म्हापसेकरांचा राखणदार
समस्त म्हापसेकरांचा राखणदार आणि अनेक गोवेकरांचे श्रद्धास्थान, देव बोडगेश्वर!
पणजी पासून साधारण १२ कि. मी वर म्हापशाच्या प्रवेशापाशीच असलेल्या बोडगिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर बोडगेश्वराचे मंदिर आहे. पुर्वी ही जागा पाणथळ दलदलीची अशी होती. त्यामुळे इथे केवड्याची भरपूर झाडे होती. लोकल भाषेत केवड्याला बोडगी असे म्हणतात त्यामुळे हा भाग बोडगिणी म्हणून ओळखला जातो. राखणदार देवही म्हणूनच बोडगेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला.
नयनरम्य परिसराने नटलेले हे मंदिर बोडगेश्वराच्या भक्तांबरोबरच इतरेजनांनाही आकर्षित करते.
बोडगेश्वराला आंगवणी म्हणजे नवसाला पावणारा असे मानले जाते. नवसाला तो पावतो ही त्याच्याबद्दल श्रद्धा आहेच परंतु समस्त म्हापसेकर त्याला आपला राखणदार मानतात. बोडगेश्वर हा सदैव म्हापशाची आणि म्हापसेकरांची राखण करतो असा त्यांचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे सर्व म्हापसेकर बोडगेश्वराची मनापासून भक्ती करतात. बोडगेश्वराबद्दल काही लोक असे सांगतात की तो काळोख्या रात्री हातामध्ये मशाल घेऊन मंदिराच्या सभोवतालच्या शेतात फिरताना दिसतो.
आकर्षक मंदिर
मोकळे मैदान आणि आजूबाजूची शेती अशा सुंदर परिसरात बोडगेश्वराचे मंदिर उभे आहे. राखणदार,आजोबा ह्या ज्या रक्षक देवता असतात त्यांची मंदिरे आपल्याला तीन अथवा चारी बाजूनी उघडी पाहायला मिळतात. भिंती आणि दरवाज्यांनी ती बंदिस्त केलेली नसतात. बोडगेश्वराचे मंदिरही असेच तीन बाजूनी उघडे आहे. मंदिरामधील खांबांवरती देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत. ह्या खांबांच्या वरील भिंतींवर पुराणातील विविध दृश्ये कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरासमोरील पायऱ्या चढून जाताच दोन खांब दिसतात, ज्यांच्यावर अष्टविनायकांच्या मुर्त्या आहेत आणि वरील भिंतीवर सुबक अशी गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. ह्या भिंतीखाली पाच मोठ्या पितळी घंटा आहेत.
देव बोडगेश्वर
मंदिराच्या पायऱ्या चढून वर जात असतानाच आपले सारे लक्ष समोरच्या देव बोडगेश्वराच्या मूर्तीकडे आकर्षले जाते. आणि सगळ्यात आकर्षित करतात ते देव बोडगेश्वराचे डोळे! अतिशय प्रसन्न असे ते डोळे आपल्याला आश्वस्त करत असतात, ‘मी आहे तू कसलीच चिंता करू नको’.
डोक्यावरील आकर्षक फेटा. उजव्या हातात दण्ड आणि डाव्या हातात मशाल, खांद्यावर घोंगडे, पायात वहाणा अशी ही विलोभनीय उभी मूर्ती कितीतरी वेळ आपल्याला खिळवून ठेवते.
बोडगेश्वराच्या मूर्तीच्या बरोबर वर हातामध्ये ढाल तलवार घेतलेल्या म्हापशाच्या शांतादुर्गेची सुंदर मूर्ती आहे.
मंदिरातील वृक्ष आणि चित्तवेधक सत्यनारायण
बोडगेश्वराच्या मूर्तीच्या पाठीमागे , मोठा वृक्ष आहे. ह्या वृक्षाच्या चहुबाजूने सुरक्षितरित्या भिंती बांधावलेल्या आहेत. प्रदक्षिणेच्या वाटेवर मागच्या बाजूने मात्र ह्या पवित्र वृक्षाचे दर्शन घेता येते. ह्या वृक्षाच्या समोरच काही अंतरावर असलेल्या चतुर्भुज सत्यनारायणाच्या अप्रतिम रेखीव सुंदर मुर्त्या हे ह्या देवळाचे आणखीन एक विशेष आकर्षण! मध्यभागी थोडी मोठी मुख्य मूर्ती आणि ह्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन, दोन अशा एकूण चार तुलनेने लहान मूर्त्या. बोलके डोळे प्रसन्न चेहरा असलेल्या ह्या मूर्त्या न्याहाळाव्या तितके थोडेच. बाजूच्या चार मूर्त्या ह्या भक्तांना सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी आहेत.
नयनरम्य परिसरात शोभते सुंदर मंदिर
बाहेरून होणारे ह्या मंदिराचे दर्शन अत्यंत मनोहर आहे. मंदिराचा कळस आपल्याला पेटत्या मशालीच्या स्वरूपात पाहायला मिळतो. मंदिराच्या एका बाजूला वड आणि दुसऱ्या बाजूला आणखी एका पवित्र वृक्षाचे असे दोन पार आहेत. मंदिरातून बाहेर येणारा मुख्य वृक्ष आणि दोन्ही बाजूचे दोन वृक्ष; अशा तीनही वृक्षांच्या सळसळणाऱ्या हिरव्यागार पानांच्या छायेखाली मंदिर छान शोभून दिसते. दोन्ही बाजूच्या पारावर छोट्या घुमट्या आणि त्यात राखणदारांच्या मूर्त्या आहेत जिथे लोक आपली, आपल्या मुलांची नजर उतरवून घेत असतात.
परिसरातील एका बाजूस तुळशी वृंदावन, समोर एका काचेच्या पेटीत असलेल्या बोडगेश्वराच्या मोठ्या वहाणा, व आणखीन पुढे असेलेला दीपस्तंभ असा मंदिराचा सम्पूर्ण परिसर अत्यंत प्रसन्न आहे. त्यामुळे बोडगेश्वराचे दर्शन घेऊन लोक इथे काही काळ निवांत बसतात. आजूबाजूच्या सुंदर परिसराचं, समोर दिसणाऱ्या म्हापसा शहराचं इथून छान दर्शन होते.
बोडगेश्वराची जत्रा आणि कार्यक्रम
बोडगेश्वराची जत्रा ही साधारण जानेवारी महिन्यात असते. त्यावेळी मंदिर परिसर लोकांनी फुलून गेलेला असतो. आजूबाजूला मेळा भरलेला असतो. ज्यामध्ये लहान मोठया जत्रेतील दुकानांबरोबर लहान थोरांना आकर्षित करणारे खेळही असतात. त्याशिवाय जत्रेच्या दिवसात विविध मंडळांची नाटके, सत्यनारायणाची महापूजा आदि कार्यक्रमही उत्साहाने साजरे होतात.
देव बोडगेश्वराचे हे सुंदर मंदिर एकदा पाहून बोडगेश्वराचा आशीर्वाद जरूर घ्यावा.