आंबा फळांचा राजा. आंबा आवडत नाही असा मनुष्य विरळाच. आंब्याच्या मोसमात आंबे कापून खाण्याबरोबरच त्याचे वेगवेगळे पदार्थही करून खाल्ले जातात. आंब्याचा शिरा, आंब्याचा केक, मिल्कशेक, आईस्क्रीम इत्यादी अधिक मागणी असलेल्या पदार्थांबरोबरच गोव्यामध्ये आम्याचे धोणस (आंब्याचे धोंडस), आम्याचे दोणे असे काही पारंपरिक पदार्थही आवडीने करून खाल्ले जातात.
त्यातील आंब्याचे धोणस म्हणजे वाफवलेला पारंपारिक केकच म्हणायला हरकत नाही. अत्यंत सोपी पाककृती असलेले रुचकर असे हे आंब्याचे धोणस कसे करायचे ते आता पाहूया.
आंब्याचे धोणस बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- हापूस किंवा कुठलेही आंबे: तीन
- तांदळाचा रवा: दोन वाट्या
- किसलेले ओले खोबरे: एक वाटी
- बारीक केलेला गूळ: दीड वाटी
- काजूचे तुकडे: अर्धी वाटी
- दूध: पाव ते अर्धी वाटी
- वेलची: अर्धा लहान चमचा
- साजूक तूप: दोन चमचे
- मीठ: चिमूटभर
आंब्याचे धोणस बनवण्याची कृती:
१. रवा साजूक तुपामध्ये हलकासा भाजून घ्यावा.
२. दोन आंब्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.
३. एका आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
४. एका भांड्यामध्ये भाजून थंड केलेला रवा, आंब्याची पेस्ट, गूळ, किसलेले ओले खोबरे, काजूचे तुकडे, चवीपुरते मीठ आणि आवश्यक तेवढे दूध घालून सर्व मिश्रण एकत्र करून अर्धा तास फुलू द्यावे. मिश्रण केकच्या मिश्रणाइतपत पातळ करावे.
५. अर्ध्यातासानंतर ह्या मिश्रणामध्ये आंब्याच्या फोडी आणि वेलची पूड घालावी. मिश्रण फुलून घट्ट झाले असल्यास आवश्यकतेनुसार आणखीन दूध घालावे.
६. आता ज्या भांड्यामध्ये धोणस करायचे असेल त्या भांड्याला आतून तूप लावून घ्यावे व वरील मिश्रण ह्या भांड्यामध्ये एकसारखे ओतावे.
७. ज्या मोदक पात्रात अथवा कुकर मध्ये धोणस वाफवायचे असेल त्यामध्ये पाणी घालून त्याला उकळी येऊ द्यावी.
८. पाणी उकळले की धोणसाचे भांडे मोदकपात्रामध्ये ठेवून झाकण लावून साधारण चाळीस मिनिटे मंद आंचेवर वाफवून घ्यावे.
९. चाळीस मिनिटानंतर धोणसामध्ये सूरी घालून ते शिजले आहे का पाहावे. सुरीला अजिबात पीठ चिकटले नाही तर धोणस झाले असे समजावे.
१०. मोदक पात्रातून धोणस बाहेर काढून पूर्ण निवू द्यावे.
११. थंड झाल्यानंतर बाजूच्या कडा सुरीने मोकळ्या करून एका प्लेट मध्ये धोणसाचे भांडे उपडी घालून धोणस अलगद बाहेर काढावे.
१२. थंड झालेल्या धोणसाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे काप करून तव्यावर साजूक तुपामध्ये भाजून गरमागरम खावे.
आंब्याच्या धोंडसाची पर्यायी कृती
काही लोक धोणस अधिक हलके व्हावे म्हणून त्यामध्ये बेकिंग पावडर अथवा बेकिंग सोडा घालतात. तुम्हाला जर धोणस केक प्रमाणे हलके हवे असेल तर अर्धा तास पीठ भिजल्यानंतर वेलची पूड व आंब्याच्या फोडी घालताना एक चमचा बेकिंग पावडर अथवा अर्धा चमचा सोडा तुम्ही ह्या पिठामध्ये घालू शकता.
अशा पद्धतीने केलेले धोणस पुन्हा तव्यावर भाजायची आवश्यकता नाही.