शिरवळ्यो म्हणजे  तांदळाच्या पिठाच्या शेवया, ज्या नारळाच्या रसाबरोबर खाल्ल्या जातात. हा गोवन पारंपरिक पदार्थ आहे.   कोकणामध्येही हा पदार्थ  केला जातो ज्याला तिथे शिरवाळे असे म्हणतात. आजकाल मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे सहसा पालक असे पारंपरिक पदार्थ करत नाहीत. पण त्यामुळे मुलांना ह्या पदार्थांची ओळख होत नाही आणि त्यांच्या चवीची गोडीही कळत नाही. म्हणून मुलांना आवडत नाही या कारणास्तव  करायचे टाळण्याऐवजी आपण असे पदार्थ अधून मधून केले पाहिजेत. त्यांचे पौष्टिक महत्व समजावून देत ते मुलांना खाऊ घातले पाहिजेत. त्यामुळे मुलेही हेल्दी खायला शिकतील आणि हे पारंपरिक पदार्थही पुढच्या पिढीपर्यंत पोचून जिवंत राहतील.

शिरवळ्यो करण्याच्या दोन पद्धती आहेत. यातल्या पारंपरिक पद्धतीत पिठाचे गोळे करून ते उकळत्या पाण्यात शिजवले जातात. तर दुसऱ्या पद्धतीत त्याच्या शेवया पाडून त्या मोदकाप्रमाणे वाफेवर उकडल्या जातात. दोन्हीही रेसिपी मी इथे देत आहे.

शिरवळ्यो Goan recipe

शिरवळ्यो साठी साहित्य

तांदळाचे पीठ : दोन वाट्या

पाणी : दोन वाट्या

तूप/तेल : दोन चमचे

मीठ : अर्धा चमचा

नारळाच्या रसासाठी साहित्य 

नारळ : एक

गूळ : पावकिलो

वेलची पूड :१/४ चमचा

हळद: १/४ चमचा

मीठ : १/४ चमचा

कृती :

शिरवळ्यो

एका पातेल्यात दोन वाट्या पाणी उकळत ठेवायचे. त्यामध्ये तेल/तूप आणि मीठ घालायचे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून एकत्र करायचे. थोडा वेळ पीठ झाकून ठेवायचे. कोमट झाल्यावर चांगले मळून घ्यायचे. ह्या मळलेल्या पिठाचे एकसारखे गोळे करायचे आणि पाणी उकळून त्यामध्ये हे गोळे काही मिनिटे शिजू द्यायचे. त्यानंतर चकली पात्रामध्ये जाड शेवेची चकती घालून त्यामध्ये एक एक गोळा घालून त्याच्या शेवया पाडून घ्यायच्या.  ही झाली पारंपरिक कृती.

दुसरी पद्धत : ज्या पद्धतीला मी अधिक प्राधान्य देते ती म्हणजे उकळलेल्या पाण्यात हे गोळे टाकण्या ऐवजी त्या गोळ्यांच्या आधी शेवया पाडून घ्यायच्या व चाळणीमध्ये अथवा इडली पात्रामध्ये ठेवून त्या उकडून घ्याव्यात.

नारळाचा रस 

नारळ खवून त्यात हळद टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. ह्या वाटणाचा पिळून रस काढावा. रस फार पातळ करू नये. ह्या रसामध्ये किसलेला गूळ घालून तो रसामध्ये एकजीव होऊ द्यावा. आता रसामध्ये  वेलची पावडर, मीठ घालून पुन्हा ढवळून छान एकजीव होऊ द्यावे.

गरमागरम शिरवळ्यो आणि नारळाचा हा रस खवय्यांना नक्कीच आवडतील.

कॅटेगरी Goan Food