बिर्ला मंदिराला भेट देण्यास लोकांची वाढती उत्सुकता
बिर्ला मंदिर पाहण्यास रात्रीची वेळ उत्तम
रात्रीच्या वेळी बिर्ला मंदिराच्या सौंदर्याला चार चांद लागलेले असतात. त्यामुळे दिवसा भेट देण्यापेक्षा आपण इथे रात्रीच जायचे असे आम्ही ठरवले होते. मंदिराचे ओपनिंग झाल्या झाल्या काही कारणास्तव आम्हाला तिथे जाता आले नाही. डिसेंबरच्या सुट्टीत मात्र बिर्ला मंदिराला भेट द्यायचीच असे आम्ही निश्चित केले. त्याप्रमाणे एके संध्याकाळी आम्ही बिर्ला मंदिर पाहण्यास बाहेर पडलो.
बिर्ला मंदिर लोकेशन, भेट देण्याची वेळ आणि जाण्याचा मार्ग
वास्को मध्ये असलेले बिर्ला मंदिर बिट्स पिलानी कॉलेजच्या आवारात आहे. पणजीहून साधारण पंचवीस किलो मीटर अंतरावरील ह्या मंदिरात जाण्यासाठी पर्यटक पणजीहून टॅक्सी करू शकतात. शिवाय दाभोळी विमानतळ मंदिराकडून जवळच आहे. नितांत सुंदर असे हे गोव्यातील बिर्ला मंदिर सकाळी सहा वाजता उघडते आणि दुपारी बाराला बंद होते. त्यानंतर ते दुपारी तीन ते रात्री दहा पर्यंत उघडे असते.
संगमरवरी दगडातील अप्रतिम स्थापत्य
तर ठरल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी सातच्या दरम्यान मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरा बाहेरील रस्त्यावरपर्यंत पार्क केलेल्या गाड्यावरून आतील गर्दीचा अंदाज येत होता. रस्त्याच्या कडेने दिसणारे संपूर्ण मंदिर आणि परिसराचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. गाडी पार्क करून आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रवेशाशी असलेली कमान पाहताच आपल्याला आतील मंदिराच्या सौंदर्याचा अंदाज येतो. अतिशय सुबक कोरीव कामाने युक्त अशी ही कमान ह्या संपूर्ण मंदिर आणि परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर घालते. सुरुवातीच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन्ही बाजूला श्री बसंतकुमार बिर्ला आणि श्रीमती सरलादेवी बिर्ला यांचे अप्रतिम सुंदर पुतळे आहेत. संपूर्ण मंदिर, त्यातील मुर्त्या, बाहेरील हे दोन्ही पुतळे, प्रवेशाशी असलेली कमान सारे संगमरवरी आहे. देवळाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीपासून ते संपूर्ण मंदिर हे आधुनिक वास्तुशिल्पाचा नयनरम्य नमुना आहे.
बिर्ला मंदिर हे मुख्यत्वे राधाकृष्णाचे
मुख्यत्वे राधाकृष्णाचे असले तरी बिर्ला मंदिरामध्ये; गणपती, नंदीसहित शंकर पार्वती, हनुमानासहित राम, लक्ष्मण, सीता त्याशिवाय हनुमानाची स्वतंत्र मूर्ती यांचे प्रसन्न दर्शनही भाविकांना येथे घ्यायला मिळते. आतील खांब, वरचे छत यावरील नक्षी काम अप्रतिम आहे. छतावर सुंदर कोरीव कमळे. तसेच इतरत्रही कमळे, मोर, हत्ती इत्यादीचे सुबक कोरीव काम पाहात राहावे असे आहे. मला ह्या मंदिरातील मुर्त्या आणि त्यांचा शृंगार विशेष आवडला जो साधारणपणे इतर देवळांमध्ये आपण पाहतो त्याहून वेगळा आणि ऐश्वर्य संपन्न आहे
मंदिराचे भव्य सभागृह सुंदर कोरीव खांबाने आणि नक्षीदार कोरीव छताने युक्त
मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच्या राधाकृष्णाच्या दर्शनासाठी रांग लागलेली होती त्या रांगेत आमचा नंबर येईपर्यंत आम्ही उभे राहून सभोवतालचे निरीक्षण करत होतो. दर्शन घेऊन झालेले लोक मंदिराचे आणि स्वतःचे फोटो घेण्यात मग्न होते. आमचा नंबर येताच कृष्णाचे डोळे भरून दर्शन घेतले आणि पुरोहितांनी दिलेला कच्च्या शेंगदाण्याचा प्रसाद घेऊन इतर देवतांचे दर्शन घेतले. मंदिराला पहिल्यांदाच भेट देत असल्यामुळे की काय कोण जाणे, समोरच्या त्या भव्य सभागृहात बसून डोळे मिटून परमेश्वराशी एकरूप होण्याचा माझा प्रयत्न अपयशी झाला. डोळे पुन्हा पुन्हा मंदिराची शिल्पकला, देवतांच्या विलोभनीय मूर्ती यांचेच अवलोकन करण्यात रमले होते.
नीटनेटका विलोभनीय परिसर
थोडा वेळ तिथे अशाच स्थितीत बसून आम्ही मंदिराच्या बाहेरून संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा करून, मंदिराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या परिसराचाही आनंद घेतला. मंदिराच्या आवारात मधुर भक्ती संगीत सुरु होते. सारे वातावरण त्यामुळे प्रसन्न भक्तिमय झाले होते. दर्शन घेऊन निवांत बसलेले लोक आणि प्रदक्षिणा घालणारे भक्तही त्या संगीताबरोबर गुणगुणण्याचा आनंद घेत होते. आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश करतानाच सुरेल स्वरातील मधुराष्टकम् कानावर पडले. पुढे प्रदक्षिणा घालताना माझ्या आवडत्या सूर्यगायत्रीचे रामभजन आणि मला अतिशय प्रिय असलेल्या कुलदीप पैंच्या बालचमूचे हरे कृष्ण मंत्राच्या गायनाचे स्वरही कानी पडले. अशा ह्या विलोभनीय मंदिराच्या अद्भुत दर्शनाच्या अनुभवाचे गाठोडे घेऊन आम्ही माघारी परतलो
एकदा तरी भेट द्यावेच असे गोव्याचे बिर्ला मंदिर
ह्या मंदिरात ईश्वराला अर्पण करण्यासाठी फक्त आपला भक्तीभाव घेऊन जायचा आहे. कारण बिर्लांचं हे वैयक्तिक मंदिर असल्याने ह्या मंदिरांमध्ये फुले, अगरबत्ती, पैशाच्या रूपाने दान दक्षिणा हा प्रकार नाही. त्यामुळे देवाच्या गाभाऱ्यासमोर उडालेला घाई गडबड गोंधळ इथे नाही. देवाबद्दल आस्था नसली तरी एक पर्यटन स्थळ जेथे आपल्याला अतिशय अप्रतिम वास्तुशिल्प; आजूबाजूचा स्वछ परिसर, जिथे सुंदर फुलझाडाने नटलेला बगीचा आहे; मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या बगीच्यामध्ये थुई थुई नाचणारे कारंजे आहे ते पाहण्यासाठी म्हणून ह्या मंदिराला भेट द्यावी.
असे हे गोव्यातील बिर्ला मंदिर, जे वेळात वेळ काढून पाहण्याचे आणि पाहिल्यानंतर एक सात्विक आनंद घेऊन परतण्याचे उत्तम ठिकाण आहे.