“अनसाचे सासव” अर्थात अननसाचा आंबट गोड गोवन पदार्थ! सासव हा एक पारंपरिक गोमंतकीय पदार्थ आहे. ह्या पदार्थामधील एक टाळता न येणारा घटक म्हणजे मोहरी, ज्याला कोकणी भाषेत सासवा म्हणतात. घोटा अर्थात रायवळ आंबे घालून केलेले घोटाचे सासव हे जास्तीजास्त लोकांचे अधिक आवडते असले; तरी अननस वर्षभर मिळत असल्याने आंब्याचा मोसम नसताना सासव खायची हुक्की आली की अशावेळी अननस आपल्या नक्की मदतीला धावून येते. अननसाच्या स्वादाने परिपूर्ण असे हे आंबट गोड अननसाचे सासव तुम्हालाही नक्की आवडेल.

साहित्य
  • अननसाचे तुकडे: एक मोठी वाटी
  • ओल्या नारळाचा किस: एक मोठी वाटी
  • गूळ: एक मोठा चमचा (अननसाच्या गोडव्यानुसार कमी जास्त)
  • मोहरीचे दाणे: एक चमचा
  • सुक्या मिरच्या: ५ ते ६
  • मिरीचे दाणे: ७-८
  • चिंच: एक छोट्या लिंबाएवढा (अननस पुरेसे आंबट असल्यास चिंच टाळावी.)
  • हळद: अर्धा छोटा चमचा
  • मीठ: चवीनुसार
अनसाचे सासव
फोडणीसाठी साहित्य

  • गावठी खोबरेल: दोन चमचे
  • मोहरी:एक चमचा
  • हिंग: दोन चुटकी
  • कडीपत्ता: १० ते १२ पाने
  • मेथीदाणे: १/४ चमचा
कृती
  1. ओल्या नारळाचा किस, सुक्या मिरच्या, मोहरीचे दाणे, मिरी, हळद आणि चिंच या सर्वांची मिक्सरमध्ये एकत्रित पेस्ट करावी.
  1. एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तेल घालावे.
  1. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालावी.
  1. मोहरी तडतडली की त्यात हिंग, कडीपत्त्याची पाने आणि मेथीचे दाणे घालावेत.
  1. आता या फोडणीमध्ये अननसाचे तुकडे घालावेत. हे तुकडे २-३ मिनिटे चांगले परतून घ्यावेत व किंचित पाणी घालून ते मऊसर होऊ द्यावेत. 
  1. नंतर यामध्ये खोबऱ्याचे वाटण आणि आवश्यक तितके पाणी घालावे.
  1. हे सगळे मिश्रण हलवून व्यवस्थित एकत्रित करावे. त्यावर झाकण ठेवून अननसाचे तुकडे मऊ होईपर्यंत ५ ते १० मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे.
  1. अननसाचे तुकडे शिजत आले की त्यामध्ये गूळ, मीठ घालून आणि काही मिनिटे शिजू द्यावे आणि गॅस बंद करावा.

अननसाच्या चवीने युक्त असे हे आंबट गोड स्वादिष्ट अनसाचे सासव गरमागरम चपातीबरोबर वाढावे.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!