मालवण पाहायला जायचे ही इच्छा फार दिवसापासून मनात होती त्याचे एक कारण म्हणजे सिन्धुदुर्गचा किल्ला आणि दुसरे कारण मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद. शिवाय हल्लीच, म्हणजे आम्ही तिथे जाण्याच्या फक्त पंधरा दिवस आधी पंतप्रधान मोदीजींनी अनावरण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हे ही एक आकर्षण होतेच.

आम्ही वेंगुर्ला सोडलं आणि मालवणच्या दिशेने, परुळे येथील चिपी ब्रिज मार्गाने निघालो. काली नदीवरील भव्य चिपी ब्रिजवर येताच इतर पर्यटकांप्रमाणेच आम्हीही तिथे काही क्षण थांबण्याचा मोह आवरू शकलो नाही. लांब रुंद नदीच्या दोन्ही बाजूला असलेला डोळ्यात साठवून घ्यावा असा निसर्ग; वरती डोक्यावर तळपणारे सूर्यनारायण आमच्यातलं पाणी शोषत होते तरी तिथे थांबून आम्ही ते सौंदर्य फोटोत टिपले आणि पुढे निघालो. चिपी विमानतळावरून मालवणला पोहोचलो तेव्हा जवळ जवळ दोन वाजून गेले होते. आधी कुठे तरी फक्कड अशा मालवणी थाळीचा स्वाद घ्यायचा आणि मग पुढे जायचे असे ठरवून आम्ही एका घरगुती जेवण मिळणाऱ्या हॉटेलपाशी थांबलो. उत्तम घरगुती मालवणी जेवणाचा स्वाद घेऊन पुढे निघालो.

चिपी ब्रिज मालवण

आधी हॉटेल वगैरे बुक करण्यात वेळ न घालवता डायरेक्ट सिंधदुर्ग किल्ल्यापाशी जायचे असे ठरवून आम्ही जिथून बोटीतून किल्ल्यापर्यंत नेले जाते त्या बंदरावर आलो. सगळ्या बंदरावर तुडुंब गर्दी होती. शनिवार रविवारला लागून आलेली सुट्टी आणि सरते वर्ष! माणसे भरून भरून होड्या निरंतर ये जा करत होत्या. तिकीट काढून लांब लचक लाईन मध्ये आम्ही भयंकर उन्हाचा मारा खात हळू हळू पुढे सरकत होतो. बाजूला  वॉटर स्पोर्ट्स सुरु होते. ते पाहण्यात मन दंग झाले त्यामुळे भर उन्हाचा सोस आणि लांब लाईन असल्याचा त्रास आम्हाला विशेष जाणवला नाही.

शेवटी एकदाची आमची वर्णी एका होडीमध्ये लागली. लाईफ जॅकेट घालून आम्ही सिद्ध झालो. तो साधारण एक- दीड किलोमीटरचा समुद्र प्रवास करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोचलो. आम्ही सगळे महाराजांचे अनन्य भक्त! ती भक्ती किल्ल्यात प्रवेश करताना उचंबळून आली. महाराजांचं कार्य, त्यांना तितकीच जीवतोड साथ देणारे त्यांचे मावळे किती महान, ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. तिथे येणारा प्रत्येक पर्यटकही हीच जाणीव ठेऊन यावा अशी एक खुळी अपेक्षा मन करत होते. परंतु त्याचा भ्रमनिरास झाला. फक्त ‘जय भवानी जय शिवाजी’ असा अनावश्यक गोंधळ करणारे, स्वतःला शिवरायांचे फार मोठे भक्त समजणारे लोक, चेहऱ्यावर कसलीतरी मस्ती घेऊन फिरत होते. फक्त एक पर्यटन स्थळ म्हणूनच आलेले आणि त्या पवित्र स्थानाच्या इतिहासाशी, महाराजांशी, काहीही देणे घेणे नसलेले लोक चित्र विचित्र कपडे घालून, जिकडे तिकडे फक्त सेल्फी काढण्यात रमले होते. ह्या अशाच लोकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या किल्ला परिसराच्या अस्वच्छतेत भर घालत होत्या. हे सारे पाहून मन अतिशय निराश झाले.

हे सगळे चित्र बदलणे माझ्या हातात नसल्याने मी परत किल्ल्याकडे आणि शिवाजी महाराजांच्या महान कार्याकडे लक्ष वळवले. किल्ला व्यवस्थित जाणून घ्यायचा असेल तर एक चांगला गाईड सोबत असणे आवश्यक वाटल्याने आम्ही एक गाईड केला. सावंत आडनावाचा एक पोरसवदा उत्तम गाईड आम्हाला मिळाला. आम्ही त्याच्यासोबत निघालो.

किल्ल्यामध्ये एकूण सहा मंदिरे आहेत. प्रवेशाशीच दक्षिणमुखी हनुमानाची छोटीशी देवळी आहे. आत प्रवेश केल्यानंतर जरीमरी देवीचे मंदिर आहे. त्याशिवाय आत मध्ये महादेवाचे, भवानीदेवीचे, महापुरुष आणि सर्वात महत्वाचे शिवाजी महाराजांचे मंदिर जे १६९५ मध्ये राजाराम महाराजांनी बांधवले. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरातील शिवाजी महाराजांची मूर्ती ही कोळ्याच्या वेशातील आणि दाढी नसलेल्या गोल चेहऱ्याची आहे. महादेवाच्या मंदिरात एक खंदक आहे. जो ओझर नावाच्या गावात उघडतो. भवानी मातेची मूर्ती पाषाणाची आहे जी साडे तीनशे वर्षांपूर्वीची आहे.

जरीमरी देवी मंदिर

मालवण किनाऱ्यावर अरबी समुद्रातील कुरटे बेटावर ४८ एकर जागेत शिवाजी महाराजांनी सिन्धुदुर्ग किल्ला बांधवून घेतला किल्लेदार गोविंद प्रभू यांच्या देखरेखीखाली हिरोजी इंदुलकरांनी ह्या किल्ल्याची निर्मिती केली. २९ बुरुज, २०० तोफा, पहारेकऱ्यांसाठी खोल्या असलेल्या ह्या किल्ल्याची तटबंदी ३ कि. मी. लांब आणि ९ मी उंच आहे. १६६२ ते १६६५ अशी तीन वर्षे हा किल्ला बांधण्यासाठी लागली.

किल्ल्याचा मुख्य दरवाजा सागवानी आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी जंघ्या म्हणजे तिरपे होल्स आहेत. शत्रूने जर किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न केला तर ह्या जंघ्यांमधून त्यांच्यावर गरम तेल ओतण्यात येत असे. आत शिरताच वरती नगारखाना आहे. महाराजांच्या एका हाताचे आणि एका पायाचे ठसे घुमटीमध्ये सुरक्षित करून ठेवलेले आहेत. बुरुजांमध्ये, टेहळणी बुरुज आहे, गौमुखी बुरुज आहे. तटबंदीच्या कड्याला ४२ ठिकाणी पायऱ्या आहेत. भक्कम आणि सर्व बाजूनी सुरक्षित असा हा किल्ला बांधवण्यासाठी एक कोटी सुवर्ण मुद्रांचा खर्च झालेला होता.

किल्ल्यामध्ये पिंडीच्या आकाराच्या तीन विहिरी आहेत. दूध विहीर, दही विहीर, आणि साखर विहीर. ज्या जांब दगडात बांधलेल्या आहेत. शिवाय पाझर तलावही आहे. राजाराम महाराजांनी बांधावलेल्या राजवाड्यामध्ये ताराबाईंचे वास्तव्य असायचे तो राजवाडा १७६५ मध्ये इंग्रजांनी हल्ला करून उध्वस्त केला. किल्ला काबीज करून त्याचे नाव फोर्ट ऑगस्टस असे ठेवले.

किल्ल्यामध्ये सध्या एकूण अठरा घरे आहेत. सध्याची पिढी ही बारावी पिढी आहे. परंतु क्वचितच लोक तिथे राहतात.

सिंधुदुर्ग किल्ला मालवण

हे सर्व पाहताना आणि ऐकताना इतिहासात रमलेले आम्ही इतिहासातून बाहेर आलो आणि सध्याच्या किल्ल्याच्या परिस्थितीकडे पुन्हा एक नजर फिरवली. अतिशय मार्मिक आणि खोचक अशा पुणेरी छापाच्या पाट्या असूनही लोकांनी जिकडे तिकडे प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकलेल्या होत्या. त्याशिवाय ठिकठिकाणी उगवलेले रान,  हे सगळे पाहून मन व्यथित झाले. केवळ सरकारच नाही तर प्रत्येक वेळी सरकारकडे बोट दाखवणारा नागरिकही कधी जबाबदार होणार आहे? पर्यटकांची तर पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवण्याची विशेष जबाबदारी असते. ही जाणीव  त्यांना कधी होणार आहे?

असो!

तर महाराजांबद्दलची भक्ती ही फक्त घोषणा देण्यापुरती न राहता त्यांची कृती, चारित्र्य आणि शिकवण; भक्त म्हणवणाऱ्या प्रत्येक अनुयायामध्ये उतरो अशी मनोमन प्रार्थना करत आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याचा निरोप घेतला.

.

आता मुख्य काम होतं एक रात्र घालवण्यासाठी निवारा शोधण्याचं. एक एक करत आम्ही हॉटेल, होम स्टे शोधत होतो आणि आम्हाला हॉटेल फुल्ल असल्याचे उत्तर येत होते. एक तास आमचा असा शोधाशोधीत गेला. शेवटी तर, तुम्हाला कुठेही रूम मिळण्याची शक्यता नाही इतपत ऐकावे लागले. का? तर इअर एंडिंग होतं ना, वर्षाच्या शेवटी प्रत्येक वर्षी म्हणे मालवण असं भरलेलं असतं. गोवा ओसंडून वाहत असतं म्हणून आम्ही गोव्यातून बाहेर कोकणात भ्रमंतीला आलो होतो पण कोकणाचीही आता तीच अवस्था झाली आहे हे आम्हाला नव्यानेच कळले. रूम नाही मिळाली तर मग काय? अशी चिंता करत आम्ही आमचे शोधकार्य पुढे सुरु केले आणि परमेश्वराच्या कृपेने एका होम स्टे मध्ये असलेली एकमेव रूम आम्हाला मिळाली.

रूम मध्ये येऊन फ्रेश होऊन आम्ही आधी पोटपूजा करण्यासाठी बाहेर पडलो, कारण एकूणच मालवणची तुडुंब भरलेली अवस्था पाहिल्यानंतर लवकरात लवकर जेवायला बाहेर पडणेच आम्हाला योग्य वाटले.

मालवणचे रस्ते अरुंद, त्यात पर्यटक भरलेले असल्यामुळे रस्त्यावर वाहतूकही प्रचंड. त्यातून मार्ग काढत आम्ही गुगलवरून माहिती काढून जवळच्या चैतन्य नावाच्या रेस्टॉरंट मध्ये पोहोचलो. रेस्टॉरंटची जागा लहान होती परंतु जेवण मात्र फर्स्ट क्लास होतं. मत्स्याहार आणि शाकाहार दोन्हीही चविष्ट होते. शाकाहारातल्या  पक्वान्न थाळीने तर दिल खुश करून टाकले.

दुसऱ्या दिवशी मालवण मधली आणखी काही ठिकाणे पाहून आम्हाला परतीच्या प्रवासाला लागायचे होते म्हणून आम्ही लगोलग हॉटेलवर पोहोचलो.

कॅटेगरी Konkan