फाल्गुन महिना येतो तसा गोव्याला वेध लागतात शिगमोत्सवाचे. सगळे लोक आतुरतेने ह्या शिगमो (शिमगा) सणाची वाट पाहत असतात. आपापल्या एरिया मध्ये कुठल्या तारखेला शिगमोत्सव मिरवणूक आणि चित्ररथ असणार याची लोकांमध्ये उत्सुकतेने चर्चा सुरु होते. ह्यावर्षीचा होळी सण अवघा चार दिवसावर येऊन ठेपलेला आहे. उत्साहाचं उधाण असलेल्या ह्या शिगमोत्सव मिरवणुकीचे वेळापत्रक आलेले आहे. साधारण पंधरा दिवस सुरु असणाऱ्या ह्या उत्सवाची सुरुवात २४ मार्च पासून होईल. ज्या ज्या ठिकाणी ह्या शिगमोत्सवाच्या मिरवणुका होतील त्या ठिकाणांची नावे आणि तारखा पुढील प्रमाणे.
शिगमोत्सव २०२४ :- फोंडा -२६ मार्च, कळंगुट – २७ मार्च, सांखळी- २८ मार्च, वाळपई- २९ मार्च, पणजी- शनिवार दि. ३० मार्च, पर्वरी शिगमोत्सव – रविवार ३१ मार्च, पेडणे आणि डिचोली- १ एप्रिल, काणकोण- २ एप्रिल, वास्को- ३ एप्रिल, शिरोडा आणि कुडचडे- ४ एप्रिल, केपेआणि धारबांदोडा- ५ एप्रिल, मडगाव-६एप्रिल, म्हापसा आणि सांगे ७ एप्रिल, आणि शिगमोत्सवाची अखेर कुंकळ्ळी – ८ एप्रिल.
वेध शिगम्याचे
शिगमोत्सवाचे वेध खरे तर प्रत्यक्ष होळी सुरु होण्यापूर्वीपासूनच लागलेले असतात. विविध रोमटा मेळ स्थानिक देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी देवालयातून जातात. अंत्रुज महाल अर्थात फोंडा हे ह्या उत्सवाचे केंद्र आहे असे म्हणायला हरकत नाही. फोंड्याच्या आजूबाजूचे लहान मोठे रोमटामेळ होळीच्या काही दिवस आधी, रंगीबेरंगी कपडे घालून ‘ओस्सय ओस्सय’ चा गजर करत, महालसेच्या देवळात महालसेचा आशीर्वाद घेण्यासाठी जमतात. रोमटा मेळचा शाब्दिक अर्थ एका गावातून दुसऱ्या गावात जाणे. एक शिस्तबद्ध आणि ठराविक पारंपरिक गणवेश परिधान केलेला समूह पारंपरिक गाणी गात आणि ‘ओस्सय ओस्सय’ असा गजर करत आणि ठराविक तालबद्ध पदन्यास करत पुढे चालत असतो. सोबत ढोल, ताशे आदि वाद्यांचा ‘घुमचे कटर घूम’ चा ठेका असतो. .
शिगमोत्सवाचे स्वरूप
शिगमोत्सवाच्या मिरवणुकीत ह्या रोमटा मेळाबरोबर, विविध पारंपरिक गोमंतकीय लोकनृत्यांचेही सादरीकरण केले जाते. ज्यामध्ये फुगडी, धनगर नृत्य, गोफ, मोरूला, घोडे मोडणी इ. अनेक नृत्यांचे त्या त्या पारंपरिक वेशात पारंपरिक गाणी म्हणत प्रदर्शन केले जाते. मिरवणुकीत असणारे विविध पौराणिक चित्ररथ हे ह्या शिगमोत्सवाचे खास आकर्षण असते. याचबरोबर वेगवेगळ्या वेशभूषा करून लोक ह्या मिरवणुकीमध्ये सामील होतात. रोमटामेळ, लोकनृत्ये, चित्ररथ आणि फॅन्सी ड्रेस यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने अनेक मंडळे ह्या मिरवणुकीत उत्साहाने भाग घेतात. हा अप्रतिम सोहळा पाहण्यासाठी लोक प्रचंड संख्येने उपस्थतीत असतात. अनेक देशी विदेशी पर्यटकही हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी उत्साहाने विविध ठिकाणी उपस्थित राहतात.
गोव्याचा हा अप्रतिम शिगमोत्सव पाहण्याची तुमची इच्छा असेल तर लगेच गोव्याची टूर प्लॅन करा. २६ मार्च ते ८ एप्रिल मध्ये तुमच्या सोयीप्रमाणे कुठेही तुम्ही ह्या आनंद सोहळ्याचे साक्षी बनू शकता.