गोव्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते गणेश चतुर्थीपर्यंत मोठ्या आकाराची काकडी मिळते, तिला तवशे असे म्हणतात. पिवळसर हिरव्या रंगाची आणि फिक्या हिरव्या रंगाची असे तवशाचे दोन प्रकार असतात. ह्या तवशापासून बनवलेला पारंपरिक गोमंतकीय पदार्थ म्हणजे तवसळी.

बेळगाव भागात याच तवशाच्या मिरची आणि तांदळाचे पीठ घालून केलेल्या थालीपिठाला तवसोळी म्हणतात. परंतु गोव्यात; गव्हाच्या किंवा तांदळाच्या रव्यामध्ये, किसलेले तवशे, गूळ इ. घालून वाफवून केलेल्या गोड पदार्थाला तवसळी म्हणतात.

तवशे

गोड पदार्थ आवडणाऱ्यांना आणि त्यातही पारंपरिक पदार्थ आवडीने खाणाऱ्यांना ही तवसळी विशेष आवडते. तवशाच्या सुमधुर सुवासात मिसळलेला गुळाचा सुगंध, घरामध्ये तवसळी बनली आहे याची बातमी घरातच नाही तर शेजारी पाजारी सुद्धा पसरवतो.

अशी ही सुमधुर चवीची तवसळी कशी बनवायची ते पाहू.

साहित्य:

  *  २ वाट्या तवशाचा किस

  *  १ वाटी गव्हाचा मोठा रवा

  *  १ वाटी गव्हाचा बारीक रवा

  *  २-३ मोठे चमचे साजूक तूप

  *   दीड वाटी बारीक केलेला गूळ

  *  १/४ लहान चमचा वेलची पूड

  *   ७-८ काजूचे बारीक तुकडे

  *   १ चमचाभर नारळाची कातली (बारीक काप) 

  *   पाव लहान चमचा मीठ

तवसोळी
कृती:

 * बारीक आणि मोठा रवा तुपामध्ये भाजून घ्यावा.

  *  तवशाची साले तासून, दोन वाट्या होतील इतके तवशे किसून घ्यावे.

  * ह्या किसामध्ये तूपात भाजून घेतलेला गव्हाचा एक वाटी बारीक  रवा आणि एक वाटी मोठा रवा मिसळावा. 

   (गव्हाच्या रव्याऐवजी तांदळाचा रवा वापरला तरी चालतो)

   * किसलेल्या तवशाला सुटलेलेच पाणी मिश्रणात वापरावे, बाहेरून अधिक पाणी घालू नये.

  *  ह्या मिश्रणात किसलेला गूळ घालावा.

  *  काजूचे तुकडे, खोबऱ्याची कातली आणि वेलची पूड घालावी.

  *  मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  *  आता कुकरच्या एका डब्याला आतून तूप लावावे व त्यामध्ये हे मिश्रण ओतावे.

  *  कुकरची शिटी काढून २५ ते ३० मिनिटे मध्यम आंचेवर हे मिश्रण वाफवून घ्यावे.

  *  थंड झाल्यानंतर तवसळीच्या कडा सुरीने मोकळ्या करून घ्याव्यात. एका प्लेट मध्ये डब्बा उपडी करून तवसळी अलगद काढून घ्यावी.

  *  तवसळीचे हव्या त्या आकाराचे काप करून गरमगरम सर्व्ह करावे.

तवसळी आणखीन रुचकर हवी असल्यास तवसळीचे काप शुद्ध तुपात शॅलो फ्राय करावे

Tavsali
कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!