गोवा आणि कोकण किनारपट्टीतील प्रदेशात आंबाडे म्हणून ओळखले जाणारे आंबट फळ मिळते. गोवन स्वयंपाकामध्ये ह्या आंबाड्याचे विविध पदार्थ बनवले जातात. गोव्यातील काही घरांच्या अंगणात किंवा परसदारी आंबाड्याचे झाड तुम्हाला दिसू शकते. साधारण श्रावण महिन्यात यायला सुरु होणारे हे फळ दिवाळी पर्यंत मिळते. श्रावणामध्ये कोवळे असणारे, हिरवट पोपटी रंगाचे आंबाडे दिवाळीपर्यंत गडद काळपट हिरव्या रंगाचे होतात. अशा ह्या जून झालेल्या आणि आतमध्ये घट्ट काथा म्हणजेच बी तयार झालेल्या आंबाड्याची करम विशेषतः दिवाळीला बनवली जाते. दिवाळीला बनवल्या जाणाऱ्या दुधातले फोव, बटाट फोव, रोसातले फोव अशा विविध पक्वान्नांबरोबरच आंबाड्याची करमही आवडीने खाल्ली जाते.
ह्या आंबाड्याची उड्डमेथी, रोस असे वेगवेगळे पदार्थ तर बनवले जातातच पण सुंगटाचे हुमण म्हणजे प्रॉन्स करीला अधिक रुचकर बनवण्यासाठी हे आंबाडे विशेष करून वापरले जातात.
आता दिवाळीला बनवल्या जाणाऱ्या आंबाड्याची करम कशी करायची ते पाहूया.
आंबाड्याची करम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- आंबाडे: ७-८
- खवलेले ओले खोबरे: दोन मोठ्या वाट्या
- किसलेला किंवा बारीक तुकडे केलेला गूळ: एक वाटी (आंबाड्याच्या आंबटपणानुसारआणि आवडीनुसार कमी जास्त)
- सुकी मिरची: ४-५ (मिरचीच्या तिखटपणानुसार कमी जास्त)
- धणे: एक मोठा चमचा
- मिरीचे दाणे: एक छोटा चमचा
- हळदपूड: अर्धा छोटा चमचा
- मीठ: चवीनुसार
फोडणीचे साहित्य
- तेल (खोबरेल असेल तर अधिक उत्तम): एक मोठा चमचा
- मोहरी: एक चमचा
- हिंग: दोन चिमटी
- कढीपत्त्याची पाने: १०-१२
- मेथीचे दाणे: अर्धा छोटा चमचा
कृती
प्राथमिक तयारी
१. आंबाडे धुवून त्यांची वरची साले तासून काढावी.
२. तासलेल्या आंबाड्याचे सुरीने पातळ तुकडे काढून घ्यावे.
३. आत राहिलेला काथा(बी) चांगला ठेचून घ्यावा.
४. खवलेला नारळ, सुकी मिरची, धणे, मिरी, हळदपूड; आवश्यक तितके पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे.

शिजवण्याची प्रक्रिया
१. गॅसवर पॅन ठेवावे. त्यामध्ये आंबाड्याचे तुकडे, ठेचलेला काथा घालावा. काथा ठेचताना सुटलेले पाणीही त्याबरोबर घालावे. थोडेसे पाणी घालून हे सर्व मंद आंचेवर थोडे शिजू द्यावे.
२. साधारण शिजलेल्या आंबाड्यामध्ये ओल्या नारळाचे वाटण घालून आणखी पाच मिनिटे शूज द्यावे.
३. पाच मिनिटानंतर ह्या वाटणामध्ये बारीक केलेला गूळ घालावा व गूळ विरघळेपर्यंत शिजू द्यावे.
४. सगळे छान शिजून आले की त्यामध्ये मीठ घालून गॅस बारीक करावा.
फोडणी
५. दुसऱ्या शेगडीवर फोडणीची वाटी गरम करून त्यामध्ये तेल घालावे.
६. तेल तापले की त्यामध्ये मोहरीचे दाणे घालावे.
७. मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पाने घालावी. चमच्याने सारखी हलवून घ्यावी.
८. शेवटी मेथीचे दाणे आणि हिंग घालून गॅस बंद करावा.
अंतिम टप्पा
९. तयार झालेली फोडणी, शिजत असलेल्या आंबाड्याच्या करममध्ये घालून गॅस बंद करावा.
१०. वरती झाकण ठेवून थोडा वेळ तसेच ठेवावे. म्हणजे आंबाड्याची करम छान मुरून येईल.
दिवाळीच्या विशेष पक्वान्नांपैकी एक, आंबट गोड चवीची ही आंबाड्याची करम; दिवाळीला बनवल्या जाणाऱ्या इतर पदार्थांबरोबर यथेच्छ चाखावी.
तळटीप: तुम्ही जर सुक्या मिरचीचा वापर करू इच्छित नसाल तर त्याऐवजी तुमच्या आवडीनुसार एक ते दीड चमचा लाल तिखटाची पूड वापरू शकता.