घोटां म्हणजे गावठी आंबा. जो साले काढून चोखून खाल्ला जातो. आंबट गोड चवीच्या ह्या आंब्याचा गोव्यामध्ये बनविला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे घोटांचे सांसव. कोंकणी भाषेत सांसवा म्हणजे मोहरी (mustard seeds). हिंग मोहरीची फोडणी देऊन केलेल्या ह्या पदार्थामध्ये, खोबऱ्याच्या वाटपामध्येही मोहरीचे दाणे घातले जातात. अशाप्रकारे मोहरीची  किंचित कडू, आंब्याची आंबट गोड आणि वाटपात घालण्यात येणाऱ्या मिरचीची तिखट चव. असे चौरस चवीचे पक्वान्न म्हणजे घोटांचे सांसव

घोटांचे सांसव करण्यास लागणारे साहित्य आणि कृती
साहित्य:

७-८ घोंटा (गावठी आंबे)

एक वाटी गूळ (आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता)

७-८सुक्या मिरच्या

१/४ चमचा हळद पूड

खवलेला नारळ

१/२ लहान चमचा मोहरी

१ लहान चमचा धणे

८-१० मिरीचे दाणे

छोट्या लिंबाएवढी चिंच

चवीप्रमाणे मीठ

फोडणीसाठी साहित्य:

 

एक मोठा चमचा गावठी खोबरेल ( अथवा उपलब्ध असलेले कुठलेही तेल)

१ लहान चमचा मोहरी

चिमूटभर हिंग

कृती:

घोटां स्वच्छ धुवून त्यांची साले काढून टाकायची.  एका मिक्सरच्या भांड्यात किसलेले खोबरे, सुक्या मिरच्या, चिंच, मोहरीचे दाणे, धणे, मिरी, हळद  हे सारे आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. हे वाटण एका भांड्यामध्ये ओतावे. त्यामध्ये गूळ घालून मंद आंचेवर शिजवावयास ठेवावे. साधारण उकळी आली की त्यामध्ये सोललेल्या आंब्यांचा थोडा रस पिळून ते आंबे त्यात सोडावे. चार पाच मिनिटे शिजू द्यावे. तोपर्यंत फोडणी करून घ्यावी.

फोडणीच्या वाटीत तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग घालून गॅस बंद करावा. शिजत आलेल्या सांसवामध्ये मीठ घालावे आणि फोडणी घालून गॅस बंद करावा.

आंबट, गोड, तिखट चवीचे हे घोटांचे सांसव चपातीसोबत अप्रतिम लागते.

कॅटेगरी Goan Food