आहे. सुंदर रंगमंच आणि मांडणी असलेल्या ह्या देखण्या थिएटर मधील भिंतीवर तिन्ही बाजूला गॅलरी सदृश्य रचनेमधली प्रेक्षकांची भित्तीचित्रे हे ह्या थिएटरचे विशेष आकर्षण आहे. भारतातील विविध धर्मीय नागरिकांची ही सुरेख चित्रकारिता गोव्याच्या मारिओ मिरांडा ह्यांच्या कुंचल्यातून साकारलेली आहे. 

कला अकादमीचे स्वरूप

 

 त्याशिवाय चित्रकार, छायाचित्रकार यांच्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी असणारा हॉल, छोटेखानी कार्यक्रमांसाठी असणारा ब्लॅक बॉक्स, मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची अपेक्षा असल्यास ओपन एअर थिएटर. कँटीन आणि जवळच असलेली छान हिरवळ. हिरवळीच्या बाजूने वर असणाऱ्या क्लासरूम्स कडे जाणाऱ्या पायऱ्या. या हिरवळीवरही काही हौशी कलाकारांचे कार्यक्रम अधून मधून होत असतात त्यावेळी ह्या पायऱ्या प्रेक्षकांना बसण्यासाठी उपयोगी पडतात.

कला अकादमीच्या मुख्य इमारतींसमोरील गेटही त्या इमारतीला साजेसे असे लक्ष वेधून घेणारे आहे. तिथून प्रवेश केल्यावर आतला परिसरही लगेच मनात ठसतो. परिसरातील झाडे, लॉन हे सर्व इमारत परिसराच्या सौंदर्यात भर घालतात.

Kala academy premises
kala academy lawn

स्नेहसंमेलनासाठी शाळांचे आवडते ठिकाण कला अकादमी

 

डिसेंबर जानेवारी महिन्यात अकादमी विविध शाळांच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने गजबजून जाते. वेगवेगळ्या पोशाखात नटलेल्या बालचमूंना इथे आनंदाने किलबिलताना पाहायला खूप छान वाटते.

विविध महोत्सवाचे माहेरघर

 

सुरश्री केसरबाई केरकर महोत्सव, पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव, स्वरमंगेश असे विविध संगीत महोत्सव, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; भजन स्पर्धा, नाट्य स्पर्धा, तियात्र, व्यावसायिक नाटके; कला अकादमीमध्ये वर्षभर असतात.  

 

बाजूच्याच आवारात लोककलांना समर्पित लोकोत्सव सारखे भव्य प्रदर्शनही येथे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात भरते.  देशाच्या विविध प्रांतातील हस्त कला, लोकसंगीत आणि पारंपरिक खाद्य यांचा मेळा लोकोत्सवामध्ये भरलेला असतो.

 

अशा छोट्या मोठ्या असंख्य कार्यक्रमांचे कला अकादमी हे माहेरघर आहे.

निवांत वेळ घालवण्याचे ठिकाण

 

कधीही कंटाळा आला की कला अकादमीला भेट द्यायची असा माझा शिरस्ता आहे. काही कार्यक्रम असल्यास ठीक नाहीतर मागेच असलेल्या दर्या संगमवर जाऊन मांडवीचा सागराशी होणारा संगम पाहत निवांत बसायचे आणि प्रसन्न मनाने घरी परतायचे. हा आमचा कार्यक्रम ठरलेला असायचा.

पुनर्भेट

 

समस्त गोवेकरांची आवडती कला अकादमी दुरुस्तीच्या कारणास्तव गेली चार वर्षे बंद होती. तेव्हा अनेकदा जीव कासावीस व्हायचा. चार वर्षानंतर पुन्हा दोन महिन्यापूर्वी कला अकादमी रसिक प्रेक्षकांसाठी ओपन झाली.  पहिल्याच स्वरमंगेश कार्यक्रमासाठी तिथे जाणे झाले. माहेरचा दरवाजा बंद झालेल्या माहेरवाशिणीला राग रुसवा विसरून परत बोलावणं आल्यानंतर, ती जेव्हा परत माहेरी जाईल तेव्हा तिची काय अवस्था होईल; तशी माझ्या मनाची अवस्था झाली होती. मधल्या काळात अकादमी बंद असताना होणारे दुःख, राग क्षणार्धात पळून गेला.

 

ती इमारतही मला गेले चार वर्षाचे एकटेपणाचे दुःख विसरून, आपल्या सगळ्या प्रियजनांना पुन्हा परतलेले पाहून, आनंदाने गहिवरून, त्यांना आपल्या कवेत घेत आहे की काय असा भास होत होता..

 

अशी ही समस्त कलाप्रेमींची अत्यंत आवडती असलेली कला अकादमी. पणजी शहरातील आवर्जून भेट देण्याचे अप्रतिम   ठिकाण आहे.

कॅटेगरी Goa