नवरात्र हा उत्सव भारताच्या विविध भागात विविध तऱ्हेने साजरा केला जातो. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूजा, गुजराथमध्ये गरबा हे तर प्रसिद्ध आहेच. पण गोव्यामध्ये नवरात्र कशी साजरी करतात आपल्याला माहित आहे का? गोव्यामधली नवरात्र ही अद्वितीय अशा मखरोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मखरोत्सव हा गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये आणि विशेष करून फोंड्यातील सर्व मंदिरामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस साजरा केला जातो.
मखर म्हणजे लाकडाचा चौकटीच्या आकाराचा झोपाळा. हे मखर छताच्या एका लोखंडी कड्यामध्ये साखळीने लटकवलेले असते. सुंदर रंगीत कागदांनी आणि फुलांनी मखर सजवले जाते. नऊ दिवस वेगवेगळ्या सुंदर अलंकारांनी सजवलेली देवी ह्या मखरामध्ये बसवली जाते. मखरामध्ये देवी प्रत्येक दिवशी; हत्ती, घोडा, वाघ, गरुड अशा वेगवेगळ्या वाहनांवर विराजमान झालेली असते.. अशी वाहनावर किंवा आसनावर स्वार होऊन मखरात बसलेल्या देवीची मग; ढोल, ताशे, शेमेळ, सनई अशा वाद्यांच्या गजरात झुलवत आरती केली जाते.
मंद प्रकाश, मखरातील दिव्य प्रकाशातली तेजस्वी देवीमाता, वाद्यांचा जयघोष हे सर्व अनुभवताना रोमांचित व्हायला होते. हा सगळा सोहळा इतका अभूतपूर्व असतो की मखरामध्ये बसून प्रत्यक्ष देवीच आपल्या समोर झोके घेण्याचा आनंद घेत आहे असा भास काही क्षण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही.
मखरोत्सवाची सुरुवात कशी काय झाली याबद्दल असं सांगतात की, पोर्तुगीज राजवटीत सालसेत, तिसवाडी, बार्देश तालुक्यातील देवदेवतांचे स्थलांतर फोंडा तालुक्यामध्ये करण्यात आले. हा मखरोत्सव त्या स्थलांतराचे प्रतिनिधित्व करतो.
केवळ देवीच्याच नाही तर मंगेश, रामनाथ अशा देवांच्या मंदिरामध्येही मखरोत्सव साजरा केला जातो. काही देवळामध्ये घटस्थापनेपासून नवमी पर्यंत नऊ दिवस मखर असते. तर काही देवळांमध्ये पाच दिवस अथवा पाचव्या दिवसापासून मखरोत्सव साजरा केला जातो. ह्या मखरोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक देवळाचे मखर झुलवण्याची वेगवेगळी पद्धत!
महालसा नारायणी म्हार्दोळ येथील मंदिरामध्ये नऊ दिवस मखरोत्सव साजरा केला जातो. षष्टी दिवशी असणारी त्रिमूर्ती आणि नवमी दिवशी असणारी पंचमूर्ती हे येथील मखराचे विशेष आकर्षण! सुरुवातीला मंदगतीने झुलणारे मखर थोडा वेग घेते तसे सोबतच्या वाद्यांचा गजरही द्रुत होतो. त्यावेळी जी भक्तिमय वातावरण निर्मिती होते ती वर्णनातीत आहे.
मंगेशी येथील मखर पाहणे ह्यासारखा अद्भुत अनुभव नाही. सुरुवातीला अतिशय सावकाश झुलत मखर उजव्या किंवा डाव्या बाजूला वळले की दोन्ही बाजूला असे वेगाने झुलवले जाते की ते पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. अशा पद्धतीने मखर झुलवणाऱ्या पुरोहितांची एकाग्रता, कौशल्य आणि ताकद ह्याला खरोखरच तोड नाही.
देवकी कृष्ण मंदिरामध्ये माता देवकी बाळ कृष्णाला मांडीवर घेऊन मखरामध्ये विराजमान असते.
असे प्रत्येक मंदिरातील मखर आकाराने वेगळे, सजवण्याची पद्धत प्रत्येकाची वैविध्यपूर्ण, आणि मखर झुलवण्याची पद्धतही प्रत्येक मंदिराची स्वतःची वेगळी.
महालसा मंदिराच्या मखराबरोबर असणारा वाद्यांचा गजर हा सर्व वातावरण संमोहित करून टाकतो. तर मंगेशी मंदिरात मखर झुलवून झाल्यानंतर सर्व लहान थोर पुरोहित मिळून उच्चरवाने मंत्रपठण करतात ते कुठल्याही अध्यात्मिक व्यक्तीला परमोच्च आनंदाची अनुभूती देते.
असाच आनंददायी अनुभव आपल्याला इतरही विविध मंदिरांमध्ये अनुभवता येतो. फक्त केरीच्या विजयादुर्गा मंदिरामध्ये मार्गशीर्ष महिन्यात मखरोत्सव साजरा केला जातो.
हा आहे खराखुरा गोवा आणि ह्या आहेत गोव्याच्या मूळ परंपरा. ही गोव्याची समृद्ध परंपरा पाहण्यासाठी एकवेळ गोव्याला जरूर भेट द्या.