बार्देश तालुक्यातील सुंदर किल्ला, रेईश मागुश!
पणजी बस स्टॅन्ड पासून साधारण ७-८ कि.मी.वर असणारा हा किल्ला विशेष मोठा नाही परंतु त्याची आकर्षक रचना अतिशय लोभसवाणी आहे. किल्ल्यावरून दिसणारे मांडवी नदीचे व सभोवतालचे सृष्टी सौंदर्यही डोळ्यात भरून घेण्यासारखे आहे. किल्ला खूप उंच नाही त्यामुळे वर चढून जाण्यासाठी भरपूर पायऱ्या नसल्या तरी संपूर्ण किल्ला फिरून पाहण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांवरून चढ उतार करताना भरपूर पायपीट करावी लागते. त्यामुळे हा छोटासा किल्ला पाहतानाही तशी बऱ्यापैकी दमछाक होते.
पोर्तुगीज शासन असताना पोर्तुगीजांनी शत्रूंच्या आक्रमणाला विरोध करण्यासाठी उभा केलेला रेईश मागुश हा पहिला किल्ला आहे. नावाजलेल्या आणि तुलनेने मोठ्या असलेल्या आग्वाद किल्ल्याच्या आधी उभा असलेला हा किल्ला मांडवी नदीच्या निमुळत्या टोकापाशी वसलेला आहे. पोर्तुगीज वसाहतवाद्यांचा रेईश मागुश किल्ला जवळ जवळ अभेद्य असल्यामुळे त्यांच्यासाठी तो अतिशय महत्वाचा होता.
अलीकडेच काही वर्षांपूर्वी किल्ल्याची अत्यंत कुशलतेने दुरुस्ती केल्याने त्याचे पूर्वीचे वैभव पुन्हा अंशतः प्राप्त झालेले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपूर्वी अत्यंत दुर्दैवी अवस्थेत पाहिलेल्या ह्या किल्ल्याचे सद्य स्वरूप खूप सुखावून गेले. विशिष्ट अशा लाल रंगाच्या दगडाने उभारण्यात आलेला किल्ला आपल्या ह्या आकर्षक लाल रंगामुळे मांडवी नदीच्या किनारी वसलेल्या राजधानी पणजीहून सहजपणे दिसतो.
किल्ल्याचा इतिहास
सध्या टेकडीवर उभा असलेला जो किल्ला आपण पाहतो ती मूळ वास्तू नाही. सद्य वास्तूच्या पूर्वी अनेकदा हा किल्ला बांधण्यात आला होता. इ. स. १४९३ मध्ये विजापूरच्या आदिलशाही सल्तनतने पहिल्यांदा इथे लष्करी चौकी बांधली. पुढे आदिलशहा पोर्तुगीजांकडून पराभूत झाला. पोर्तुगीजांची तत्कालीन राजधानी गोवा वेल्हाच्या संरक्षणासाठी म्हणून इ.स. १५५१ मध्ये प्रथम किल्ल्याची उभारणी केली. इ.स. १७०७ मध्ये पुनर्बांधणी करण्यापूर्वी ह्या किल्ल्याचा अनेकदा विस्तार करण्यात आला.
सुरुवातीला ह्या किल्ल्याचा उपयोग व्हॉइसरॉयचे निवासस्थान म्हणून तसेच पोर्तुगालहून येणाऱ्या किंवा परत जाणाऱ्या मान्यवरांच्या निवासासाठी केला जात असे. पुढे शेजारी राज्यातून होणाऱ्या आक्रमणाच्या धोक्यामुळे हा किल्ला लष्करी किल्ला बनला. १७३९ मध्ये बार्देश तालुक्याचा बराचसा भाग शत्रूने ताब्यात घेतला तेव्हा त्यांना परतवून लावण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर होऊ लागला. किल्ला अतिशय मोक्याच्या जागी होता, शिवाय त्याची बांधणीसुद्धा अशी होती की आक्रमणकर्ते तो पाडू शकले नाहीत. इ.स. १९०० च्या सुरुवातीला नौदल हल्ल्याचा धोका कमी झाला आणि गोव्याची राजधानी वेल्हा गोव्याहून पणजीला हलवली गेली. त्यानंतर हा किल्ला तटबंदी म्हणून वापरला गेला नाही.
किल्ल्याचे स्थापत्य
ह्या किल्ल्याची संपूर्ण बांधणी अत्यंत टिकाऊ अशा सहज उपलब्ध असणाऱ्या लाल रंगाच्या लॅटेराइट खडकापासून केलेली आहे. किल्ल्याच्या बाहेरील भिंती मजबूत आणि उतरत्या आहेत. भिंतीच्या बाजूनी, मोक्याच्या अशा ठिकाणी पोर्तुगीज वास्तुकलेचे नमुनेदार दंडगोलाकार टेहळणी बुरुज आहेत. किल्ल्यामध्ये ताज्या पाण्याचा झरा आहे. विविध आकाराच्या ३३ तोफांनी हा किल्ला आक्रमकांना सामोरे जाण्यासाठी सुसज्ज होता. पूर्णपणे सशस्त्र छावणी मावेल एवढी जागा किल्ल्यामध्ये आहे. शिवाय भुयारी मार्ग व खोल्याही आहेत.
किल्ल्याला भेट देण्याची वेळ
मंगळवार ते रविवार सकाळी ९:३० ते ५:३०
किल्ल्याचे स्थान
वेरे, बार्देश तालुका, उत्तर गोवा
वर्तमान स्थिती
सुरक्षित तटबंदी म्हणून मोक्याच्या जागी असलेला हा किल्ला १९०० च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरक्षेसाठी म्ह्णून वापरला गेला नाही. त्याचे तुरुंगात रूपांतर केले गेले. इ.स. १९९३ पर्यंत तो तुरंग म्हणून वापरला गेला. परंतु जवळ जवळ अडीच शतके मान्सूनचे वारे, पावसाचा तडाखा, आणि शत्रू पक्षाचे आक्रमण इ. मुळे झालेल्या नुकसानाने किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्याची गरज भासू लागली.
बरीच वर्षे भग्नावस्थेत पडून राहिल्यानंतर इ.स. २००८ मध्ये किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम INTACH (ऐतिहासिक वास्तूंच्या जीर्णोद्धाराशी संबंधित एनजीओ)आणि गोवा सरकारने सुरू केले. जीर्णोद्धाराचे काम प्रसिद्ध वास्तुविशारद जेरार्ड डिकुन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. जून 2012 मध्ये हा किल्ला लोकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला.
आता हा किल्ला एक सांस्कृतिक केंद्र आणि पर्यटन स्थळ म्हणून उभा आहे. किल्ल्यामध्ये गोव्यातील प्रसिद्ध चित्रकार मारिओ मिरांडा यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला मिळते. तसेच गोवा मुक्ती लढ्याची आणि स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आणि चित्रेही पाहायला मिळतात.
अतिशय नियोजनबद्ध असा कौशल्याने उभा केलेला हा किल्ला पहावा असा आहे. बाजूलाच असलेले रेईश मागुश चर्च हेही पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाने नटलेले ग्रामीण गोवन सौंदर्य आणि आकर्षक मांडवी नदी यांची मनमोहक दृश्ये पर्यटकांना छायाचित्रे घेण्यास भुरळ पाडतात आणि आपल्या गोव्यात घालवलेल्या सुट्टीचे सदैव स्मरण करून देत राहतात.