पर्यटनापलीकडचा गोवा: ऐतिहासिक वारसा असलेले सप्तकोटेश्वर मंदिर
समृद्ध इतिहासाचा आणि मंदिरांचा वारसा लाभलेल्या गोव्यातील एक ऐतिहासिक मंदिर म्हणजे नार्वे येथील सप्तकोटेश्वर (सप्तकोटीश्वर) मंदिर!
सहसा लोक गोव्याला येतात ते केवळ समुद्र किनारे पाहण्यासाठी, रंगीबेरंगी पार्टी कल्चर अनुभवण्यासाठी आणि इथल्या ताजा समुद्री मत्स्यस्वाद मद्याच्या साथीने चाखण्यासाठी. अशा गोव्याच्या शोधात असलेल्या पर्यटकांना; इतिहास, परंपरा आणि अध्यात्माचा समृद्ध वारसा असेलला गोवा आजही अज्ञात आहे.
जे लोक जगविख्यात गोव्याच्या गजबजाटापासून वेगळा गोवा पाहू इच्छितात त्यांना हे निसर्गरम्य परिसरात वसलेले आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले सप्तकोटेश्वर मंदिर नक्कीच आवडेल.
सप्तकोटेश्वर मंदिर परिसर: मार्ग, रचना आणि निसर्ग सौंदर्य
उत्तर गोव्यामधील डिचोली तालुक्यातील एक छोटेसे गाव, नार्वे. शापोरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या निसर्ग सुंदर गावात, नारळाच्या झाडांच्या आणि हिरव्या निसर्गाच्या मध्ये रस्त्याच्या एका बाजूला काहीशा खोलगट भागात सप्तकोटेश्वर मंदिर अतिशय शोभून दिसते. मंदिरामध्ये जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
मंदिर परिसराच्या उजव्या बाजूला एक पायरीमार्ग आहे. पायऱ्या उतरण्यापूर्वी दिसणारा, मंदिर आणि परिसराचा नयनरम्य देखावा मन मोहवून टाकतो. मुख्य मंदिर, त्यासमोरील दीपस्तंभ, मंदिरासमोरील तळी आणि मंदिराच्या मागे तीनही बाजूला पसरलेला रम्य निसर्ग हे सारेच पाहत राहावे असे सुंदर आहे.
दुसरा मार्ग मंदिराच्या समोरून आहे. या पक्क्या रस्त्यावरून येताना उजव्या बाजूस मंदिराची तळी लागते. इथेच उजव्या बाजूला उंचावर कालभैरवाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात अकरा स्तरांचा, गोलाकार नागबंधांनी सुशोभित असा दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ चार स्तरांच्या अष्टकोनी चौथऱ्यावर उभा आहे. दीपस्तंभासमोर एक छोटासा खुला रंगमंच आहे. त्याच्या उजव्या बाजूस एक सुंदर तुलसीवृंदावन आहे. इथून समोरच दिसणारे, संपूर्ण लाल दगडी चिऱ्यांत बांधलेले मंदिर व त्यामागची हिरव्यागार झाडीची निसर्गसुंदर पार्श्वभूमी आपले लक्ष वेधून घेते.
मंदिर परिसरातच मंदिराच्या डाव्या बाजूला आर्या भवानी देवीचे छोटे मंदिर आहे.
शिवाजी महाराजांद्वारे मंदिराचा जीर्णोद्धार
कदंब राजाने बाराव्या शतकामध्ये ह्या मंदिराची उभारणी केली असे मानले जाते. पुढे मुस्लिम आणि पोर्तुगीज राजवटीत उध्वस्त झालेल्या ह्या मंदिराचा जीर्णोद्धार १६६८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केला.
मंदिराची स्थापत्यरचना
मंदिराची संरचना मुखमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी गोवन पारंपरिक पद्धतीची आहे. मंदिरावर उतरते कौलारू छप्पर आहे. मुखमंडपाचे प्रवेशद्वार कमानीच्या आकाराचे आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीमध्ये मोठ्या कमानाकार खिडक्या आहेत.
महामंडपाचे प्रवेशद्वार दगडी आणि कमानदार आहे. प्रवेशद्वाराच्या वर मंदिराच्या बांधणीसंबंधीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख असलेला ऐतिहासिक शिलालेख आहे. तो असा – श्रीसप्तकोटीश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराजाज्ञा देवालयस्य प्रारंभः’
या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस अतिशय आकर्षक चेहऱ्याचा आणि किंचित कललेल्या मानेचा शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा लक्ष वेधून घेतो..
महामंडपातील कावी कला आणि कलात्मक नक्षीकाम
इथून आत दोन पायऱ्या चढून महामंडपमध्ये प्रवेश होतो, जिथून गर्भगृहातील शिवलिंगाचे आपल्याला दर्शन होते. उंच आणि प्रशस्त महामंडपाची रचना गोव्यातील स्थापत्यशैलीप्रमाणे आहे. बाह्य भिंतीपासून काही अंतरावर आतमध्ये रुंद खांब आहेत, त्यांचा आधार घेत कमानीची रचना केलेली आहे.
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या भिंतींवर, स्तंभांवर, कमानींवर, कावी कला प्रकारातील नक्षीकाम पारंपरिक रंग वापरून जुन्या पारंपरिक पद्धतीने केलेले आहे.
सप्तकोटीश्वर मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंडी
मंदिराच्या छतावर मध्ये दिवे लावण्यासाठी काचेच्या हंड्या आहेत. अंतराळाची उंच दर्शनी भिंतही कावी नक्षीकामाने सुशोभित आहे. ह्या भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौकोनी देवकोष्टकांमध्ये गणेश, हनुमान यांच्या दगडी मुर्त्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला मोठ्या लाकडी देव्हाऱ्यात सप्तकोटीश्वराची प्रतिमा आहे. प्रवेशद्वाराच्या समोर नंदीची पाषाणमूर्ती आहे.
गर्भगृहात भूतलावर असलेली सप्तकोटेश्वराची पिंडी अन्य मंदिरातील शिवपिंडीपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. सामान्यपणे पिंडीला ब्रह्मभाग, विष्णुभाग आणि शिवभाग असे तीन भाग असतात व यातील ब्रह्मभाग व विष्णुभाग जमिनीच्या आतमध्ये असतात. परंतु येथील शिवपिंडीचे हे दोनही भाग जमिनीच्या वरच्या पातळीवर आहेत.
गोमंतकीय स्थापत्यशैलप्रमाणे उंच असे शिखर मंदिराला आहे.
सप्तकोटेश्वराचे दुर्मिळ गुहामंदिर स्वरूपातील गर्भगृह
इथे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आहे ते येथील गर्भगृह! एका मोठ्या शिलाखंडामध्ये गुहा स्वरूपामध्ये ते कोरलेले आहे. त्याच्या वरच्या भागात ह्या शिळेमध्येच कोरलेलेच एक दालन आहे व त्या दालनात जाण्यासाठी पायऱ्याही कोरलेल्या आहेत. प्रदक्षिणा घालताना गर्भगृहाच्या मागच्या बाजूला आपल्याला या पायऱ्या दिसतात.
मंदिराच्या अलीकडील जीर्णोद्धारादरम्यान, गर्भगृहाच्या मागील भिंतीच्या बाहेरील बाजूस काचेची भिंत बसवण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराला भेट देण्यासाठी आलेल्या भक्तांना, इतिहासप्रेमींना आणि पर्यटकांना; या अद्वितीय शिलाखंडात कोरलेल्या रचनेचे दर्शन घेता येते आणि तिचे वैशिष्ट्य अनुभवता येते.
सप्तकोटीश्वर नावामागील पौराणिक आख्यायिका
सप्तकोटीश्वर दैवताला हे नाव कसे मिळाले त्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. सप्त आणि कोटी अशा दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला हा शब्द. हे दोन शब्द ह्या नावामध्ये कसे आले ते ही आख्यायिकेतून आपल्याला कळते.
समुद्र आणि पंचगंगा नदीच्या संगमावर सप्त ऋषींनी सात कोटी वर्षे भगवान शंकरांची उपासना केली. तपामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व सप्त ऋषींसमोर प्रकट होऊन हवा तो वर मागण्यास सांगितले. तेंव्हा सप्तर्षींनी — आम्ही जिथे तपश्चर्या केली तिथे आपण सात कोटी वर्षे निवास करावा– असा वर शंकराकडे मागितला. शंकराने तो मान्य केला म्हणून भगवान शंकरास सप्तकोटीश्वर असे नाव पडले.
ह्या सात ऋषींचा नाथ म्हणून त्यास सप्तनाथ असेही म्हटले जाते.
सप्तकोटेश्वराचे मूळ स्थान: दिवाड बेट
सप्तकोटेश्वराचे मूळ स्थान हे गोव्यातील दिवाड बेटावरील नार्वे इथे होते. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात या बेटाचा दीपवती असा उल्ल्लेख केलेला आहे. तिसवाडीच्या उत्तरेस मांडवी नदीमध्ये हे छोटे बेट आहे. कदंबकुळाचे कुलदैवत असलेल्या सप्तकोटेश्वरावर कदंब राजघराण्याची गाढ श्रद्धा होती.
शिवलिंगाचे रक्षण आणि नव्या नार्वेची स्थापना
आदिलशाहीतील एक सरदार नारायणराव सूर्यराव देसाई यांना मंदिराच्या विटंबनेची बातमी समजली तेव्हा त्यांनी आपले सैनिक एका रात्री बेटावर पाठवले. त्या सैनिकांनी तेथील शिवलिंग गुपचूप आणले. हिंदळे गावातील घनदाट जंगलात एका दरीमधील खडकात गाभारा कोरून तिथे शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. पुढे या गावाला नवे नार्वे असं म्हणण्यात येऊ लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्यातील अभियान आणि मंदिर पुनरुज्जीवन
पोर्तुगीजांच्या राजवटीत गोव्यात धार्मिक अत्याचार होऊ लागले तेव्हा पोर्तुगीजांवर जरब बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६७ मध्ये पोर्तुगीजांवर हल्ला केला. तीन दिवस महाराजांच्या फौजेने पोर्तुगिजांचा बार्देश प्रांत घुसळून काढला व सुमारे ३०० कैद्यांसह व १५० लक्ष होन एवढी संपत्ती घेऊन महाराज डिचोली येथे आले. दरम्यान महाराज नार्वे या गावी गेले आणि त्यांनी सप्तकोटेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा केली.
सप्तकोटेश्वर मंदिरातील प्रमुख सण व उत्सव
मंदिरामध्ये संपूर्ण वर्षभर विविध सण व उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. त्यातील सर्वांत महत्त्वाचे उत्सव म्हणजे महाशिवरात्र व गोकुळाष्टमी. एका पौराणिक आख्यायिकेनुसार, भगवान शंकरांनी सप्तऋषींना ज्या दिवशी दर्शन दिले, तो दिवस गोकुळाष्टमीचा होता. म्हणून गोकुळाष्टमी इथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरात्रीच्या दिवशीही हजारो भाविक सप्तकोटेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेतात.
त्याशिवाय या मंदिरात कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराप्रमाणेच किरणोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी २१ जूनला सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे सप्तकोटीश्वराच्या पिंडीस उजळून टाकतात. हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी असंख्य भक्त यावेळी उपस्थित असतात.
सप्तकोटेश्वर मंदिर कसे गाठावे
पणजीपासून सप्तकोटेश्वर मंदिराचे अंतरअंदाजे २२ ते २५ कि. मी. व डिचोलीपासून ८ कि. मी. इतके आहे. डिचोली बसस्थानकावरून इथे जाण्यासाठी कदंब परिवहनाच्या बसेस उपलब्ध आहेत. खासगी वाहने मंदिराच्या पार्किंग क्षेत्रापर्यंत जाऊ शकतात.
सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि सांस्कृतिक पुनरुत्थान
गोव्यातील ह्या अतिशय सुंदर अशा सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार गोवा राज्य पुरातत्व संचालनालयातर्फे अलीकडेच करण्यात आलेला आहे. २०१९ ला सुरु झालेला हा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण झाला.
हा जीर्णोद्धार अत्यंत सखोल आणि शास्त्रीय पद्धतीने करण्यात आला असून, मंदिराची मूळ रचना जपताना त्याचा ऐतिहासिक आत्माही अबाधित ठेवण्यात आला. कावी कलेचे पुनरुज्जीवन तसेच पारंपरिक चुन्याच्या लेपाचा वापर करून अस्सलपणा टिकवण्यावर भर देण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कदंबकालीन गुहामंदिराचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करणे आणि त्याच्या समृद्ध वारसामूल्याला अधोरेखित करणे हा होता.
नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये या भव्य मंदिराचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. गोव्याच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे हे ऐतिहासिक महत्त्वाचे मंदिर आजही शिवभक्त, पर्यटक आणि असंख्य इतिहासप्रेमींना आकर्षित करत आहे.