आकूर ही गोव्यामध्ये पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे. तांबूस हिरव्या रंगाची ही भाजी कोवळ्या अंकुर स्वरूपातच बाजारात येते. पावसाळ्यात नदी काठी आकूर ह्या भाजीचे कोंब उगवतात. चणा डाळ, हिरवे वाटाणे, मसूर अशा वेगवेगळ्या कडधान्यांबरोबर आकूरची अत्यंत चविष्ट अशी पातळ भाजी केली जाते.

फक्त खोबऱ्याचे वाटण घालून केलेली ह्या आकूरची भाजी सुद्धा अत्यंत चविष्ट लागते.

खोबऱ्याच्या वाटणाबरोबर केलेली ही भाजी कशी करायची ते आता पाहू.

साहित्य :
  • दोन पेंड्या आकूरची भाजी
  • २ वाट्या किसलेले ओले खोबरे
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • १ मध्यम आकाराचा टोमॅटो
  • ४-५ सुक्या मिरच्या
  • एक मोठा चमचा धणे
  • एक छोटा चमचा मिरी
  • १/४ चमचा हळद
  • एक छोटासा चिंचेचा गोळा
  • एक छोटा गुळाचा तुकडा
  • फणसाच्या उकडलेल्या आठळ्या (ऑप्शनल)
  • चवीपुरते मीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

आकूर
फोडणीचे साहित्य :
  • एक मोठा चमचा गावठी खोबरेल अथवा कुठलेही तेल
  • एक चमचा मोहरी
  • २ चिमटी हिंग
  • ८-१० कढीपत्त्याची पाने
कृती:
  • आकूर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे.
  • कांदा व टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यावा.
  • किसलेले खोबरे; धणे, मिरी, सुक्या मिरच्या आणि चिंच व हळद घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
  • एका पातेल्यामध्ये थोडे तेल घालून तेल गरम होताच त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा.
  • कांदा बदामीसर परतून घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो ही थोडा परतून घ्यावा.
  • आता ह्यामध्ये बारीक चिरलेला आकूर घालून, थोडे पाणी घालावे. पातेले झाकून ठेवून आकूर मध्यम आंचेवर थोडे शिजू द्यावे.
  • आकूर बऱ्यापैकी शिजले की त्यामध्ये खोबऱ्याचे वाटण व उकडलेल्या फणसाच्या आठळ्या, गूळ आणि मीठ घालून आणखीन पाच दहा मिनिटे शिजू द्यावे.
  • फोडणीच्या वाटीमध्ये एक चमचा तेल घालावे.
  • तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकावी.
  • मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग व कढीपत्ता घालून ही गरम फोडणी तयार झालेल्या आकूरच्या भाजीवर घालावी.
  • वरून चिरलेली कोथिंबीर पेरून गरम गरम भाजी चपातीबरोबर सर्व्ह करावी.

पारंपारिक चवींनी समृद्ध असलेली ही डिश गोव्याच्या अद्वितीय पाककृती वारशाचे प्रतिनिधित्व करते, विशेषतः पावसाळ्यात!

कॅटेगरी Goan Food