छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
आदल्या दिवशी मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर आम्ही इतर काही ठिकाणे पाहण्यासाठी सकाळी दहाच्या दरम्यान हॉटेल सोडले. प्रथम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी गेलो. नुकतेच म्हणजे ४ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. ४ डिसेंबर हा नेव्ही दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी ह्या पुतळ्याचे ह्या दिवशी अनावरण केले. बाहेरून किल्ल्याचे स्वरूप देऊन त्याला राजकोट नाव दिलेले आहे. आतमध्ये शिरताच एका सुंदर वृक्षाखाली महादेवाचे छोटेसेच मंदिर आहे. वृक्षावर भगवा ध्वज फडकत आहे. हिरव्यागार वृक्षावर हा भगवा ध्वज अतिशय शोभून दिसतो.
तिथून आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आलो. एका उंच चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा हा तलवार उंचावलेला पुतळा स्टील आणि काँक्रीट ने बनवलेला आहे. ह्या पुतळ्यातील बारकावे अतिशय कौतुकास्पद आहेत. महाराजांच्या चेहऱ्यावरील खंबीर भाव. वाऱ्याच्या झोताच्या दिशेने रुळलेली महाराजांच्या गळ्यातील माळ आणि अंगरखा, दुसऱ्या हातात म्यान असा हा ताम्रवर्णी पुतळा पाहिल्यावर क्षणभर नतमस्तक झाल्यशिवाय राहवत नाही.
ह्या चौथऱ्याच्या एका बाजूला महाराजांच्या युद्धनौकांची चित्रे आहेत. सोबत त्यांची नावे आणि माहितीही दिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराजांच्या जलदुर्गांची चित्रे आहेत. त्यासोबत त्यांचीही माहिती आहे. मागच्या बाजूला महाराजांची राजमुद्रा आहे. ती राजमुद्रा पाहताना आणि त्यावरचे ‘प्रतिपच्चन्द्र्लेखेव….’ वाचताना ऊर अभिमानाने भरून गेले.
जय गणेश मंदिर, मेढा
बाजूला पसरलेला समुद्र आणि लांबवर दिसणारा सिंधुदुर्ग किल्ला हे सगळं पाहून आम्ही इथून काही अंतरावर असलेल्या मेढा येथील जय गणेश मंदिरामध्ये गेलो. सुवर्णाची गणेश मूर्ती असलेले हे मंदिर आणि परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर आहे. मंदिरातील पवित्र शांतता सुखावून जाते. ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी हे मंदिर बांधलेले आहे. गणपतीचे दर्शन घेऊन प्रसन्न मनाने आम्ही पुढे रॉक गार्डन पाहण्यासाठी निघालो.
रॉक गार्डन, मालवण
समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले रॉक गार्डन म्हणजे निसर्गाच्या कमालीचा कोरीव नमुना आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरील वेगवेगळ्या दगडांच्या नमुन्यांनी विणलेला असा हा सभोवार अंथरलेला निसर्ग निर्मित दगडी गालिचाच! ह्या दगडांच्या खाचाखोचातून असंख्य खेकडे इतस्ततः फिरत होते. दगडांच्या मधेच शिरलेल्या समुद्राच्या स्वच्छ पाण्यात इवलाले मासे सुळसुळ धावत होते. समुद्राच्या नजीक असलेल्या दगडांवर बगळे, करकोचे ह्या प्रकारात येणारे अनेक पक्षी दगडावर येऊन बसत होते. कधी एकटे तर कधी थव्याने. बाजूलाच असलेली बागही विविध अशा सुंदर झाडांनी सजलेली आहे. रोजच्या सांसारिक धबडग्यातून बाहेर येण्यासाठी कुटुंबासोबत पिकनिक करण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे मालवणचे हे रॉक गार्डन.
मालवण पाहिल्यानंतर गोव्याला परतण्यापूर्वी आम्ही कुडाळ पाहण्याचे ठरवले. मालवणहून निघायला दुपार झालेली, साधारण १२ एक किलोमीटर अंतर आम्ही ओलांडलं असेल आणि वाटेत भराडी गाव असे नाव वाचले.
भराडी देवी मंदिर
कोकणची भराडी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोकणचे पंढरपूर म्हंणून ओळखले जाणारे मंदिर जाताजाता पाहायचे, भराडी देवीचे दर्शन घेऊन पुढे जायचे असे आम्ही ठरवले. भराडी देवीचे हे मंदिर आंगणेवाडी ह्या गावामध्ये आहे. आंगणे आडनावाचे लोक इथे अधिक असल्याने गावाला आंगणेवाडी असे नाव पडले आहे. थोड्याशा उंच भागावर असलेल्या ह्या देवळाच्या आजूबाजूचा भाग जरा ओसाडच वाटला. देऊळ नवीन बांधलेले दिसत होते, चौकशी अंती हल्लीच काही वर्षांपूर्वी त्याचे नवीनीकरण झाल्याचे कळले. नागर शैलीमध्ये बांधलेले हे दुमजली देऊळ लक्षवेधी आहे. मधला दिवस आणि मधली वेळ असतानाही मंदिरातील गर्दी भाविकांची देवीवरील श्रद्धा सांगून जात होती. साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या देवीची मोठी जत्रा असते.
पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ला; दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांचा पुतळा, जय गणेश मंदिर, रॉक गार्डन आणि जाता जाता भराडी देवीचे मंदिर पाहून आम्ही परत भेटीला या असे म्हणणाऱ्या मालवणचा निरोप घेतला.
.