गोव्याचा पारंपारिक खाद्य पदार्थ, मुगागाठी
गोव्यामध्ये कुठल्याही धार्मिक, पारंपारिक समारंभाच्या जेवणामधील मुख्य पदार्थ म्हणजे मुगागाठी. अर्थात मुगाची पातळसर उसळ. ह्या उसळीचं वैशिष्ट्य हे की मूग हे मोड आलेले, त्यांची सालं काढलेले असले पाहिजेत.
मुगागाठींसाठी लागणारे साहित्य.
- पाव किलो मोड आलेले मूग
- एक ते दोन वाटी ओल्या खोबऱ्याचा किस
- दोन तीन ओल्या मिरच्या,
- एक मोठा टोमॅटो
- एक मोठा चमचा ओल्या नारळाची कातली(काप)
- एक ते दीड चमचा गोवन सांबार मसाला
- 1/4 चमचा हळद
- लहान लिंबाएवढी चिंच
- गुळाचा एक लहान तुकडा
गोवन सांबार मसाला बनवण्यासाठी साहित्य
- सात आठ सुक्या मिरच्या (आपल्या आवडीनुसार कमी जास्त कराव्यात),
- एक ते दीड मोठा चमचा धणे
- सात आठ मिरीचे दाणे
फोडणीचे साहित्य
- पाव छोटा चमचा हिंग
- एक लहान चमचा मोहरी
- आठ दहा कढीपत्त्याची पाने
- एक मोठा चमचा गावठी खोबरेल तेल
- २-३ काश्मिरी सुक्या मिरच्यांचे लहान तुकडे
कृती
- मुगागाठी करायच्या असतील तर सर्व प्रथम मूग दोन दिवस आधी पाण्यात भिजवून ठेवावेत.
- जर तुम्हाला रविवारी मुगागाठी करायच्या असतील तर शुक्रवारी रात्री मूग भिजवून ठेवावेत. शनिवारी सकाळी हे मूग पाण्यातून उपसून एक चाळणीमध्ये घालून झाकून ठेवावेत अथवा एका पंच्यामध्ये घट्ट बांधून ठेवावेत. रात्रीपर्यंत त्यांना छान मोड (कोंब) येतात.
- मग हे मोड आलेले मूग रात्रभर पाण्यामध्ये घालून ठेवावेत म्हणजे सकाळपर्यंत त्यांची बऱ्यापैकी साले सुटून वर आलेली असतात.
- ही सगळी साले काढून टाकावीत. आणखीन एक दोनदा मूग पाण्यातून उपसून जास्तीत जास्त साले काढून टाकावीत. थोडी साले उरलीच तर ती मूग शिजताना उकळी बरोबर वरती येतात त्यावेळी काढून टाकावीत
- एका पातेल्यात हे साली काढलेले मूग आवश्यक तितके पाणी घालून शिजवावयास ठेवावे. मुगागाठी सोबत मुगाचे सार करणार असाल तर पाणी थोडे जास्त घ्यावे.
- मूग अर्धे शिजले की त्यामध्ये मोठा चिरलेला टोमॅटो, (तुम्हाला आणखी व्हरायटी हवी असल्यास बटाट्याचे, सुरणाचे, अथवा बांबूंच्या कोंबाचे (bamboo shoots) तुकडेही घालू शकता). ओल्या मिरचीचे लांब तुकडे टाकावेत (हे ही ऑप्शनल), नारळाच्या कातलीचे तुकडे घालावेत आणि मूग आणखीन थोडे शिजू द्यावेत.
- ओल्या नारळाच्या किसामध्ये सांबार मसाला घालावा, तयार सांबार मसाला नसेल तर सुक्या मिरच्या, धणे, मिरी, किसलेल्या ओल्या खोबऱ्यासोबत वाटून घ्यावे, हे वाटण वाटतानाच त्यामध्ये हळद, चिंच, गूळ ही घालावे.
- शिजत आलेल्या मूगांमध्ये हे वाटप घालावे, चवीप्रमाणे मीठ घालावे आणि छान शिजवून घ्यावे.
- मूग शिजले की फोडणीच्या वाटीत, गावठी खोबरेल तेल घालून त्यात एक चमचा मोहरी घालावी. मोहरी तडतडली की दोन तीन सुक्या मिरच्यांचे तुकडे, कडीपत्ता आणि हिंग घालून शिजलेल्या मुगांवरती फोडणी टाकावी.
चपातीबरोबर ह्या गरमागरम मुगागाठी अप्रतिम लागतात.