उन्हाळा सुरु होताच बाजारात आंबे, फणस, जांभळे आदी उन्हाळी मेवा यायला सुरु होतो. ह्या उन्हाळी फळांमध्ये आणखीन एक विशेष मेवा साऱ्यांना आकर्षित करत असतो तो म्हणजे ओले काजू. ओल्या काजूंपासून वेगवेगळे पदार्थ सुगरणी आपल्या पाककौशल्याने बनवत असतात. अशीच एक अत्यंत चटकदार मसालेदार गोमंतकीय पाककृती गोव्यातील गृहिणी ओल्या काजूंपासून बनवतात.  तिला बिया भाजी म्हणतात.

ओल्या काजूना गोव्यात बिया किंवा बिबे म्हटले जाते.

ओल्याकाजूंची चव मुळातच अप्रतिम असते. विविध मसाल्यांच्या वाटणामध्ये चविष्ट ओले काजू घालून केलेली बिया भाजी अतिशय स्वादिष्ट लागते. 

रुचकर अशी ही बिया भाजी कशी करायची ते  आता आपण पाहू.

Fresh cashew nuts
बिया भाजीसाठी लागणारे साहित्य:
  • ओले काजू: ७०-८०
  • किसलेले ओले खोबरे: २ वाट्या
  • कांदे: दोन
  • टोमॅटो: एक किंवा दोन
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: एक लहान वाटी
  • तेल: दोन ते तीन मोठे चमचे
  • हळद: १/४ चमचा
  • गरम मसाला: अर्धा चमचा
  • मीठ: चवीपुरते
मसाल्याचे साहित्य:
  • धणे: एक मोठा चमचा
  • मिरी: अर्धा छोटा चमचा
  • लवंग: दोन ते तीन
  • मसाला वेलची: एक
  • वेलची: दोन
  • दालचिनी: एक इंच
  • सुकी मिरची: ६-७ किंवा दोन चमचे तिखट पूड
Biya bhaji
बिया भाजीची कृती:

१. ओले काजू रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. म्हणजे सकाळी त्याची साले काढणे सोपे जाईल.

२. एका कढई मध्ये थोडे तेल गरम करावे. त्यामध्ये अख्खा मसाला भाजून घ्यावा.

३. भाजलेला मसाला बाजूला काढून त्याच तेलामध्ये सुकी मिरची भाजून घेऊन नंतर एक कांदा उभा चिरून बदामीसर भाजून घ्यावा.

४. कांदा भाजला की त्याच कढईत ओले खोबरे लालसर भाजून घ्यावे.

५. वरील सर्व भाजलेला मसाला एकत्र मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावा.

६. एका कढईमध्ये तेल तापू द्यावे. तेल तापले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा.

७. कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.

८. टोमॅटोही साधारण शिजला की त्यामध्ये हळद घालावी. साले काढलेले काजू घालावे व थोडे मीठ आणि काजू भिजतील इतके पाणी घालून कढईवर झाकण ठेवून मंद आंचेवर काजू शिजू द्यावे.

९. साधारण ७-८ मिनिटानंतर किंवा काजू शिजत आले की त्यामध्ये  मसाल्याचे वाटप आणि एक ते दिड वाटी पाणी घालून सगळे हलवून एकजीव करावे व पुन्हा झाकण लावून शिजू द्यावे.

१०. पाच ते दहा मिनिटे काजू चांगले मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्यावे. ग्रेव्ही जास्त घट्ट झाल्यास आवश्यक तितके पाणी घालावे.

११. काजू शिजले आणि मसाला छान एकजीव झाला की त्यामध्ये गरम मसाला आणि आवश्यक तितके मीठ (सुरुवातीला काजू शिजताना मीठ घातलेले आहे हे लक्षात ठेवून) घालावे.  

१२. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.

ही बियांची भाजी चपाती अथवा गोवन पावाबरोबर खावी. किंवा भाताबरोबर नुसतीच तोंडी लावणे म्हणून खावी.

अतिशय चटपटीत मसालेदार अशी ही अस्सल गोमंतकीय बियाभाजी तुम्हाला नक्की आवडेल.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!