सरसोली धामचे प्रसन्न दर्शन घेतल्यानंतर कुडाळमधून गोव्याच्या दिशेला जाताजाता वाटेतच ठाकरवाडी येथे श्री गणपत मसगे ह्यांनी स्थापन केलेले कलादालन असल्याचे कळले.
खरं तर केवळ वाटेत जाता जाता लागते म्हणून आम्ही इथे आलो होतो. पण ह्या कलादालनाचे वेगळे पण; जुन्या नष्ट होत चाललेल्या लोक कला, पारंपरिक वस्तू आणि दुरावलेली संस्कृती यांची ओळख नव्या पिढीला करून देण्यापाठची कळकळ हे सारे पाहून आम्ही तिथे किती वेळ थांबलो याचे भान आम्हाला राहिले नाही. सुदैवाने भर दुपारी आम्ही तिथे पोचल्याने आमच्याशिवाय तिथे कोणी नव्हते. आम्हाला त्या संग्रहालयाची माहिती देणारा मुलगाही अतिशय मनापासून ते काम करत होता.
ठाकरवाडी हे नाव ठाकर ह्या आदिवासी जमातीवरून दिलेलं आहे. ह्या ठाकर समाजाला एकूण अकरा लोककला अवगत आहेत. त्या साऱ्या कलांचं प्रदर्शन इथे भरलेलं आहे यामध्ये पांगुळ बैल, गोंधळी, भुते, पोत, वासुदेव इत्यादींच्या वापरात येणाऱ्या वस्तू, वाद्ये आहेत याशिवाय शॅडो पपेट्री, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बाहुल्या वाद्येही इथे संग्रहित केली आहेत. त्यांचा शो ही इथे करून दाखवला जातो. पूर्वीच्या काळातली सागाच्या पानावर केली जाणारी पेंटिंग्स आणि त्यासाठी लागले जाणारे नैसर्गिक ब्रश, नैसर्गिक रंग हे ही इथे पाहायला मिळतात, मासेमारी करण्याकरता लागणारी विविध प्रकारची जाळी. त्यानंतर जुन्या काळातली तांब्या पितळेची मातीची भांडी,बांबू पासून बनवलेली मोजपात्रे, करट्यांच्या बनवलेल्या पळया, जुनी अवजारे, जुन्या पद्धतीचे दिवे, जंगली आयुर्वेदिक औषधे, घोंगडी, जुन्या काळातील पैसे हे सर्व इथे पाहायला मिळते.
ह्या मसगे कुटुंबाचे प्रेरणा स्थान असलेले सखाराम मसगे यांच्या वस्तू, वाद्ये, शिवाय त्यांनी लिहिलेले चित्रकथीचे रामायण ही इथे पाहायला मिळतात. याचबरोबर बांबूच्या अनेक वस्तू, जसे कणगी, सुपे, करंडे, झाडू,पंख याच्याशिवाय शेतकीची पारंपरिक अवजारांचेही एक वेगळे दालन आहे.
ज्या वस्तू आजच्या पिढीला ऐकूनही माहित नाहीत अशा सर्व वस्तू इथे पाहायला मिळतात. यातल्या काही वस्तू माझ्या पिढीला माहित आहेत पण माझ्या पुढच्या पिढीसाठी हे सगळं नवीनच आहे. त्यामुळे ह्या नव्या पिढीसाठी ठाकरवाडी आदिवासी कलादालन एक ज्ञान देणारे दालन आहे. इथे ह्या लोकदालनात प्रवेश करतानाच अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे माहितीसह फोटो लावलेले आहेत. लोक दालन पाहून बाहेर आलं की तिथे पपेट शो करण्यासाठी एक छोटेसे स्टेज आहे. ह्या म्युझियम मध्ये प्रवेश करण्यासाठी जाण्याचा मार्ग आणि परिसरही खुश करून जातो.
तर असा हे कुडाळच्या पिंगुळी गावात असलेले ठाकरवाडी आदिवासी कलादालन आपल्या बाळगोपाळांना घेऊन एकदा तरी भेट द्यावे असे आहे. .