गोव्यामध्ये पावसाळ्यात विविध प्रकारच्या पावसाळी भाज्या मिळतात. ह्या पावसाळी भाज्यांमधली एक भाजी म्हणजे आकूर. पावसाळ्यामध्ये नदीकाठी मिळणारी ही भाजी कोवळ्या अंकूर स्वरूपात मिळते. तांबूस हिरव्या रंगाचे हे लांब पातळ कोवळे आकूर साधारण शतावरीसारखे दिसतात. ताज्या ताज्या आकूरची, मसूर, चणा डाळ किंवा नुसत्याच खोबऱ्याच्या वाटणाबरोबर केलेली पातळ भाजी अथवा तोणाक अत्यंत चविष्ट लागते. मसुरीबरोबर केलेलेआकूर मसुराचे तोंडाक तर चवीत अप्रतिम असते.
आकूर मसुराचे तोंडाक करण्याची पद्धत पुढील प्रमाणे—
आकूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
मुख्य साहित्य:
- आकूर: ३ जुड्या
- मसूर: १ वाटी
- ओले खोबरे: १ वाटी
- कांदे: दोन मध्यम आकाराचे
- टोमॅटो: एक
- मीठ: चवीपुरते.
मसाल्याचे साहित्य:
- धणे: १ चमचा
- मिरी: अर्धा चमचा
- मसाला वेलची: एक
- जिरे: अर्धा चमचा
- लवंग: दोन
- सुक्या मिरच्या: ६-७
फोडणीचे साहित्य:
- तेल: दोन चमचे
- हिंग: दोन चिमूट
- मोहरी:एक चमचा
- कढीपत्ता: १०-१२ पाने
- हळद: १/४ छोटा चमचा


कृती
- मसूर स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावा.
- दुसऱ्या दिवशी मसुरीतील पाणी काढून तो पुन्हा धुवून त्यामध्ये थोडा कांदा आणि थोडा टोमॅटो घालून कुकर मध्ये ३ ते ४ शिट्यांवर शिजवून घ्यावा.
- एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घेऊन, पॅन गॅस शेगडीवर ठेवावे.
- तेल गरम करून त्यामध्ये धणे, जिरे, मसाला वेलची, लवंग, मिरी, सुकी मिरची हा खडा मसाला मंद आंचेवर भाजून घ्यावा.
- भाजलेला मसाला बाजूला काढून त्यामध्ये एका कांदा उभा चिरून बदामी रंगावर परतून घ्यावा.
- कांदा भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये खोबरे लालसर भाजून घ्यावे.
- हा सगळा मसाला थंड होई पर्यंत आकूर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे. एक कांदा आणि टोमॅटोही बारीक चिरून घ्यावा.
- एक कढई गॅसवर तापवत ठेवावी. त्यामध्ये एक चमचा तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात मोहरी घालून ती तडतडू द्यावी. तडतडलेल्या मोहरीमध्ये हिंग आणि कढीपत्ता घालावा. हळद घालावी.
- ह्या फोडणीवर आता बारीक चिरलेला कांदा घालून तो हलकासा शिजवून घ्यावा.
- कांदा हलकासा शिजल्यावर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालावा आणि सारखे परतून घ्यावे.
- आता बारीक चिरलेला आकूर कढईत घालून हलवावे व आकूर बुडेल इतके पाणी घालून मध्यम आंचेवर दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्यावे.
- आकूर शिजेपर्यंत भाजेलेला सारा मसाला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावा.
- पंधरा मिनिटानंतर थोड्याफार शिजलेल्या आकूरमध्ये वाटलेले वाटण आणि शिजवलेली मसूर बरोबरच घालावी. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालावे.
- आणखीन दहा मिनिटे हे सर्व शिजवून घ्यावे. हे सर्व छान शिजून एकजीव झाले की त्यामध्ये मीठ घालून दोन तीन मिनिटे आणखी शिजू द्यावे व गॅस बंद करावा.
मसालेदार असे हे आकूर मसुराचे तोंडाक तुम्ही गरमागरम चपाती, भाकरी अथवा पावांबरोबर खाऊ शकता, किंवा आमटी भाताबरोबर तोंडी लावणे म्हणूनही खाऊ शकता.