मालवणचे रम्य दर्शन घेऊन आम्ही कुडाळच्या दिशेने निघालो. वाटेत भराडी देवीचे दर्शन घेऊन साधारण चारच्या दरम्यान आम्ही कुडाळ गाठले. शहरांमध्ये शिरता शिरताच सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेचा फलक लक्ष वेधून घेत होता. कुडाळ म्हणताच पहिल्यांदा ध्यानात येते ते पिंगुळी. पिंगुळी मध्ये भेट देण्यासारखी दोन स्थाने आहेत. एक तर श्री राऊळ महाराज मठ, आणि दुसरे ठाकरवाडी आदिवासी कलादालन!
दत्ताचा अवतार मानल्या जाणाऱ्या परमपूज्य श्री राऊळ महाराजांचा मठ एक अतिशय पावन स्थान. तेव्हा प्रथम श्री राऊळ महाराज मठाला भेट द्यायची आणि तिथल्या पवित्र वातावरणात थोडा वेळ घालवायचा असे ठरवले. थोडी विश्रांती घेऊन निघाल्यामुळे आम्हाला मठामध्ये पोचायला जरासा उशीरच झाला. आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती. त्यासाठी देवळामध्ये तयारी सुरु होती. देऊळ दत्त जयंती साठी सज्ज होत होते. आम्ही फाटकातून आत प्रवेश केला. फरशी नुकतीच स्वच्छ धुतलेली होती. बाजूलाच फियाट कार उभी असलेली दिसली. तिथून आम्ही पुढे निघालो दत्त मंदिरात प्रवेश केला; दत्ताचे दर्शन घेतले. त्याचवेळी अण्णामहाराजांचे चिरंजीव तिथे आले. त्यांनी आमचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. आम्ही कुठून आलो वगैरे चौकशी केली. एका पुरोहितांना बोलावून सर्व मंदिर आणि मठ परिसर आम्हास दाखवण्यास सांगितला.
राऊळ महाराजांचे शिष्य अण्णामहाराजांनी वसलेल्या ह्या भक्तपीठाचे दर्शन घेण्यास आम्ही निघालो.
आधी आम्ही परमपूज्य राऊळ महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले. अत्यंत सजीव अशी राऊळ महाराजांची मूर्ती खरोखरच आपल्याला आशीर्वाद देत असल्याचा भास क्षणभर मला झाला. समाधी मंदिरातून बाहेर पडताच एक विहीर आहे. बाजूलाच असलेला औदुंबर समाधी मंदिराच्या पवित्र परिसराचे वातावरण आणखीन पवित्र करतो. ह्या समाधी मंदिरासमोरच गौरी शंकराचे मंदिर आहे. त्याच्या शेजारी विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे आणि बाजूला हनुमानाचे मंदिर आहे. एक एक करत आम्ही ह्या साऱ्या मंदिरांचे दर्शन घेतले. विठ्ठल रखुमाई आणि हनुमान मंदिरांच्या मध्ये एक रंगमंच आहे. जिथे सामूहिक कार्यक्रम होतात. हनुमान मंदिराच्या बाजूलाच अण्णामहाराजांचे लहान भाऊ गुरु काकामहाराजांचे समाधी मंदिर आहे. ज्याठिकाणी औदुंबर आहे तिथेच बाजूला राऊळ महाराजांनी एक मोठा यज्ञ केला होता. त्याठिकाणी आता एक दीपमाळा आहे.
समाधी मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर अण्णामहाराजांनी दत्त मंदिराची स्थापना केली. २००३ सालात दत्त आणि दोन्ही बाजूला शिवशंकर अशा तिन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दत्ताच्या मूर्तीपाठी असलेले राऊळ महाराज आणि अण्णामहाराजांचे तैलचित्र अतिशय लक्षवेधी आहे. दत्तमंदिरालगत एक खोली आहे तिथे असलेल्या पलंगावर राऊळ महाराज झोपत असत.
या पवित्र भूमीमध्ये दोनदा अतिरुद्र स्वाहाकार संपन्न झालेला आहे. हे सारे पाहिले, सारी माहिती घेतल्यानंतर अण्णामहाराजांच्या चिरंजीवांनी आम्हाला इथेच महाप्रसाद ग्रहण करून जाण्याचा आग्रह केला. तत्पूर्वी सुरुवातीला पाहिलेल्या फियाट बद्दल माझ्या मनात जी उत्सुकता होती. ती मी त्यांच्याकडे बोलून दाखवली. तेव्हा ती राऊळ महाराजांची फियाट असल्याचे कळले. जिच्यामधले पेट्रोल एकदा संपले असता, राऊळ महाराजांनी इंधनाच्या जागी पाणी घालून ती चालू केली होती.
त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी गेलो. चुलीवर शिजवलेल्या त्या महाप्रसादाची गोडी काय वर्णावी!! भात, आमटी, सुरणाची भाजी, बटाट्याची भाजी आणि लोणचे असा साधाच बेत अमृतासमान होता. स्वतः अण्णामहाराजांचे चिरंजीव आम्हाला आग्रहाने वाढत होते. त्यांचा साधेपणा, सरळ स्वभाव आणि आतिथ्यभाव ह्यांनी भारलेल्या आमच्या मनात पुन्हा तिथे जरूर यायचे असा विचार रुळत होता. पुढच्या खेपेला येऊ तेव्हा तिथल्या परिसराची शोभा वाढवणाऱ्या भक्तनिवासामध्येच निवास करायचा आणि पवित्र परिसरात काही दिवस घालवून पावन व्हायचे असे निश्चित करून आम्ही पिंगुळी मठाचा निरोप घेतला.