आमली किंवा तोरा म्हणजे कैरी. गोवन स्वयंपाकघरात ह्या कैरीचा केवळ शाकाहारातच नाही तर माशांच्याही पदार्थात उपयोग केला जातो. ह्यातला अनेक जणांच्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उड्डमेथी. उडीद डाळ आणि मेथी घालून केलेली कैरीची उड्डमेथी अत्यंत चविष्ट लागतेच पण आंबाडे, बिंबला इतकेच नाही तर बांगड्याची उड्डमेथीही अप्रतिम चवीची असते. उड्डमेथी हा कालवण्यासाठी वापरला जाणारा आमटीचा प्रकार कसा करायचा ते आता पाहू.
उड्डमेथी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- कैरी: एक मध्यम आकाराची
- ओले खोबरे: दोन वाट्या (मध्यम आकाराच्या नारळाचे एक वळे)
- उडीद डाळ: एक चमचा
- मेथी: १/४ चमचा
- सुक्या मिरच्या: चार ते पाच (तिखट चवीनुसार कमी जास्त)
- धणे: एक चमचा
- मिरी: १/४ चमचा (साधारण १० ते बारा दाणे)
- हळद: १/४ चमचा
- गूळ :२ मोठे चमचे
- मीठ: चवीप्रमाणे
फोडणीचे साहित्य:
- तेल: एक मोठा चमचा
- मोहरी: एक चमचा
- हिंग: दोन चिमटी
- उडीद डाळ: १/२ चमचा
- मेथी: १/४चमचा
उड्डमेथी बनवण्याची कृती:
- थोड्या तेलामध्ये सुकी मिरची भाजून बाजूला काढावी. त्याच तेलात धणे आणि मिरीही भाजून घ्यावे.
- उडीद डाळ मंद आंचेवर कोरडीच बदामीसर भाजून घ्यावी. उडीद भाजत आली की त्यामध्ये मेथी टाकून गॅस बंद करावा.
- मिक्सरच्या भांड्यात हा सगळा भाजलेला मसाला बारीक करून घ्यावा.
- त्या मसाल्यामध्येच खिसलेले ओले खोबरे, हळद आणि आवश्यक तितके पाणी घालून सगळे बारीक वाटून घ्यावे.
- कैरी स्वच्छ धुवून तासून घ्यावी.
- कैरीचे उभे चार ते सहा तुकडे करावे.
- ज्या पातेल्यात उड्डमेथी करायची आहे. त्यामध्ये कैरीचे तुकडे, किंचित मीठ, तिखटपूड आणि कैऱ्या बुडतील इतके पाणी घालून गॅसवर मंद आंचेवर शिजावयास ठेवावे.
- कैरीचे तुकडे साधारण मऊ झाले की त्यामध्ये खोबरे आणि मसाल्याचे बारीक केलेले वाटण घालावे. साधारण दीड ते दोन वाट्या पाणी घालून त्याला एक उकळी येऊ द्यावी.
- उकळी आली की त्यात गूळ आणि मीठ घालून आणखी दोन ते तीन मिनिटे शिजू द्यावे आणि गॅस बंद करावा.
फोडणी:
- फोडणीच्या वाटीत तेल गरम करावे.
- तेल तापले की त्यात मोहरी घालावी.
- मोहरी तडतडली की हिंग, उडीद डाळ आणि मेथी टाकून गॅस बंद करावा.
तयार झालेल्या उड्डमेथीवर फोडणी घालावी.
ही उड्डमेथी गरम वाफाळलेल्या भाताबरोबर अप्रतिम लागते. चपाती अथवा पाव आवडणारे, उड्डमेथी चपाती किंवा पावासोबतही खाऊ शकतात.