लईराई हे नाव गोव्यात आल्यानंतर अनेकदा कानावर पडत होतं. कोण असेल ही देवी? काय असेल देवीची कथा? असे प्रश्न मनात निर्माण करत होतं. विशेषतः लईराई देवीची जत्रा जवळ आली की वर्तमानपत्रात येणारी मोठी जाहिरात लक्ष वेधून घेत होती, ती लईराई देवीच्या त्यातील चित्रामुळे. इतर देवतांचे रूप आणि लईराई देवीचे हे रूप ह्यांमध्ये असलेला फरक हेही एक कारण होते. इतकं असूनही लईराईच्या देवळात जाण्याचा योग काही येत नव्हता. मात्र लईराईच्या जत्रेबद्दल ऐकलं तेव्हा तिथे जाण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. जत्रेला जायचा योग येईल तेव्हा येईल पण देवळात जाऊन देवीचे दर्शन घ्यायचेच असे मी पक्के ठरवले.

मग बऱ्याच वर्षानंतर का होईना एके दिवशी आम्ही शिरगावला निघालो. म्हापशाहून थिवी, अस्नोडा करत शिरगावला पोचलो. शिरगाव हे छोटे गाव डिचोली तालुक्यामध्ये आहे. अस्नोड्यामध्ये येताच शिरगावच्या दिशेने जाणाऱ्या उजव्या वळणावर गाडी वळवली. अरुंद रस्ता, वाटेत लागणाऱ्या झरीवरचा छोटासा पूल, दोन्हीकडचा सुंदर निसर्ग पहात पहात आम्ही शिरगावला पोचलो. का कोण जाणे पण हा गाव मला गोव्यातल्या सामान्यतः दिसणाऱ्या  इतर गावांपेक्षा वेगळा भासला. गोव्यातील गावाचा वेगळा जो टच तो मला इथे जाणवला नाही. रस्ता जिथे संपतो तिथेच देऊळ आहे. म्हणजे लांबून तो रस्ता तिथे संपला असे वाटते. परंतु तिथूनच तो रस्ता पुन्हा उजवीकडे गावात जातो.

पायऱ्या चढून आम्ही देवळामध्ये प्रवेश केला. पूर्वी छोटेच असलेले हे देऊळ साधारण चाळीस एक वर्षांपूर्वी वाढवून मोठे बांधवले गेले आहे. पायऱ्या चढून आत जाताच मोठा सभामंडप आहे. इतर देवळांच्या तुलनेत हा सभामंडप मला मोठा वाटला. लईराईची जत्रा असते त्यावेळी देवीचे धोंड ह्या सभामंडपात रंगीबेरंगी रिबिनीने सजवलेली काठी हातात घेऊन नाचतात. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी सभामंडपातून आणखीन पायऱ्या चढून वर जावे लागते.

गोव्यातील मंदिरांचे साधारण जे चित्र असते त्यामध्ये बाहेरील सभामंडप आणि गाभाऱ्यासमोरील चौक यांच्या मध्ये एक खोली असते. मंदिराबरहुकूम ह्या खोलीचा आकार लहान मोठा असतो. ह्या खोलीमध्ये नगारे इ. वाद्ये ठेवलेली असतात. त्यामुळे ह्याला नगारखाना असे म्हणतात. काही देवळातून इथे मखर असते. जसे फातर्प्याच्या शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीच्या मंदिरात पाहायला मिळते. मात्र बहुतेक देवळातून इथे देवाच्या सेवेच्या दक्षिणेसाठी पावती फाडण्यासाठी टेबले, कम्प्युटर मांडलेले असतात.

लईराईच्या देवळातील ही खोलीही बरीच मोठी आहे. आतील चौकाच्या सज्जात प्रवेश करण्यासाठी ह्या खोलीच्या दोन्ही बाजूला जिने आहेत.

इथून आम्ही मुख्य चौकात आलो. गाभाऱ्यापाशी येऊन ओटी, फाती (गजरा) देवीला अर्पण केला आणि समोर देवीकडे पाहिले. वर्तमानपत्रात पाहिलेली देवी लईराई डोळ्यासमोर उभी राहिली. हिरव्या नऊवारी साडीतील, डावा पाय मांडी घातल्याप्रमाणे वळवलेला आणि उजवा पाय उंच पोटाशी दुमडलेला, त्या पायावर उजव्या हाताचे कोपर टेकवून तळवा छातीशी असलेली मूर्ती पाहायला मिळणार अशी माझी कल्पना होती. पण तिथे तसे काही नव्हते. समोर होता एक मोठा पालथा तांब्याचा घडा. ज्याला देवीचा कळस असे म्हंटले जाते. त्याच्यावर चौकोनी वस्त्र अंथरलेले होते. त्यावर छोटा मुकुट होता. लईराईचे अस्तित्व ह्या घड्याच्या आतमध्ये आहे. चित्रामध्ये दिसणारी लईराईही अशीच त्या उलट्या घड्यामध्ये बसलेली आहे हे बाजूला प्रदक्षिणेच्या वाटेवर असणाऱ्या फोटोकडे लक्ष देऊन पुन्हा पाहताच माझ्या लक्षात आले. देवीचे हे जे स्वरूप आहे ते कोण्या एका भक्ताला स्वप्नात दिलेल्या दर्शनातील आहे असे म्हटले जाते.

लईराई देवीस मोगऱ्याचे कळे अत्यंत प्रिय! म्हणून देवीला मोगऱ्याच्या कळ्यांचा हार अर्पण केला जातो. जत्रेच्या दिवशी देवीला अर्पण केलेल्या मोगऱ्याच्या कळ्यांपैकी एक कळा देवीच्या कळसामध्ये ठेवला जातो. जो पुढच्या जत्रेच्या वेळीच काढतात. आश्चर्य म्हणजे हा कळा वर्षभर तसाच टवटवीत राहतो.

देवी लईराई, शिरगांव

आजपर्यंत मी बघितलेल्या सगळ्या देवळांमध्ये हे देऊळ अत्यंत साधे होते. परंतु ह्या साधेपणाचा देवळाच्या भव्यतेत काडीमात्रही फरक पडत नाही.

देवीची जिथे प्रतिष्ठापना केली आहे तो गर्भगृहातील देव्हारा तेवढाच चांदीचा आहे. तो सोडला तर चांदी सोने हा बडेजाव कुठेच नाही. दरवाजे साधे लाकडी आहेत. गाभाराही खूप आत नाही. एकच दार ओलांडले की गाभारा आहे.

ह्या गाभाऱ्याबाहेरील खोलीसुद्धा खूप मोठी आहे. तिच्या गाभाऱ्यात उघडणाऱ्या दरवाजाच्या वरच्या भिंतीवर विष्णू आणि विष्णूच्या दोन्ही बाजूला ऋषींची चित्रे आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर पुन्हा चतुर्भुज विष्णूचे आणि उजव्या बाजूच्या भिंतीवर गणपतीचे चित्र आहे. बाहेरील चौकटीच्या वरच्या बाजूस दोन हत्तीच्या मध्ये लक्ष्मी आहे आणि चौकटीच्या दोन्ही बाजूला जय विजय. चौकात असणाऱ्या दोन्ही बाजूच्या सज्जाच्या भिंतीवरील विविध देवतांच्या मुर्त्या, दोन्ही बाजूचे खांब व खिडक्या हे स्वरूप सामान्यतः इतर देवळांसारखेच आहे. पण एकदम साधे. लाकडावरील कोरीव काम किंवा चांदी सोन्याच्या पत्र्यावरील कला कुसरी काही नाही. देवळातील हा साधेपणा मला फार आवडला. ह्या साधेपणावरून देवळात येणारे भाविकही अत्यंत साधे असणार याची कल्पना येते.

ह्या देवीची जत्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. जत्रेदिवशी भल्या पहाटे चेतवलेला प्रचंड अग्नी, व ह्या अग्नीच्या पेटत्या निखाऱ्यावरून चालणारे धोंड हे ह्या जत्रेचे वैशिष्ट्य. हे सारे धोंड जत्रेच्या आधी जवळजवळ महिनाभर कडक व्रत आचरतात. संपूर्ण शाकाहारी जेवण, घरापासून दूर कुठेतरी राहणे, इ. ह्या गावाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठेही कोंबडी, बोकड मारणे, खाणे अवैध आहे. त्यामुळे ह्या गावात कोणीही कोंबडी वगैरे खात नाही. हे सगळॆ सांगणारे लईराई देवीचे अष्टक देवळातील फलकावर आहे ते वाचून, बाहेरच सभामंडपात फुले आणि इतर वस्तू विकणाऱ्या मावशींकडून लइराई देवीच्या जत्रेबद्दल आणि लईराई देवीची कथा ऐकून जत्रा पाहायला पुन्हा यायचे असे मी मनाशी नक्की केले आहे. पाहू कधी योग येतो. 

कॅटेगरी Goan Temples