अनंत देवस्थान म्हणजे अनंतशयन विष्णूचे अप्रतिम सुंदर मंदिर. फोंडा तालुक्यामध्ये असणारी दोन छोटी गावे, सावई आणि वेरे. सावई गाव संपताच वेरे गावामध्ये असणारे हे मंदिर सावईवेरे येथील मदनंत मंदिर म्हणूनही  प्रसिद्ध आहे. पणजीहुन साधारण 24-25 कि. मी. दूर असलेल्या मंदिराला माशेल खांडोळा मार्गे जायचे आहे. माशेल येथील देवकी कृष्ण आणि खांडोळ्याचा महागणपती प्रसिद्ध आहेतच. खांडोळ्याहून पुढे बेतकी, त्यानंतर सावई आणि मग वेरे.

ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य हे की हे मंदिर पाण्यावरती उभे आहे. परंतु मंदिर अशातऱ्हेने बांधलेले आहे की ते पाण्यावर उभे आहे हे कोणाही अपरिचिताच्या अजिबात लक्षात येत नाही. मंदिराच्या पायऱ्या उतरून आपण जेव्हा मंदिर परिसरात प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला समोर मंदिराच्या शेजारी छोटी तळी दिसते. परंतु संपूर्ण मंदिर ह्या तळीवर उभारलेलं आहे. 

स्तंभावरील तुंबरू मूर्ती, अनंत देवस्थान
अनंत देवस्थान सावई-वेरे

मंदिर साधारण ५००-६०० वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते. मंदिराला लाल कौलाचे उतरते छत आहे. इतर मंदिरांसारखा घुमट ह्या मंदिरावर नाही. तर एका सुंदर कोरीव खांबासारख्या रचनेवर छोटा घुमट आणि त्यावर कळस आहे. समोरील भव्य सभा मंडपातून आत मंदिरात प्रवेश करताना, प्रवेश द्वाराच्या समोर फरशांऐवजी ऐवजी काचा बसवलेल्या आहेत. ज्यामधून खालील पाणी आणि त्यामध्ये पोहोणारे छोटे मासे आपल्याला पाहायला मिळतात. नगारखान्यातून आत चौकात प्रवेश करताच नेहमी प्रमाणे चार खांब दिसतात. हे चारही खांब लाकडी आहेत. परंतु त्यातील एक खांब चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे. जिथे देवाचा कौल घेतला जातो. चारही खांबांवर विविध देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत.

मंदिराच्या आतल्या बाजूचा छताचा भाग संपूर्णपणे लाकडी आहे. छताच्या मधोमध एक आकर्षक झुंबर आहे. चौकात प्रवेश करताच उजव्या बाजूला चौकाच्या वरच्या दिशेला जाण्यासाठी लाकडी जिना आहे. चौकात आपण दर्शन घेण्यासाठी ज्या द्वारासमोर उभे राहतो ते लाकडी द्वारावरही सुंदर कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते. त्या द्वाराच्या वर शेषशाही विष्णूची कोरीव मूर्ती आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूला जय-विजय आणि बाजूलाच असलेल्या भव्य खांबांवर नारद आणि तुंबर आहेत.

इथून पुढे गर्भगृह.… साधारणपणे इतर मंदिरांमध्ये, चौकातील दरवाजा आणि गर्भगृहाचा दरवाजा यांच्या मध्ये जी जागा असते ती दोन्ही बाजूने बंद असते.  किंवा दोन्ही बाजूने ह्या जागेत प्रवेश करण्यासाठी दरवाजे असतात. इथले आणखी एक वेगळेपण म्हणजे इथे मात्र हा भाग पॅसेज असल्याप्रमाणे दोन्ही बाजूने ओपन आहे. त्यामुळे भाविक आतल्या बाजूला जाऊनही अगदी गर्भगृहाच्या द्वारातून विष्णूचे दर्शन घेऊ शकतात.

शेषशाही विष्णू अनंत देवस्थान

मंदिरातील शेषशाही विष्णूची मूर्ती काळ्या दगडामध्ये कोरलेली आहे. परंतु गंध पूजा केल्यानंतर, निळ्या आणि इतर रंगाच्या गंधांमध्ये ती इतकी सुंदर तऱ्हेने सजवली जाते की मूर्तीकडे पाहत राहावे असे वाटते. मूर्तीला अभिषेकही मंदिराच्या खालील पाण्यानेच करतात. परंतु हे पाणी मंदिराखालील तळीचे नसून मुख्य मूर्ती आणि तिच्या मागे असलेली अभिषेकाची मूर्ती यांच्या मध्ये एक हातभर खोल विहीर आहे. ह्या विहिरीचे पाणी काढून अनंत अर्थात विष्णूला अभिषेक केला जातो.

मंदिराच्या बाहेरील मोठा मोकळा चौक मात्र साधारण ३०-४० वर्षपूर्वी बांधलेला आहे. ह्या सभागृहाचे छतही लाकडाचे आहे. मंदिराच्या मुख्य द्वाराच्या समोरच्या बाजूला मंदिरातील कार्यक्रमांसाठी रंगमंच उभारलेला आहे. सभागृहाच्या मधोमध असलेल्या फिक्स न केलेल्या फरशीच्या खालून पाणी काढून सभागृहाची स्वच्छता केली जाते. मंदिराच्या सभोवतालचा परिसरही अतिशय सुंदर आहे. हिरवळीने, तसेच फुलझाडे आणि छोट्या माडांनी सुशोभित केलेला हा परिसर मन प्रसन्न करून टाकतो.  मंदिराच्या कंपाउंडच्या बाहेर असणारी शेतं आणि कुळागरं ह्या प्रसन्नतेत आणखीन भर घालतात.

 

अनंत देवस्थान परिसरातील शेतं
अनंत देवस्थान परिसरातील कुळागरं

तर असे हे सुंदर वास्तू आणि रमणीय परिसर असलेले, अनंत अर्थात शेषशाही विष्णूचे एकमेव देवस्थान पुन्हा पुन्हा भेट द्यावे असे आहे.

कॅटेगरी Goan Temples